एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी भारतातील आपले बस्तान स्थिरस्थावर करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होती. आवश्यक तिथे सैन्याची कुमक द्रुतगतीने पाठवणे ही त्यांची फार मोठी गरज होती. आणि येथील कच्च्या मालाचा पुरवठा इंग्लंडला वेळेवर व्हावा यासाठी तो बंदरापर्यंत वेगाने पोचविणे हे तर कंपनीचे ध्येयच होते. त्यासाठी पाश्चिमात्य देशांत नव्याने सुरू झालेल्या रेल्वेप्रमाणे इथेही रेल्वे सुरू करायचा निर्णय कंपनी सरकारने घेतला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या काळात आगगाड्या वाफेच्या इंजिनावर चालत. त्यामुळे रेल्वे सुरू करायची असेल, तर कंपनी सरकारला भारतात दगडी कोळशाच्या साठ्यांचा शोध घेणे भाग होते. त्यासाठी सरकारने इंग्लंडमधल्या ब्रिटिश भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागातील अनुभवी अधिकारी डेव्हिड विल्यम्स यांची १८४६ मध्ये ‘कोळसा क्षेत्र अन्वेषण अधिकारी’ म्हणून नेमणूक केली. त्यांचे साहाय्यक म्हणून फ्रान्सिस जोन्स यांची नियुक्ती करण्यात आली. दोन वर्षे खपून त्यांनी धनबाद आणि बरद्वान जिल्ह्यांची पाहणी केली. तेथील कोळशाच्या साठ्यांविषयीचा अहवालही सादर केला. परंतु त्यानंतर दोघेही हिवतापाने मृत्युमुखी पडले आणि दगडी कोळशाचा शोध घेण्याच्या कामाचे घोंगडे भिजत पडले.

गंमत म्हणजे नंतर या कामाची जबाबदारी सरकारी सेवेतील एक वैद्याकीय अधिकारी, डॉ. जॉन मॅक्लेलँड यांच्याकडे सोपविण्यात आली. कारण ते भूविज्ञानाचे जाणकार होते. पण तेही निवृत्तीला आले होते. आता मात्र या कामातली चालढकल परवडणारी नव्हती. मग सरकारने ब्रिटिश भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागाच्या धर्तीवर भारतातच नवा विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : कुतूहल : भूविज्ञान कशासाठी?

त्या सुमाराला आयर्लंडमधे टॉमस ओल्डहॅम नावाचे एक कार्यक्षम भूवैज्ञानिक डब्लिनच्या ट्रिनिटी महाविद्यालयात भूविज्ञान विषयाचे प्राध्यापक होते, ‘आयरिश भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ या सरकारी विभागाचे स्थानिक संचालक म्हणूनही ते काम पहात होते. कोळशाचा शोध सुरू ठेवण्यासाठी कंपनी सरकारने त्यांना पाचारण केले. ४ मार्च १८५१ रोजी ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) हा विभाग सुरू झाला. ओल्डहॅम हे या नव्या विभागाचे पहिले अधीक्षक झाले. त्यांच्याव्यतिरिक्त आणखी १२ भूवैज्ञानिकांची नियुक्तीही करण्यात आली.

ओल्डहॅम यांच्या लक्षात आले, की वरवर अभ्यास करून खनिजांच्या साठ्यांचा शोध घेण्यात त्रुटी राहू शकतात. म्हणून त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला, की आधी निरनिराळ्या प्रदेशांची सर्वंकष भूवैज्ञानिक पाहणी काटेकोरपणे केली पाहिजे. इथे भारताच्या भूवैज्ञानिक अभ्यासाचा खरा श्रीगणेशा झाला. लवकरच भारतात आगगाड्याही धावू लागल्या!

डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commencement of geological survey of india loksatta article css