काही शेतकरी रासायनिक खते आणि कीडनाशके याऐवजी गोमूत्राचा वापर करतात. शेतातील टाकाऊ पदार्थ (गव्हाचा भुसा, पऱ्हाटीची धसकटे, ज्वारीचे धांडे) तसेच तुऱ्यावरील तणे आणि अन्य झाडे (लॅन्टाना, रानटी झुडपे) यांपासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी गोमूत्राचा उपयोग होतो. जुने गोमूत्र जास्त परिणामकारक ठरते. ताजे गोमूत्र फवारल्यास पानांना इजा होते आणि रोपटी कोमेजतात किंवा पाने गळतात. अलीकडे गोमूत्राचा वापर सेंद्रीय शेतीसाठी पंचगव्य, जीवामृत आणि अमृतपाणी यासाठी मोठय़ा प्रमाणात होत आहे. गोमूत्रात ७०-८० टक्केपाणी असले तरी फॉस्फेट ऑफ युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, काबरेनेट आणि पोटॅश अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, काबरेलिक आम्ल, हिपुरिक आम्ल, लॅक्टोस आणि महत्त्वाची संप्रेरके असतात. ही रसायने झाडांच्या वाढीसाठी पूरक ठरतात.
पिकांवर फवारण्यासाठी गोमूत्राच्या १०-१५ टक्के पाण्यातील द्रावणात इतर पदार्थ (उदा. हिंग) आणि थोडे साबणाचे पाणी मिसळावे. कडुनिंब, जंगली एरंडी, निरगुडी, शेवंती, कण्हेर, निलगिरी, तंबाखू, कांदा, मिरची इत्यादी वनस्पतींची पाने, फळे बारीक कापून किंवा वाटून गोमूत्रात टाकावे. कडुनिंबाचा ५ टक्के पाण्यातील थंड अर्क आणि इतर वनस्पतींचा गरम अर्क (५-१० टक्के) गोमूत्रात मिसळल्यास फवारणी जास्त परिणामकारक ठरते. तसेच गोमूत्रावर आधारित व्यापारी कीडनाशकेही सध्या बाजारात मिळतात. त्याचप्रमाणे वनस्पतीजन्य पदार्थ, विशेषत: कडुिनब, वापरून ५० पेक्षा जास्त कीडनाशके तयार होऊ शकतात. या कीडनाशकांसोबतही गोमूत्राचा वापर सरस ठरतो. या मिश्रणाची फवारणी केल्यास दोन्हीमधील रासायनिक घटक एकत्र येतात (मात्र या मिश्रणात रासायनिक कीडनाशके टाकू नयेत). यामुळे किडी व रोगराईचे प्रमाण कमी होते. झाडांना थोडय़ा प्रमाणात अन्नद्रव्येही मिळाल्यामुळे झाडाची अवर्षणाविरुद्ध क्षमता वाढते आणि खताची मात्रा लांबणीवर टाकता येते.
िहगाच्या वासामुळे किडीची मादी अंडी कमी प्रमाणात टाकते. उडणाऱ्या किडी वासामुळे दूर जातात. किडीची वाढ खुंटते, त्यांच्या जीवनावस्थेत अडथळा येतो, त्यांची प्रजनन क्षमता कमी होते.. इत्यादी बाबी गोमूत्र व वनस्पतीजन्य पदार्थाच्या मिश्रणामुळे शक्य होतात आणि पिकाचे नुकसान कमी होते किंवा टळते.
– डॉ. रु. तु. गहूकर (नागपूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा