-भानू काळे  bhanukale@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अपरोक्ष’ शब्दाचा अर्थ आपण ‘दृष्टिआडचे’ असा लावतो. ‘त्याने माझ्या अपरोक्ष हे केले’ याचा अर्थ ‘त्याने माझ्या दृष्टिआड किंवा मी समोर नसताना हे केले’ असाच लावतो. पण हा अर्थ मूळ अर्थाच्या अगदी उलट आहे. कारण ‘अक्ष’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘डोळा’ असा आहे.

पूर्वपदी ‘पर’ आल्यावर ‘परोक्ष’ शब्दाचा अर्थ ‘दृष्टिआडचे’ असा होईल. नंतर पुन्हा परोक्षला ‘अ’ हे नकारदर्शक पूर्वपद लागल्यावर त्या ‘अपरोक्ष’ शब्दाचा अर्थ उलटा म्हणजे ‘दृष्टीसमोरचे’ असा होईल. पण त्याच्या अगदी उलट अशा अर्थाने, म्हणजेच ‘दृष्टिआडचे’ अशा अर्थाने, अपरोक्ष हा शब्द रूढ झाला आहे. हा अपरोक्ष शब्दच अधिक वापरात येतो, परोक्ष अगदी क्वचितच कोणी वापरेल.

‘विरोधाभास’ हा शब्द घ्या. विरोध अधिक आभास अशी त्याची फोड करता येईल. शब्दश: बघितले तर विरोधाचा केवळ आभास असणे, म्हणजेच वरकरणी दिसला तरी प्रत्यक्षात मात्र विरोध नसणे, असा त्याचा अर्थ होईल. मराठीत मात्र दैनंदिन वापरात विरोधाभास हा शब्द ‘विरोध असणे’ याच अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ, ‘त्याच्या विधानात विरोधाभास आहे’ असे म्हटले, तर ‘त्याच्या विधानात परस्परविरोध आहे’ असाच अर्थ लावला जातो.  इंग्रजीतील कॉन्ट्राडिक्शन किंवा कॉन्ट्रास्ट अशा अर्थाने. म्हणजेच ‘विरोध नसणे’ याऐवजी ‘विरोध असणे’ असाच त्याचा अर्थ रूढ झाला आहे.

‘राजीनामा’ हा असाच आणखी एक शब्द. राजी  नामा अशी त्याची फोड करता येईल. राजी हा मूळ अरबी शब्द आणि त्याचा अर्थ कबूल किंवा स्वीकृत असा आहे. जसे, ‘‘तो त्या प्रस्तावाला राजी झाला.’’ नामा हा मूळ फारसी शब्द आणि त्याचा अर्थ लिखित स्वरूपातील असा आहे. जसे करारनामा किंवा जाहीरनामा. त्यानुसार ‘राजीनामा’ शब्दाचा अर्थ ‘स्वीकृतिपत्र’ असा होतो. पण प्रत्यक्षात राजीनामा हा शब्द नेमक्या विरुद्ध अर्थाने म्हणजे त्यागपत्र (म्हणजेच नाराजीनामा!) या अर्थाने वापरला जातो. अर्थविज्ञानशास्त्रात (Semantics) या अर्थपरिवर्तनाला ‘अर्थभ्रंश’ म्हणतात; त्यानुसार या तिन्ही शब्दांचा रूढ वापर शास्त्रानुसार चुकीचा आहे; पण शेवटी ‘शास्त्रात् रुढिर्बलीयसी’, शास्त्रापेक्षा रूढी अधिक बलवान ठरते, हेच खरे!

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complicated word marathi meaning marathi language learning zws