‘खेळून आल्यावर साबणाने हात-पाय स्वच्छ धू.’ असं संध्याकाळच्या वेळी प्रत्येक घरात आईचं हे वाक्य ऐकायला मिळतं. अस्वच्छ हात-पाय फक्त पाण्याने स्वच्छ होत नाहीत. त्यासाठी साबण वापरावा लागतो. कसं बरं तयार करतात साबण? अल्कली आणि मोनोकाबरेक्सिलिक आम्ल (फॅटी अॅसिड) यामध्ये अभिक्रिया होऊन साबण आणि ग्लिसरीन तयार होतं. साबण तयार करण्याच्या प्रक्रियेला ‘साबणीकरण’ म्हणतात. सोडियम क्षार असलेल्या अल्कलीमुळे साबणाला कडकपणा येतो तर पोटॅशिअम क्षार असलेल्या अल्कलीपासून मृदू साबण तयार होतो. पोटॅशिअम साबण सोडिअम साबणापेक्षा पाण्यात अधिक विरघळतात. फॅटी अॅसिड म्हणून खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, पाम तेल अशा विविध तेलांचा वापर केला जातो.
अठराव्या शतकापर्यंत साबण घरगुती पातळीवर तयार करीत असत. त्यासाठी प्राण्यांपासून मिळणारी चरबी, ग्रीझ किंवा तेल म्हणजेच फॅटी अॅसिड, मीठ आणि राख याचा वापर केला जात असे. राखेत पोटॅशिअम काबरेनेट असतं. अल्कली काबरेनेटचं दाहक सोडय़ात रूपांतर करण्यासाठी भिजवलेला चुना वापरत असत. १७९१ मध्ये मिठापासून धुण्याचा सोडा (सोडियम काबरेनेट) तयार करण्याच्या स्वस्त पद्धतीचा शोध लागला. साबणीकरणात तयार होणारं ग्लिसरीन वेगळं करता येऊ लागल्यावर साबणनिर्मितीचा खर्च कमी झाला. साबण स्वस्त झाला, त्याचा वापर वाढला आणि साबणनिर्मितीचं उद्योगात परिवर्तन झालं.
साबणाची प्रक्षालनक्षमता (मळ वेगळं करण्याची क्षमता) वाढवण्यासाठी सोडियम सिलिकेट, सोडियम काबरेनेट, सोडियम पबरेरेट यांसारख्या अल्कलींचा वापर केला जातो. पाणी मृदू करण्यासाठी पाण्यात न विरघळणारं एथिलीन डाय-अमाइन टेट्रा-अॅसिटिक आम्ल (EDTA) वापरलं जातं. काही अपघर्षकांचा (घासून पृष्ठभाग स्वच्छ करणारा पदार्थ) वापरही साबणात करतात. साबण आकर्षक करण्यासाठी त्यात रंगद्रव्यं आणि सुगंधित द्रव्यंही वापरतात. साबणात घातलेले रंग व वास एकजीव होऊन साबण घट्ट व्हावा म्हणून काही वेळा त्यात पॉलिथिलीन ग्लुकॉल्स ही रसायनं घातली जातात.
अनघा वक्टे (मुंबई)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – मदत घेण्यात कमीपणा?
‘मानस, तुला खूप दिवसांत काही तरी सांगायचं होतं. माझ्या मनात जरा अस्वस्थ वाटतंय, कारण तुला काही सूचना केली, तुझ्यात होकारात्मक बदल कसा करता येईल, असा विषय काढला की तू ताबडतोब तलवार परजून वादविवाद करतोस. तू बुद्धिवादी असल्यानं अतिशय हुशारीनं युक्तिवाद करतोस. स्वत:मध्ये परिवर्तन करायला, आपल्या चुकीच्या सवयींवर मात करायला मी पुरेसा आहे. मला कुणाची मदत घेण्याची गरज नाही म्हणतोस.’ मानसी एका दमात मानसला म्हणाली. ‘तुझ्याविषयी माझी तक्रार आहे की, तू आणखी कोणाची, मदत घ्यायला तयार होत नाहीस.’
इतर बुद्धिवादी लोकांविषयीदेखील माझं हेच म्हणणं आहे. आपल्या समस्येचं तार्किक विश्लेषण केलं की, आपले प्रश्न सुटतात असं त्यांना वाटतं. एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची विशेषत: मानसिक घडामोडींच्या बाबतीत मदत घ्यायला त्यांना कमीपणा वाटतो. आपला रागीटपणा, आपला आग्रहीपणा कसा समर्थनीय आहे, याचंच तुणतुणं ते वाजवतात.’ मानसी तोच मुद्दा पुढे नेत म्हणाली. मानस भांबावल्यासारखा ऐकतच राहिला. ‘हे बघ, मला शहाणपणा शिकवू नकोस. माझ्यात पुरेशी ताकद आहे. मला आणखी कोणाची सल्लामसलत आणि साहाय्य घेण्याची गरज नाही.’ मानसने सावरून मानसीचा मुद्दा खोडून काढू लागला.
‘थांब, परिवर्तनासाठी स्वत:वर विश्वास असणं महत्त्वाचं असतं, पण स्वत:वर पूर्णपणे विसंबून न राहता, परिवर्तनाचे अभिनव मार्ग आणि कौशल्य शिकून घेणंही गरजेचं असतं. आपण शिक्षणाकरिता शाळा-कॉलेज आणि शिक्षकांची मदत घेतो असं समज. म्हणजे तुझ्या रागीटपणामध्ये तुला बदल करायचाय. न चिडता आपलं म्हणणं मांडता आलं पाहिजे. मनाप्रमाणे न घडल्यास, अपेक्षाभंग झाला की किती चिडतोस तू! तुला रागीटपणावर मात करायची आहे, कोणाला वजन कमी करण्यासाठी तर कोणाला व्यसनं सोडविण्यासाठी मदत घ्यायची असते; हे सगळं एकटय़ाने जमत नाही रे! यात कसला आलाय कमीपणा?’ मानसी मुद्दा धरून म्हणाली.
मानस विचारात पडलेला पाहून मानसीने नि:श्वास टाकला. ‘हे बघ, आपल्या मानसिक अडचणीबद्दल कोणाचं साहाय्य घेणं यात काही अपमानकारक आहे, असं कशाला समजायचं?’ ‘मानसी, माझ्या चिडचिडय़ा स्वभावावर मला नक्कीच मात करायची आहे, पण इतर लोकांच्या वागण्यामुळे मला राग येत असेल तर त्यांनी बदलायला नको का? हे लेक्चर तू त्या लोकांना का देत नाहीस? इफ दे स्टॉप इरिटेटिंग, आय विल हॅव नो प्रॉब्लेम!!’ मानस हातावर मूठ आपटत म्हणाला.
‘हंऽऽ’ मानसी किंचित हसत म्हणाली. ‘हे बघ, मनासारखं वागलं नाही तर कोणालाही राग येऊ शकतो. हा राग इतका अनावर होतो की तू अद्वातद्वा बोलतोस, कोणाचा तरी अपमान करतोस आणि नंतर.. पस्तावतोस. मानस आपल्याला मदत लागते ना ती या रागावर नियंत्रण आणण्यासाठी नाही तर मनातल्या रागाचं व्यवस्थापन करण्यासाठी. कळलं? तू मदत घ्यायला नाकारतोस आणि युक्तिवाद करून आत्मसमर्थन करतोस. ते थांबव! अरे, दुसऱ्याची मदत म्हणजे स्वत:च्या प्रश्नाकडे बघण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणं. तुझ्या बुद्धिवादी भूमिकेमुळे, युक्तिवाद करण्याच्या सवयीमुळे तू स्वत:ची वंचना करतोस. स्वत:ला पारखं करतोस..’ मानसी शांतपणे म्हणाली.
‘ओके, आता पटलं मला! माझ्या चुकीच्या सवयी टाळायच्या असतील तर मी तयार आहे. एक सांगू, मला खूप रिलीफ वाटतोय. युक्तिवाद करून मी स्वत:ला फसवणार नाही. मला शिकवशील स्वत:मध्ये कसा बदल करायचा?’ मानसी खुदकन हसली.
डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – जो जो हिच्याविरुद्ध बोलावे तो तो तिला बळ चढते..
‘‘जातिसंस्थेच्या विरुद्ध लोक आज कितीतरी दिवस बोलत आले आहेत, आजही बोलत आहेत आणि अंदाज असा आहे की, पुढे कित्येक वर्षे बोलत राहतील. कोणा लोकांचा समज आहे की, इंग्रजी राज्य सुरू झाले आणि मिशनरी लोकांचे ेऐकून आपले सुधारक जातिसंस्थेच्या विरुद्ध बोलू लागले. खरी गोष्ट अशी आहे की, ही संस्था जितकी हजारो वर्षे हिंदुस्थानात नांदत आली आहे तितकी हजारो वर्षे अनेक लोक तिच्याविरुद्ध बोलत आले आहेत. किंबहुना प्रत्येक युगमानातल्या समाजसुधारकांची, धर्मप्रवर्तकांची आणि उदारमतवाद्यांची ही एक ठराविक पट्टी आहे; तिच्यावर बोट ठेवल्याशिवाय यांपैकी कोणाचेही संगीत संपलेले नाही आणि आश्चर्याची गोष्ट ही की, हा प्रकार इतकी शतके चालू असूनही पुन्हा ही संस्था जवळजवळ जशीच्या तशी कायमच आहे. जो जो हिच्याविरुद्ध बोलावे तो तो तिला बळ चढतेसे दिसते. हिला निंदेचे विष किती जरी पाजले तरी त्या विषाचा च्यवनप्राशच बनतो आणि ही संस्था पूर्वीपेक्षाही रसरशीत दिसू लागते.’’
जातींची ही चिवट हरळ समूळ नष्ट करण्यासाठी श्री. म. माटे संधिसमानात्वाचे तत्त्व सांगताना लिहितात –
‘‘सामथ्र्यविकासाची संधी दिली म्हणजे कोण किती किंमतीचा आहे हे ठरू लागेल. आणि ज्या जातींत विशेष प्रकारची समर्थ माणसे उत्पन्न होत आहेत असे दिसेल त्या पुढारलेल्या जाती ठरतील. आणि अशा या पुढारलेल्या जाती तुल्यबळ म्हणजे किंमतीने सारख्या ठरल्यामुळे एकमेकींत कालेकरून मिसळून जातील. पण मिसळण्याच्या आधी आपण सामर्थ्यांने समान आहोत असे त्यांना जातिश: दिसून आले पाहिजे. ज्या जाती ज्या सामर्थ्यांच्या असतील त्या जाती तेवढय़ाच सामर्थ्यांच्या इतर जातींशी एक होऊ लागतील आणि जातींची संख्या भराभर कमी होऊ लागेल. व्यक्तिस्वातंत्र्याला पुढील काळात पुष्कळच अवसर राहणार असल्यामुळे सारख्या सामर्थ्यांची पण विषम जातींतील दोन स्त्री-पुरुषेसुद्धा विवाहबद्ध होऊ शकतील. आणि अशाही रीतीने जातीतील दुजाभाव कमी होत जाईल.’’