सूतनिर्मितीचे तंत्र
वस्त्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कच्चा माल म्हणून विविध तंतूंचा उपयोग केला जातो. या तंतूंपासून प्रथम सुताची निर्मिती केली जाते. पुढे या सुतापासून कापड, कापडावर रासायनिक प्रक्रिया केल्या जातात व या पद्धतीने तयार झालेल्या कापडापासून कपडे शिवले जातात. पंधरा-वीस वर्षांपूर्वी वस्त्रोद्योगामध्ये फक्त रासायनिक प्रक्रिया करून तयार झालेले कापड (फिनिश्ड) बाजारात विकले जात असे. असे कापड कापडाच्या दुकानातून विकत घेऊन िशप्याकडून कपडे शिवून घेतले जात असत. त्या वेळी या उद्योगाला ‘वस्त्रोद्योग’ (टेक्सटाइल इंडस्ट्री) असे संबोधण्यात येत असे; परंतु आज बहुतांशी लोक तयार कपडे (रेडीमेड गारमेंट) विकत घेणे पसंत करतात.
तयार कपडय़ांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होण्यासाठी तयार कपडे शिवण्याचे उद्योग प्रस्थापित झाले. पूर्वी वस्त्रोद्योगातील उत्पादन विभागाची शृंखला रासायनिक प्रक्रिया विभागापर्यंत येऊन संपत असे. त्या शृंखलेमध्ये तयार कापडापासून कपडे शिवण्यासाठी शिलाई विभागाची भर पडली. तयार कपडे शिलाई उद्योग हा अशा रीतीने वस्त्रोद्योगातील उत्पादन विभागांच्या शृंखलेचा एक महत्त्वाचा भाग बनला. त्यामुळे वस्त्रोद्योगाचे ‘वस्त्रोद्योग’ याऐवजी ‘वस्त्र व तयार कपडे उद्योग’ (टेक्सटाइल आणि अॅपरल इंडस्ट्री) असे नामकरण झाले.
सूतनिर्मिती ही वस्त्रोद्योगाची पहिली पायरी आहे. तंतूपासून सुताची निर्मिती केली जाते. तंतू हे दोन प्रकारांमध्ये येतात. काही तंतू हे कमी लांबीचे असतात. उदा. कापूस- दोन ते पाच सें.मी., लोकर ८ ते २० सें.मी., तर तागाचे तंतू २ सें.मी.पासून ७५ ते ८० सें.मी. एवढय़ा लांबीचे असतात. अशा तंतूंना आखूड तंतू (स्टेपल फायबर) असे म्हणतात. आखूड तंतूंपासून सूत तयार करण्यासाठी आधी या तंतूंची एका अखंड अशा लांबसडक सूत्रात (स्ट्रँड) रचना करून त्याला ताकद येण्यासाठी पीळ द्यावा लागतो. या प्रक्रियेस सूत कातणे असे म्हणतात व ज्या उद्योगात अशा प्रकारे सुताचे उत्पादन केले जाते त्या उद्योगास सूतकताई उद्योग (स्पिनिंग) असे संबोधले जाते.
चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा