सिंधी/ लालसिंधी, सहिवाल, गीर, देवणी, करणस्विस, हरियाणा, ओंगले, थारपारकर इत्यादी जाती या गायींच्या देशी जाती आहेत. यापैकी सिंधी जातीचे मूळस्थान पाकिस्तानातील हैद्राबाद प्रांत (सिंधप्रांत) तसेच कराची हा भाग आहे. कपाळ किंचित पुढे फुगलेले, डोळ्यांमधला भाग रुंद, नाकपुडय़ा रुंद, डोळे मोठे, पुढे आलेले, रंग विटाच्या रंगासारखा गर्द लाल, िशगे आखूड जाड, मानेखाली लोंबती पोळी, आचळाचा आकार मोठा, स्तन मोठे ही वैशिष्टे या गाईंत आढळतात. या गाई एका वेतात ५,४५० लिटर दूध देतात. त्यात स्निग्धांशाचे प्रमाण ४.७ टक्के असते.
गीर (काठेवाडी, सुरती, दख्खनी) जातीचे मूळस्थान जुनागड (गुजरात)मधील गीरचे जंगल व काठेवाडीचा दक्षिण भाग आहे. त्यांचा आकार मध्यम, शरीर प्रमाणबद्ध, बांधा मजबूत, खांदा मोठा, कपाळ फुगलेले, डोके फुगलेले, डोळे खोल गेलेले, कान लांब व लोंबते, रंग गर्द लाल, मान जाड, आचळ मध्यम आकाराचे असतात. या जातीचे बल शेत कामासाठी वापरतात. या गाई एका वेतात १,७०० ते १,८०० लिटर दूध देतात.
देवणी (डोंगरपट्टी) जातीच्या गायीचे मूळस्थान उस्मानाबाद, लातूरमधील देवणी गाव, कर्नाटकमधील बिदर जिल्ह्य़ातील भालिका तालुका हा भाग आहे. यांचे शरीर ऐटदार, कान लांब व खाली मागे वळलेले, रंग पांढरा, पाय जाड मानेखाली मोठी पोळी, बेंबीचा भाग लोंबता, शेपटी लांब असते. या गाई एका वेतात ९०० ते १,८०० लिटर दूध देतात.
करणस्विस या गायीचे मूळस्थान कर्नाल (हरियाणा) हा भाग आहे. सहिवाल गाय आणि ब्राऊन स्विस बल यांच्या संकरापासून ही गाय तयार केली आहे. यांचे कपाळ फुगलेले व पसरट, कान लहान, मान मध्यम, खांदा नसतो, रंग तपकिरी, अंगावर पांढरे ठिपके, शेपूट लांब, आंचळ मोठे असते. या जातीच्या बलाचा कठीण कामासाठी उपयोग होतो. या गाई एका वेतात ३,३०० ते ३,५०० लिटर दूध देतात. यातील स्निग्धांशांचे प्रमाण ४.७८ टक्के असते.

जे देखे रवी..   – पशुपक्ष्यांची ज्ञानेश्वरी झ्र्१
मागच्या दोन लेखांत ब्रह्म, ज्ञान, विज्ञान, अज्ञान असले विषय म्हणजे जरा भारीच झाले. माझ्याकडे नसलेली विद्वत्ता ओसंडून वाहत होती. अमृतानुभवात असल्या विवेचनावर एक मोठी बहारदार ओवी आहे.
म्हणून माझे भाषण। मौनाचेही करी मौन। हे पाण्यावरी रेखाटन। मगरीचे।।
त्यातले पहिले दोन चरण सोडा, पण नंतरची प्रतिमा बघा. डोळ्यासमोर मगर येते. पशूही निवडला मगरीसारखा. मगरमिठी मारणारी ही मिठी आयुष्याबद्दलची असणार. केवढा शब्दांचा डोंगर रचतो आपण आयुष्यात, पण हे रेखाटन पाणी पुसतेच. असा अर्थ मला भावला. अ‍ॅनिमल प्लॅनेट किंवा नॅशनल जीओग्राफिक या वाहिन्या दर्जेदार नक्कीच. या वाहिन्या आपल्याला ज्ञानेश्वरीत तर दिसतातच, पण डोक्याला न सतावता मोठी समजूत घालतात. ज्ञानेश्वरी हे एक भरगच्च काव्य, तेही तत्त्वज्ञानावरचे, पण त्यात जेवढे पशुपक्षी हजेरी लावतात तेवढे कोठल्याही असल्या प्रकारच्या पुस्तकात जगाच्या इतिहासात कधीही झालेले नाही.
ज्ञानेश्वरीत सुरुवात होते हत्तीपासून. हा एके काळचा पशूंचा पती. तो पुढे गणपती झाला. गण म्हणजे लोक. गणपतीच्या डोळ्याला उन्मेष सूक्ष्म इक्षणू असा शब्दप्रयोग ज्ञानेश्वरांनी केला आहे. डोले लहान आहेत (सूक्ष्म), पण त्याचा उन्मेषाशी संबंध आहे आणि उन्मेषाचा अर्थ जाण असा दिला आहे. ईक्षू म्हणजे बघणे, अवलोकन करणे असा अर्थ आहे. हे बारीक डोळे म्हणूनच एखाद्या दुर्बिणीसारखे दूरवरचे बघणारे, ज्ञान देणारे इंद्रिय आहे. आपल्यात लहान डोळे बुद्धिमत्तेचे आणि मोठे डोळे सौंदर्याचे लक्षण समजले जाते, तसेच विशाल भालप्रदेश किंवा कपाळ हे बुद्धिमत्तेचे लक्षण समजतात. ते हत्तीला किंवा गणपतीला असतेच.
मग येतो चकोर. कोशात याचा अर्थ Greek Partridge असा दिला आहे. याची ग्रीसमधली एक पुसट गोष्ट आहे. याला मेणाचे पंख होते. आईबापांनी समजून सांगितले की, तू उन्हात भराऱ्या मारू नकोस, पण हा उडालाच. मेण वितळले आणि हा धबाकदिशी झाडावर आपटला. मग फक्त चंद्रकिरणांवरच अवलंबून राहिला. याच्या गर्वाचे घर खाली झाले आणि मन मऊ झाले. ओवी म्हणते
जैसे शारदियचे चंद्रकळे। माजी अमृतकण कोंवळे।
ते वेचिती मने मवाळे। चकोर तलगे।।
शरदऋतूच्या चंद्राच्या किरणातले अमृतकण मन मवाळ करून चकोराची पिल्ले वेचतात, अशी कल्पना आहे. माणसाने गीता हळुवारपणे चित्तात आणून या तऱ्हेने तिला वेचावी असा सल्ला दिला गेला आहे. तलगे म्हणजे पिल्ले.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस   – युरिक अ‍ॅसिड : एक वाढता आजार
माझ्या चाळीसचेवर चालत आलेल्या वैद्यकीय व्यवसायात; युरिक अ‍ॅसिडचे रुग्ण फार पूर्वी नाममात्र असत. वर्षांत एखादा. अलीकडे अशा रुग्णांची संख्या भूमितीश्रेणीने वाढली आहे. रुग्णमित्रमंडळी युरिक अ‍ॅसिडचे रिपोर्ट आणतात. ते ७च्या वर ८ ते १० पर्यंत असते. त्यांना पावलात, गुडघ्यात तीव्र वेदना असतात. आपला त्रास सांगताना ते वारंवार ‘संधिवात-संधिवात’ असा जप करत असतात. असा पहिला रुग्ण मी केव्हा पाहिला हे मला आठवत नाही, पण या रोगग्रस्त रुग्णांचे व माझे सुदैव म्हणून मला या पहिल्यावहिल्या युरिक अ‍ॅसिडग्रस्त रुग्णाच्या पावलाचा स्पर्श समजून घेण्याची बुद्धी झाली. स्पर्श गरम होता. नेहमीच्या फिजीशियनच्या औषधाने रोगलक्षणे कमी न होता युरिक अ‍ॅसिड वाढलेच होते. मी रुग्णाला त्याच्या मूत्राचे प्रमाण, दाह याबद्दल माहिती घेतली. वैद्यक व्यवसायाचे मर्म, मी रुग्णाच्या लक्षणांच्या अभ्यासाकडे आहे असे मानतो. डोळ्याला झापडे लावल्यासारखी मी वातविकाराची औषधे; तीक्ष्ण उष्ण औषधे सर्रास देत नाही. या विकारात पावलाचा स्पर्श गरम असल्यामुळे व लघवीचे प्रमाण कमी आहे असे पहिल्यावहिल्या रुग्णाने सांगितल्यामुळे मी ‘नेहमीचे वैद्यक प्रवाहाचे विरुद्ध’ औषध योजना केली. तेव्हापासून अशा युरिक अ‍ॅसिडग्रस्त रुग्णांना एका आठवडय़ाच्या उपचारानेच खूप बरे वाटते असा १०० टक्के रुग्णांचा अनुभव जमेस आहे. चंदन हा स्त्रियांचा खास मित्र आहे. चंदनाचे खोड उगाळून त्याचे गंध सकाळ-सायंकाळ एक चमचा घेतल्यास लघवीची आग कमी होते, तिडिक मारणे बंद होते, पावलाचा गरम स्पर्श नाहीसा होतो; असे अनुभव नेहमीच येतात. संधिवाताची नेहमीची सिंहनाद, लाक्षादि, त्रिफळा, आभादि गुग्गुळ अशी औषधे न देता एकदम नवी कोरी पुढीलप्रमाणे उपाययोजना करत आलेलो आहे व रुग्णांचा दुवा घेत आहे. गोक्षुरादिगुग्गुळ व चंदनादिवटी ६ व चंद्रप्रभावटी ३ गोळ्या, रसायनचूर्ण ३ ग्रॅम, उपळसरीचूर्ण दीड ग्रॅम या प्रमाणे २वेळा घेणे. बाह्य़ोपचारार्थ चंदनबलातेल गरजेप्रमाणे सकाळ-सायंकाळ लावणे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत-   २४ जुलै
१८५६> इतिहास व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, चरित्रलेखक, कादंबरीकार चिं. गं. भानु यांचा जन्म. हर्बर्ट स्पेन्सरचे नीतिशास्त्रविषयक निबंध त्यांनी मराठीत आणले. ‘नाना व महादजी’ ही लेखमालाही ग्रंथरूप झाली.
१९१७> तत्त्वचिंतक, विचारवंत प्रा. दि. य. देशपांडे यांचा जन्म. सांकेतिक तर्कशास्त्र, नीतिशास्त्राचे प्रश्न, तत्त्वज्ञानाच्या मूलभूत समस्या अशी पुस्तके त्यांनी लिहिली. ‘देकार्त: चिंतने मानवी ज्ञानाच्या सिद्धान्ताविषयी’, ‘मूरचे तत्त्वज्ञान’ हे त्यांनी केलेले अनुवाद ग्रंथरूप झाले.
१९३२> ‘काळे बेट लाल बत्ती’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘लव्हबर्ड्स’, ‘विकत घेतला न्याय’ ‘झुंज’ तसेच ५००वर प्रयोग झालेले ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकांचे लेखक मधुकर तोरडमल यांचा जन्म. ते दिग्दर्शक व अभिनेताही आहेत.
१९७१> प्राणी व वनस्पतीशास्त्राबद्दल लेखन करणारे विष्णु नारायण गोखले यांचे निधन. ‘सृष्टिज्ञान’ मासिकासाठी त्यांनी सातत्याने लेखन केले. शास्त्रीय काटेकोरपणा पाळूनही मराठीत साधे-सरळ, रंजक लिखाण त्यांनी केले.‘वनस्पतीजीवन’, ‘पशुपक्षी व इतर प्राणी’, ‘ सृष्टिनिरीक्षण (दोन भाग), ‘खनिज द्रव्ये’, ‘विलायतेतील अजब गोष्टी’ अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली होती.
संजय वझरेकर