उसात ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि स्यूक्रोज मिळून सर्वसाधारणत: एकूण १५ टक्के साखर असते. कोकणातल्या उसातही एवढीच साखर असते; पण त्यात स्यूक्रोजचे (स्फटिक शर्करेचे) प्रमाण बरेच कमी, म्हणजे केवळ ९ ते १० टक्के इतकेच असल्यामुळे साखर किंवा गूळ करण्यासाठी कोकणातला ऊस कुचकामाचा ठरतो. सध्या कोकणात उसाचा उपयोग फक्त रसासाठीच करतात, पण हा ऊसही देशावरूनच येतो, आणि तो दुरून आणावा लागत असल्याने रसवंतीवाल्यांना तो प्रति टन रु. ४००० इतक्या चढय़ा भावाने घ्यावा लागतो.
कोकणात ऊस लागवड करण्याची एक नवी पद्धती प्रस्तुत लेखकाने विकसित केली आहे. साधारणत: एप्रिलच्या मध्याच्या सुमारास प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये उसाचे डोळे लावून केलेली रोपे जून १५च्या सुमारास शेतात लावल्यास या उसाला नोव्हेंबपर्यंत पाणीच द्यावे लागत नाही. कोकणातली हवा दमट असल्याने त्यापुढेही फक्त महिन्यातून एकदा पाणी दिले तरी चालते. डिसेंबरच्या पुढे आपण हा ऊस रसासाठी काढू शकतो.
चांगल्या जमिनीत लावलेल्या आणि चांगली मशागत केलेल्या उसाचे उत्पन्न प्रति हेक्टर १०० टनांच्या पुढे जाते, तर अगदी डोंगरउतारावरच्या हलक्या जमिनींमध्ये लावलेल्या उसापासूनही हेक्टरी ४० ते ५० टनांचे उत्पन्न मिळते. स्थानिक रसवंतीवाले तो प्रति टन रु. २५०० ते ३००० ला आनंदाने घेतील. याशिवाय इंधननिर्मितीसाठीही हा ऊस वापरता येईल. एक टन उसापासून सुमारे ७५ लिटर एथानॉल किंवा सुमारे २०० घनमीटर बायोगॅस मिळेल. बायोगॅस निर्माण करण्यावर कोणतेही र्निबध नाहीत, त्यामुळे आपण शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेऊन आपल्या उद्योगात वापरण्यासाठी त्यापासून बायोगॅस निर्माण केल्यास आपल्याला एक टन उसापासून ७० किलोग्रॅम एल.पी.जी. इतकी ऊर्जा मिळेल. औद्योगिक एल.पी.जी.चा भाव प्रति किलोग्रॅम रु. ८० धरल्यास या बायोगॅसची किंमत रु.५६०० होते. देशावरही दुर्गम पर्वतीय भागात याच पद्धतीने ऊस पिकविता येईल. या भूभागातल्या उसात स्फटिक शर्करेचे प्रमाण चांगले असते, पण वाहतुकीच्या अडचणीमुळे जर तो साखर कारखान्यांपर्यंत नेणे शक्य होणार नसेल, तर स्थानिक पातळीवर त्याचा गूळ बनविता येईल.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा