डॉ. यश वेलणकर – yashwel@gmail.com
माणूस मोबाइलवर व्हिडीओ पाहण्यात गुंतला असेल तर आजूबाजूला काय घडते आहे ते त्याला समजत नाही. कारण त्याचे तिकडे लक्ष नसते. आपल्या मेंदूला एकाच वेळी इतकी माहिती मिळत असते, की तो त्या माहितीला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे तो ठरावीक माहितीच घेतो. जी माहिती तो ग्रहण करतो तिकडे लक्ष आहे, ‘अटेन्शन आहे’ असे म्हटले जाते. म्हणजे ‘अटेन्शन’ हे आपल्या मेंदूतील ऊर्जेचा नेता आहे. जेथे अटेन्शन असते तेथे मेंदूतील अधिकाधिक ऊर्जा वापरली जाते. ध्यान म्हणजे प्रयत्नपूर्वक आपले लक्ष ठरावीक ठिकाणी द्यायचे. ध्यान देऊन ऐक असे सांगितले जाते, त्यावेळी इकडे लक्ष दे असेच बोलणाऱ्याला सांगायचे असते. असे सांगावे लागते कारण समोरील व्यक्ती काहीही करीत नसली तरी तिचे लक्ष आपल्या बोलण्याकडेच असेल असे सांगता येत नाही. बऱ्याचदा मनात विचार येत असतात आणि त्यामध्येच माणूस गुंग होऊन गेलेला असतो. आत्ता आपले लक्ष कुठे आहे ते जाणणे आणि ते ठरवून एखाद्या गोष्टीवर किंवा कृतीवर नेता येणे हे मानवी मेंदूचे एक व्यवस्थापकीय कार्य आहे. मेंदूतील प्री फ्रंटल कोर्टेक्स जी कामे करतो त्यातील काही खास कामांना मेंदूची व्यवस्थापकीय कार्ये म्हणतात. एखाद्या कंपनीतील मॅनेजमेंट जशी काम करते, कुठे पैसे खर्च करायचे हे जसे कंपनीत ठरवले जाते तसेच माणसामध्ये कुठे ऊर्जा वापरायची आणि कुठे वाचवायची हे मेंदूतील ठरावीक भाग ठरवीत असतो. या भागाला योग्य प्रशिक्षण मिळाले नसेल तर तो चुकीच्या ठिकाणी ऊर्जा खर्च करीत राहतो आणि त्याचे त्याला भान नसते.
हे भान वाढवण्यासाठी जो सराव केला जातो त्यालाही ध्यान म्हणतात. यातील एकाग्रता ध्यान म्हणजे लक्ष एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा आणायचे, मेंदूतील एकच फाइल अधिकाधिक वेळ सक्रिय ठेवायची. त्राटक, नामस्मरण, आनापान हे सारे एकाग्रता वाढवणारे उपाय आहेत. यामध्ये ‘आलंबन अधिकाधिक सूक्ष्म करणे’ हे प्रगतीचे लक्षण असते. म्हणजे श्वासाचा स्पर्श जाणण्यासाठी नाकाच्या खाली वरच्या ओठावर लक्ष ठेवायचे. स्पर्श समजू लागला की लक्ष त्या भागातील एका छोटय़ा बिंदूवर ठेवायचे. स्वामी विवेकानंद यांनी या ध्यानाची खूप प्रशंसा केली आहे. विपश्यना शिबिरातील पहिले तीन दिवस असेच ध्यान केले जाते. त्याला आनापान म्हणतात. विद्यार्थ्यांनी असा नियमित सराव केला की त्यांची ग्रहणक्षमता वाढते.