काही शेतकरी रासायनिक खते आणि कीडनाशके याऐवजी गोमूत्राचा वापर करतात. शेतातील टाकाऊ पदार्थ (गव्हाचा भुसा, पऱ्हाटीची धसकटे, ज्वारीचे धांडे) तसेच तुऱ्यावरील तणे आणि अन्य झाडे (लॅन्टाना, रानटी झुडपे) यांपासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी गोमूत्राचा उपयोग होतो. जुने गोमूत्र जास्त परिणामकारक ठरते. ताजे गोमूत्र फवारल्यास पानांना इजा होते आणि रोपटी कोमेजतात किंवा पाने गळतात. अलीकडे गोमूत्राचा वापर सेंद्रीय शेतीसाठी पंचगव्य, जीवामृत आणि अमृतपाणी यासाठी मोठय़ा प्रमाणात होत आहे. गोमूत्रात ७०-८० टक्केपाणी असले तरी फॉस्फेट ऑफ युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, काबरेनेट आणि पोटॅश अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, काबरेलिक आम्ल, हिपुरिक आम्ल, लॅक्टोस आणि महत्त्वाची संप्रेरके असतात. ही रसायने झाडांच्या वाढीसाठी पूरक ठरतात.
पिकांवर फवारण्यासाठी गोमूत्राच्या १०-१५ टक्के पाण्यातील द्रावणात इतर पदार्थ (उदा. हिंग) आणि थोडे साबणाचे पाणी मिसळावे. कडुनिंब, जंगली एरंडी, निरगुडी, शेवंती, कण्हेर, निलगिरी, तंबाखू, कांदा, मिरची इत्यादी वनस्पतींची पाने, फळे बारीक कापून किंवा वाटून गोमूत्रात टाकावे. कडुनिंबाचा ५ टक्के पाण्यातील थंड अर्क आणि इतर वनस्पतींचा गरम अर्क (५-१० टक्के) गोमूत्रात मिसळल्यास फवारणी जास्त परिणामकारक ठरते. तसेच गोमूत्रावर आधारित व्यापारी कीडनाशकेही सध्या बाजारात मिळतात. त्याचप्रमाणे वनस्पतीजन्य पदार्थ, विशेषत: कडुिनब, वापरून ५० पेक्षा जास्त कीडनाशके तयार होऊ शकतात. या कीडनाशकांसोबतही गोमूत्राचा वापर सरस ठरतो. या मिश्रणाची फवारणी केल्यास दोन्हीमधील रासायनिक घटक एकत्र येतात (मात्र या मिश्रणात रासायनिक कीडनाशके टाकू नयेत). यामुळे किडी व रोगराईचे प्रमाण कमी होते. झाडांना थोडय़ा प्रमाणात अन्नद्रव्येही मिळाल्यामुळे झाडाची अवर्षणाविरुद्ध क्षमता वाढते आणि खताची मात्रा लांबणीवर टाकता येते.
िहगाच्या वासामुळे किडीची मादी अंडी कमी प्रमाणात टाकते. उडणाऱ्या किडी वासामुळे दूर जातात. किडीची वाढ खुंटते, त्यांच्या जीवनावस्थेत अडथळा येतो, त्यांची प्रजनन क्षमता कमी होते.. इत्यादी बाबी गोमूत्र व वनस्पतीजन्य पदार्थाच्या मिश्रणामुळे शक्य होतात आणि पिकाचे नुकसान कमी होते किंवा टळते.
– डॉ. रु. तु. गहूकर (नागपूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
जे देखे रवी.. : रहस्यकथा: भाग १
ती माझ्या दवाखान्यात शिरली तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती. आली होती चिरा बाजारमधून. माझा दवाखाना होता दादरला. हे विपरीत उत्तरायण होते. गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. त्या काळात दक्षिणायन हाच नियम होता. सगळे काही ‘आधुनिक’ दक्षिण मुंबईत होते. सलवार खमीज हा वेष, कपाळावर कुंकू नाही, पण बुरखाही नाही, तेव्हा मनात म्हटले ही बोहरी खोजा वगैरे असणार.
मला म्हणाली, ‘‘मला माझ्या स्तनांवर शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे.’’ मी दचकलो पण शांत राहिलो. मी म्हणालो, ‘‘काय झाले आहे.’’ तेव्हा एकदमच कपडे उतरवू लागली. तेव्हा मात्र मी तिला थांबवले. आमच्या मजल्यावर दुसऱ्या दवाखान्यात एक मुलगी काम करायची तिला बोलावून घेतले.
तिला तपासताना ‘मला स्तन मोठे करून हवे आहेत’ अशी तिने मागणी केली. मी बुचकळ्यात पडलो. तिला उठून बसवली तेव्हा बाळंतपणानंतर स्तन ओघळले आहेत हे निरीक्षण मी तिला सांगितले आणि ते दुरुस्त करता येतील असे म्हटले. तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल तिला विचारू लागलो तेव्हा एकदम गप्प बसली. नवऱ्याबरोबर बिनसले आहे का, असे विचारले तर ‘तसेच काहीतरी’ असे मोघम उत्तर मिळाले.
तुला माझ्याकडे कोणी पाठविले हे विचारल्यावर ‘तुमचे नाव ऐकून पत्ता शोधत आले’ असे उत्तर मिळाले. आता ती चुकचुकणारी पाल कर्कश आवाजात चीत्कार काढू लागली होती. कारण माझे नाव असल्या प्रकारच्या शस्त्रक्रियेबद्दल बिलकूलच मशहूर नव्हते. मी खरे तर तिला फुटवली. ‘गपचूप संसार कर’ असा सल्ला दिला. ‘नाहीतर नवऱ्याला घेऊन ये’ असे सुनवले. तेव्हा ती मोठी गंभीर झाली आणि गेली.
चार दिवसांनंतर परत आली आणि गयावया करू लागली. तेव्हाही नवरा कोठे आहे, असे म्हणत परत तिला हाकलली. मग एक दिवस फोन आला की, मी नवऱ्याला घेऊन येते आहे.
त्या काळात माझा एक चुलतभाऊ माझ्याकडे शिकत असे त्याला मी बोलावून घेतले. तिचे आणि तिच्या नवऱ्याचे अनेक आकृत्या काढून एक बौद्धिक घेतले. त्या वेळेला हा भाऊ साक्षीदार होता.
नवरा एक शब्द बोलत नव्हता. अध्र्या तासाने म्हणाला, ‘‘डॉक्टर हिचा हट्टच आहे तर करून टाका ना.’’ मी रक्तस्रावाची भीती घातली, रक्ताची बाटली आणावी लागेल अशी अट घातली पण ही काही बधेना. सात दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल, असे सांगितले. पण हिचा स्त्रीहट्ट काही हटेना आणि शेवटी त्या चुकचुकणाऱ्या पलीकडे दुर्लक्ष करीत मी शस्त्रक्रियेचा दिवस ठरवला. त्याची कथा पुढच्या लेखात.
-रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस : रक्ताचे विकार : भाग १
‘रक्तं जीव इति स्थिति:’ याचा विचार वैद्य डॉक्टरांनी डोळय़ांसमोर सतत ठेवावयास हवा. वात, पित्त व कफ तीन प्रमुख दोष शरीराचे नियंत्रण करीत असले तरी सर्व कार्य रक्ताद्वारेच होत असते. रक्त कमी झाले, बिघडले, वाढले तरी शरीराचा ‘कारोबार’ बिघडतो. त्याकरिता पुढील आठ पोटविषयांचा अभ्यास आपण या लेखात करत आहोत. त्यातील काही विकार आहेत, काही नुसतीच लक्षणे आहेत. तरीपण ‘स्वास्थ्यरक्षण व रोगनिवारण’ याकरिता त्यांचा सखोल विचार हवाच. नाकातून रक्त येणे, डोळे लाल होणे, रांजणवाडी, थुंकीतून रक्त पडणे, अंगावर लाल ठिपके येणे, संडासवाटे रक्तपडणे, रक्तस्राव न थांबणे, रक्ताचा कर्करोग. माझा आयुर्वेदाच्या शिक्षणात, प्रत्यक्ष शिक्षणाचा- महाविद्यालयाचा भाग नगण्यच होता. त्यामुळेच की काय प्रत्यक्ष रुग्णांनी मला भरपूर उपचार करावयास संधी देऊन माझ्या शिक्षणात भरघोस मदत केली. आजही करीत आहेत. अकलूजचे एक शेतकरी काळोखे यांच्या अंगावरच्या काळय़ा डागांचा इतिहास त्यांनी ऐकवून, मुलीच्या लग्नाअगोदर या काळय़ा डागांवर उपचार करा असे आवाहन केले. रोगी बळकट, मनाची तयारी मोठी. आम्ही म्हणू तेवढे महातिक्तघृत दोन ते तीन दिवस घ्यायचे, मग आम्ही त्यांचे रक्तमोक्षण करायचो. असे पाच-पंचवीस वेळा केले. डाग दाखवायलासुद्धा शिल्लक राहिला नाही. एकदा खूप पाऊस असताना, गारठा असताना त्यांना महातिक्तघृतावर दोन दिवस ठेवून मग रक्तमोक्षण केले. ते रक्त लगेच गोठले. पाहतो तर त्यातील काही भागाचा रंग हिरवा, महातिक्तघृतासारखाच होता. याचा अर्थ आम्ही दोन दिवस दिलेला स्नेह, रस रक्ताबरोबर फिरून, रक्तमोक्षणाबरोबर बाहेर आला. यामुळे आयुर्वेदाच्या ‘रसरक्त एकत्रित फिरतात’ या सिद्धान्ताचे प्रत्यक्ष दर्शन आम्हाला पाहावयास मिळावे. आमचे मअपपं रुग्णालयात रक्तमोक्षण, जलौकावचारण, फांसण्या अशा उपचारांच्या कामांत मार्गदर्शन करणाऱ्या कर्ममहर्षी वैद्यराज पराडकरांना सहस्रवंदना!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत : ६ जून
१९१४> समीक्षक महादेव नामदेव अदवंत यांचा जन्म. लघुकथाकार म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या अदवंतांचे नाव झाले ते ‘माणुसकीचा धर्म’, ‘मनाची मुशाफिरी’ अशा लघुनिबंध संग्रहांमुळे. सहा शाहिरांचे ‘पैंजण’, ‘विनायकांची कविता’, ‘दहा कथाकार’ अशी संपादने त्यांनी केली.
१९४५> कथाकार आनंद विनायक जातेगावकर यांचा जन्म. ‘मुखवटे’, ‘अस्वस्थ वर्तमान’, ‘ज्याचा त्याचा विठोबा’ या कथासंग्रहांखेरीज महाभारतावर आधारित दोन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘कैफियत’ला राज्यशासनाचा पुरस्कार (२०११-१२) जाहीर झाला आहे.
२००२ > कवयित्री, लेखिका, अनुवादक शांता शेळके यांचे निधन. शांताबाईंच्या १०६ पुस्तकांत ‘येडबंबू शंभू’सारखी बालकविता, ‘पावसाआधीचा पाऊस’सारखा ललितरम्य लेख, असे वैविध्य सापडेल.. गीतकार म्हणून त्यांनी जगण्याचा मोठा पट कवेत घेतलाच, पण ललितलेखांतून त्या व्यक्त होत राहिल्या. वर्षां, गोंदण, पूर्वसंध्या, इत्यर्थ (काव्यसंग्रह), धर्म, पुनर्जन्म (कादंबऱ्या), अनुबंध मुक्ता, प्रेमिक (कथासंग्रह) वडीलधारी माणसे (व्यक्तिचित्र) धूळपाटी (आत्मपर), मेघदूत, जपानी हायकू (अनुवाद) अशी बहुविधा त्यांनी लीलया हाताळली.
– संजय वझरेकर