डॉ. नीलिमा गुंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीमध्ये जोडशब्द वापरण्याची पद्धत आहे. त्यातही एखादा शब्द पुन:पुन्हा येऊन तयार होणारा जोडशब्द (व्याकरणदृष्टय़ा अभ्यस्त शब्द) वापरणे, ही मराठीची एक लकब आहे. या शब्दांचा उपयोग काही वेळा वाक्प्रचारांसारखा केला जातो. त्याची काही उदाहरणे देते. ‘मराठी भाषा: वाढ आणि बिघाड.’ या पुस्तकात श्री. के . क्षीरसागर यांचे वाक्य आहे, ते असे- ‘भाषेचे मूळ वळण न सोडता नवे शब्द तयार करणे हे अलबत्या-गलबत्याचे काम नव्हे!’ यातील अलबत्या- गलबत्या याचा अर्थ आहे, सोम्यागोम्या, अलाणेफलाणे इत्यादी. म्हणजे ते येऱ्या गबाळय़ाचे काम नाही, ते आव्हानात्मक काम आहे, असे लेखकाला म्हणायचे आहे.

साटेलोटे करणे, हा वाक्प्रचार विवाहाच्या संदर्भात वापरला जातो. साटेलोटे करणे म्हणजे देवाणघेवाण करणे. आपल्या घरची मुलगी दुसऱ्याच्या घरी व दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी विवाह करून आणणे, त्यात अभिप्रेत आहे. या प्रकाराने केलेले विवाह क्वचितच सुखदायक होतात. म्हणूनच , ‘साटेलोटे आणि जन्माचे खोटे’ अशी म्हण रूढ झाली आहे.

टणाटणा बोलणे म्हणजे तोंडचा पट्टा सोडणे, टोमणे मारणे. भाजताना फुटाणे जसे टणाटण उडत असतात, तसे अंगावर येणाऱ्या गरम शब्दांचे चटके यात अभिप्रेत आहेत. पूर्वीच्या काळी काही स्त्रियांना अगदी लांबच्या नात्यातील सासूचे टणाटणा बोलणेदेखील निमूट ऐकून घ्यावे लागत असे!

य. न. केळकर यांनी ‘ऐतिहासिक शब्दकोश’ या ग्रंथात दिलेला वाक्प्रचार आहे, साळकोजी-माळकोजी करणे. याचा अर्थ आहे, अजिजी करणे. साळकोजी- माळकोजी म्हणताना बिनमहत्त्वाची व्यक्ती अभिप्रेत असते. त्यामुळे कोणालाही विनवणी करणे, हा त्याचा सूचित अर्थ होतो.

वाणीतिणीचा असणे, हा ग्रामीण वाक्प्रचार डॉ. सरोजिनी बाबर यांच्या ‘लोकसाहित्य शब्दकोशा’त आहे. वाणी म्हणजे भाषा. वाणीतिणीचा म्हणजे कौतुकाचा, नवसाचा, ज्याच्याविषयी भरभरून बोलावे असे वाटते, असा!

असे आणखीही काही वाक्प्रचार आहेत. उदा. आटापिटा करणे, टाकोटाक जाणे इत्यादी. यातील अभ्यस्त शब्दांमध्ये येणाऱ्या अनुप्रासामुळे बोलण्याला डौल प्राप्त होतो.

 nmgundi@gmail.com