आज आपण कामासाठी जगभर फिरतो, विविध संस्कृतींतील मिश्र टीममध्ये काम करतो. अशा वेळी मानव संसाधन (Human Resources) क्षेत्रात संस्कृतीची वेगवेगळी अंगे समजून काही मोजपट्टय़ांमध्ये बसवणे, अत्यंत आवश्यक वाटू लागले आहे.

आयबीएम ही बहुराष्ट्रीय कंपनी. सत्तरहून अधिक देशांतले कर्मचारी तिथे काम करतात. या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यावरून राष्ट्रीय संस्कृतीचे प्रारूप (Model) निश्चित करण्याचा प्रकल्प गीर्त होफ्स्टेडे (Geert Hofstede) यांनी १९६७ ते १९७३ राबवला. १९८० साली प्रसिद्ध झालेले त्यांचे निष्कर्ष हे या दिशेने केलेला एक महत्त्वाचा प्रयत्न होता. होफ्स्टेडे यांनी राष्ट्रीय संस्कृतीच्या सहा मिती ठरवून त्या ० – १०० गुणांत मोजल्या आहेत.

१. समाजातील खालच्या पातळीवरील व्यक्तीचे वरच्या पातळीवरील व्यक्तीपासून समाजमान्य अंतर (Power Distance Index). एखाद्या संस्कृतीतील असमानतेचा यावरून अंदाज बांधता येतो.

२. व्यक्तीचे समूहात स्वतंत्र अस्तित्व किती (Individualism versus Collectivism IDV). ही संख्या जितकी जास्त तितकी त्या संस्कृतीतील व्यक्ती अधिक आत्मनिर्भर असते. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या बाबतीत पुढे आहेत.

३. पुरुषी गुणांना महत्त्व (Masculinity versus Femininity MAS). याचा शब्दश: अर्थ न घेता यश, कमाई, पुढाकार घेणे असे वस्तुनिष्ठ गुण आणि विनय, अनुकंपा असे कोमल गुण यांचे तुलनात्मक महत्त्व ही मिती दाखवते. जपानमध्ये MAS सर्वाधिक आहे तर नेर्दलड्समध्ये सर्वात कमी.

४. अनिश्चितता टाळण्याकडील कल (Uncertainty Avoidance Index). स्थर्याकडे कल असणारी संस्कृती सहसा रूढी, नियम यांच्या पलीकडे विचार करताना दिसत नाही. ग्रीसमध्ये स्थर्याला अवाजवी महत्त्व दिले जाते.

५. परंपरेचे महत्त्व (Long Term Orientation versus Short Term Normative Orientation LTO) परंपरेला जास्त महत्त्व देणारी संस्कृती,  नव्या-आधुनिक गोष्टींकडे संशयाने बघते.

६. आयुष्य उपभोगण्याकडील कल (Indulgence versus Restraint IND) असा कल जास्त असणारी संस्कृती फायद्यासाठी दीर्घकाळ थांबू शकत नाही.   कर्मचारी भरती करताना, जागतिकीकरणाचे धोरण ठरवताना, किंवा दुसऱ्या देशात प्रकल्प उभारताना संस्कृतीचे मापन करण्याऱ्या या मितींचा संदर्भ वापरता येतो.

– मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

मास्ती : कन्नड लघुकथेचे जनक

आज कन्नडमध्ये लघुकथा म्हणजे ‘मास्ती’ असे समीकरण आहे. १९१० मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यांच्या काळात ‘स्टंड’ – या इंग्रजी पत्रिकेतील कथा ते वाचीत असत. या कथांत जीवनातील अनुभव ललित शैलीत सरळपणे चित्रित करण्याचा हा अनुभव त्यांनी एक वाचक म्हणून घेतला. विलक्षण प्रभावित झाले आणि मग कन्नडमध्ये नसलेला हा कथाप्रकार – अनुकरण न करता, त्यांनी कन्नडमध्ये आणला. लघुकथा या प्रकाराला त्यांनी जीवनानुभवाचा रस आणि प्राण दिला. म्हणूनच मास्ती यांना ‘कन्नड लघुकथेचे जनक’ म्हणतात. मास्ती मूलत: कथाकार. ‘रंगम्मोचं लग्न’ ही पहिली कथा १९१० मध्ये प्रकाशित झाली आणि १९२० मध्ये पहिला कथासंग्रह ‘केलवु सण्ण कथेगलु’ (काही लघुकथा) प्रकाशित झाला. शंभरहून अधिक कथा त्यांनी लिहिल्या.

गद्य व पद्य यांचे मिश्रण करून एकंदर १६ नाटके त्यांनी लिहिली आहेत. ग्रामीण भाषा, लोकसंगीत आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास यामुळे त्यांची नाटके उत्तम झाली आहेत.   ‘सावित्री’, ‘शांता’ ही पौराणिक कथेवर आधारित आहेत. ‘पुरंदरदास’ व ‘कनकदास’ – या संतश्रेष्ठांच्या जीवनावरील नाटके व ‘यशोधरा’ हे गौतमबुद्धाच्या पत्नीच्या जीवनावरील नाटक, ही कर्नाटकात लोकप्रिय आहेत. ‘कानन कोटे’ या नाटकात त्यांनी कुरुब (गुराखी) जमातीच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, त्यांची जीवनमूल्ये, तत्त्वज्ञान यांवर प्रकाश टाकला आहे.  मास्ती यांनी ‘हॅमलेट’, ‘किंगलिअर’, ‘टेम्पेस्ट’ इ. इंग्रजी नाटकांचे कन्नडमध्ये अनुवाद केले आहेत.  ‘भाव’ हे त्रिखंडात्मक आत्मचरित्र, निबंध, समीक्षाग्रंथही त्यांनी लिहिले असून विशिष्ट गद्य लेखनशैलीमुळे ते वाचकप्रिय झाले.

१९२२ मध्ये मास्ती यांचा पहिला काव्यसंग्रह ‘बिन्नाह’ प्रसिद्ध झाला. त्यांचे १३ काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून त्यात काही भावगीते , भक्तिगीते, आख्यान काव्ये आहेत. सहजसुंदर शैलीत लिहिलेली ही काव्ये लक्षणीय आहेत. ‘रामप्रिय उदांत’ या कवितेत राणीच्या, मुलांच्या व प्रजेच्या प्रेमादराला पात्र ठरलेल्या एका राजाची कथा आहे. ‘नवरात्री’ मध्ये विषयांची, कथांची विविधता आहे. नवरात्री या दीर्घकथाकाव्यात पौराणिक, ऐतिहासिक मिळून नऊ रात्रीत ऐकवलेल्या  १९ कथा आहेत. या कथाकाव्यात मास्ती जन्मजात कथाकार आहेत,य़ाची प्रचीती येते.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com