जागतिकीकरणानंतर आपल्या देशात काही विदेशी कंपन्या आल्या. भारत आणि चीन हे दोन देश जगातील मोठय़ा बाजारपेठा आहेत. या विदेशी कंपन्यांनी भारतात प्रवेश केला आणि शेतमालावर व फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग प्रस्थापित केले. मक्याच्या लाह्य़ा, बटाटे वेफर्स, ज्यूस, केचप, सॉस यांचे उत्पादन सुरू केले. या कंपन्या हाच माल आपल्या देशात विकून प्रचंड फायदा मिळवीत आहेत.
आपल्या देशात फळे आणि भाजीपाल्याच्या फक्त दोन टक्के मालावर प्रक्रिया केली जाते. इतर देशात ८० ते ९० टक्के मालावर प्रक्रिया केली जाते. आपण आपल्या देशातील शेतमाल उदा. द्राक्षे, आंबे, भाज्या आणि औषधी वनस्पती जशीच्या तशी कच्चा शेतमाल म्हणून निर्यात केली तर मालाचा भाव कमी मिळतो. पण आंब्याऐवजी आमरस, द्राक्षापासून बेदाणे, वाइन, दुधापासून दूध पावडर, लसणीऐवजी लसूण पावडर असे पदार्थ करून त्यांचा टिकाऊपणा वाढवला तर शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो.
शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी ग्रामीण भागात युवकांना पुष्कळ संधी आहेत. स्वयंरोजगार करण्याची अत्यंत चांगली संधी आहे. या क्षेत्राचे महत्त्व ओळखून भारत सरकारने अन्न प्रक्रिया मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्याच्या बऱ्याच योजना आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान रोजगार हमी योजनेतून जिल्हा शेती अधिकारी काजूप्रक्रिया व इतर उद्योगांना मदत करतात. युवकांनी व फळभाज्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राची, शेतकी अधिकाऱ्यांची मदत घेऊन आपले उद्योग प्रस्थापित करावेत.
२००५ या वर्षी शेती मंत्रालयाच्या पुढाकाराने ‘व्हेन्चर कॅपिटल फॉर एग्रोबिझिनेस प्रोजेक्ट्स’ ही योजना जाहीर झाली. या योजनेतून छोटय़ा शेतकऱ्यांना तसेच शेती उद्योगांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. ही योजना भारत सरकारच्या सर्व बँकांमधून राबविली जाते. ग्रामीण भागातील महिला गटांनी मोठय़ा प्रमाणात या क्षेत्रात शिरण्याची गरज आहे. कारण खाद्य पदार्थ व फळ प्रक्रिया क्षेत्रात त्या सहज भाग घेऊ शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा