कुतूहल: प्लास्टिकचा रंग
प्लास्टिकच्या बऱ्याच शुभ्र वस्तू काही काळाने पिवळ्या पडतात. जवळजवळ ८० टक्के प्लास्टिक रंगहीन (पांढरे) असते. हे प्लास्टिक नंतर वेगवेगळी रंगद्रव्ये वापरून रंगवावे लागते. यासाठी हजारो टन रंगद्रव्ये वापरली जातात. बाजारात मिळणाऱ्या रंगद्रव्यांचे दोन प्रकार असतात. ती म्हणजे कार्बनी रंगद्रव्ये (ऑरगॅनिक कलरंट्स) आणि अकार्बनी रंगद्रव्ये (इनऑरगॅनिक कलरंट्स). सूर्यकिरणामध्ये अतिनील किरण (अल्ट्रा व्हायोलेट) असतात. हे प्रकाशकिरण साध्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत. परंतु या किरणांचा कोणत्याही रंगावर हळूहळू परिणाम होत असतो. िभती, वस्तू अशा सर्व गोष्टींचे रंग विटण्याचे हे कारण आहे. प्लास्टिकमध्ये हे रंग वापरल्यास अर्थातच हे रंग विटू लागतात. परंतु ही क्रिया केवळ प्लास्टिकपुरतीच मर्यादित नसून ते सर्व गोष्टींबाबत व सर्व प्रकारच्या रंगाबाबत घडते. उदाहरणार्थ उन्हात वाळत टाकलेले रंगीत कपडे हळूहळू फिके होतात. रस्त्यावरच्या जाहिरातीतील चमकदार रंग हळूहळू फिकट होत जातात.
प्लास्टिकबाबत आणखी एक प्रश्न नेहमीच सर्वाच्या मनात असतो. इतर सेंद्रिय पदार्थ जसे कुजून त्यांची माती होते तसे प्लास्टिकचे होत नसल्याने त्याच्या कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर सर्वत्र पसरलेले दिसतात. त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचे काय उत्तर आहे? प्लास्टिक बरेच वष्रे टिकते. हे जरी खरे असले तरी त्यावर अतिनील किरणांचा परिणाम हळूहळू होत असल्याने त्याची विघटनाची प्रक्रिया चालूच असते. मात्र पॉलिथिलीन, नायलॉन आणि टेरेलिनवर फारसा परिणाम होत नाही.
अनेक ठिकाणी प्लास्टिकचा नाश करण्यासाठी भट्टय़ात ते जाळून टाकून त्याचे कार्बनमध्ये रूपांतर करतात. पण या बहुगुणी प्लास्टिकचे मातीत रूपांतर करण्याचे आव्हान अजूनही जगापुढे आ वासून उभेच आहे.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
प्रबोधन पर्व
वामन मल्हार जोशी – ‘महाराष्ट्राचे सॉक्रेटिस’
वामन मल्हार जोशी यांना मराठीमध्ये ‘तत्त्वज्ञ कादंबरीकार’ म्हणून ओळखले जाते. ‘रागिणी’, ‘नलिनी’, ‘सुशीलेचा देव’, ‘इंदू काळे आणि सरला भोळे’ या त्यांच्या कादंबऱ्या मराठीतील तत्त्वज्ञानात्मक कादंबऱ्या म्हणून ओळखल्या जातात. ‘रागिणी’त तर तत्त्वज्ञानातील अनेक विषयांचा समावेश आहे. याचबरोबर विचारशील माणसांच्या विवेचकशक्तीला चालना देणारे, त्यांना विचारप्रवृत्त करणारे आणि त्यांचा दृष्टिकोन घडवणारे एक कळकळीचे तत्त्वचिंतक म्हणूनही वामन मल्हार यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी ‘विचार-विलास’, ‘विचार सौंदर्य’, ‘विचारलहरी’, ‘विचारविहार’ ही पुस्तके लिहिली. परंपरा आणि आधुनिकता यांना त्यांनी सारख्याच आत्मीयतेने पाहिले आहे. वामन मल्हार १९१८मध्ये त्यांनी हिंगणे येथील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या शिक्षणसंस्थेत आले आणि पुढे या संस्थेचे आजीव सदस्य झाले. शेवटपर्यंत त्यांनी या संस्थेत अध्यापनाचे काम केले. महाराष्ट्रात टिळकयुग असताना वामन मल्हार यांची तत्त्वविवेचक आणि ललितलेखक अशी दुहेरी ख्याती मिळवली. पण पुढील काळात ते ‘तत्त्वज्ञ’ याच नावाने अधिक ओळखले गेले. ‘‘वामन मल्हारांचे तत्त्वचिंतन ‘विशुद्ध’ स्वरूपाचे आहे, याचा अर्थ ते निरंग, नीरस, अमूर्त, तर्ककर्कश किंवा गणिती साच्याचे आहे असा नव्हे. त्यांचे सारेच तत्त्वचिंतन मानवसुखसापेक्ष आणि मानवाच्या सुखदु:ख-विचारात रंगलेले असते. एकंदर मानवजातीच्या ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नयनाचा वामन मल्हारांना ध्यास लागून राहिला होता,’’ असे गो. म. कुलकर्णी लिहितात, तर गं. बा. सरदार म्हणतात- ‘‘वामनरावांनी एका बाजूने बुद्धिवादाला मान्यता दिली, पण दुसऱ्या बाजूने त्यातील खाचखळगे दाखवून देऊन प्रेरणावादाचा पक्षही अगदीच कमकुवत नाही असे हळूच ध्वनित केले. त्यांचा हा संदेहवाद महाराष्ट्रातील पुढील अश्रद्धावादाची पूर्वसूचनाच होय.’’ वामन मल्हारांच्या वैचारिक चिंतनाचे स्वरूप कायमच इहवादी व मानवतावादी राहिले आहे. म्हणूनच त्यांना ‘महाराष्ट्राचे सॉक्रेटिस’ म्हटले गेले असावे. त्याबाबत दुमत झाले तरी वामन मल्हारांनी सॉक्रेटिसची वृत्ती आणि शैली मराठीत आणण्याचा प्रयत्न केला आणि प्लेटोचा आदर्शवादही जोपासला.
मनमोराचा पिसारा
निसर्गपुत्र
अरण्य अपरिचित होतं तरी तिथल्या वृक्षवेलींशी माझं नातं जुळलं होतं. झाडांची झुडुपांची नावं माहिती नव्हती, पण त्या हिरव्यागर्द पानावर चमकणाऱ्या सूर्यकिरणांशी मैत्री जमली होती.
श्रीलंकेतल्या एका जंगलातली ही गोष्ट. सोबतीला गुरू भंते आनंद होते. दोन दिवस कोलंबोमधील कोलाहलापासून (तिथे फारसा नव्हताच म्हणा!) दूर राहून मेडिटेशन करण्याच्या इराद्यानं आम्ही पोहोचलो होतो. त्यांच्या परिचित मित्राचं जवळपास घर असल्यानं राहण्या-जेवण्याची व्यवस्था होती.
अरण्यातला काही भाग साफसूफ करून वावरायला मोकळे केले होते. घडय़ाळ काढून ठेवले होते आणि मोबाइल तर स्विच ऑफ केले होते.
परस्परांशी फारसा संवाद करायचा नव्हता. भंते आनंद एखाद-दुसऱ्या गोष्टीविषयी बोलत, बाकी बरंच मौनव्रत. पलीकडच्या बाजूनं रिव्हर राफ्ट करण्यास योग्य असा नदीचा धावता प्रवाह होता. सीझन नसल्यानं टुरिस्टांची चहलपहल नव्हती. नदीचा आवाज मात्र रात्रंदिवस घुमत असे.
पक्ष्यांच्या किलबिलाटांनी जाग राहत होती. ट्रॉपिकल प्रदेश असल्याने तेही आवाज घरचे वाटत होते. तिथल्या भर दुपारची गोष्ट. असाच एका विशाल झाडाच्या पायथ्याशी बसलो होतो. ऊन चांगलंच तापलं होतं. अधूनमधून एकदम गरम हवेचा झोत येत होता. ‘‘मेडिटेशन करण्याची पद्धत तुझी तू शोध,’’ असं भंते आनंद यांनी म्हटल्यानं कोणत्याही प्रकारच्या रिवाज अथवा प्रक्रियेचं बंधन नव्हतं. डोळे उघडे ठेवून परिसर न्याहाळत होतो. सूर्याच्या किरणांची जाळी जमिनीवर पसरली होती. त्यामधून येणाऱ्या प्रकाशाच्या कवडशांची सूक्ष्म हालचाल लक्ष वेधून घेत होती. अधूनमधून त्या पर्णजाळीतून हलकी थंडगार झुळूक अंगावर येत होती. पलीकडे मुंग्यांची रांग नित्यनैमित्तिक कामासाठी पुढे सरकत होती.
नदीच्या प्रवाहाच्या आवाजानं सुंदर लय पकडली होती. बघता बघता माझे डोळे जडावू लागले. सभोवतालची झाडी अंधूक झाली आणि क्षणभरात दिसेनाशी झाली. जाणीव उरली ती फक्त माझ्या श्वासाची. मंद लयबद्ध हालचाल आणि नकळत नदीच्या प्रवाहाच्या तालाबरोबर श्वासाचा ताल जुळला. पाण्याचा तो आवाज सातत्यानं एकसारखा नादावत होता. मग वाटलं केवळ पाण्याच्या प्रवाहाशी श्वासाचं नातं नाहीये, तर हळूच गळणाऱ्या आणि हेलकावत जमिनीकडे येणाऱ्या जीर्ण पानाशी माझं नातं आहे. पक्ष्यांच्या आवाजात माझ्या हृदयाची स्पंदनं ऐकू येत आहेत. जमिनीवर पसरलेल्या आडव्या-तिडव्या मुळांशी माझ्या हातापायाचं नातं आहे. फुलापाशी गुंजारव करणाऱ्या भुंग्याला माझ्या मनातला नाद कळतो आहे. झुळझुळणाऱ्या वाऱ्यामध्ये माझ्या प्राणाची साद आहे.
मी स्तब्ध होतो, खरं म्हणजे मी ‘मी’ नव्हतोच. ती होती फक्त अनत्ताची जाणीव, क्षणोक्षणी बदलणाऱ्या दृश्यात होती अनित्यतेची जाणीव.. संध्याकाळी कधी तरी भंते मला शोधत आले. बोलण्याची गरज नव्हती.. पाठीवर हात ठेवून म्हणाले, ‘‘आज तुझी नव्यानं ओळख झालीय, निसर्गपुत्र म्हणून..’’ आम्ही मंद हसलो.
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com