अॅसिटेट रेयॉन निर्मितीमध्ये सेल्युलोजचे सेल्युलोज अॅसिटेटमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुमारे ७ ते ८ तासांत पूर्ण होते. या टप्प्यात अॅसिटेटचे तीन रेणू सेल्युलोजमधील ग्लुकोज एका रेणूबरोबर जोडले जातात. याला ट्रायअॅसिटेट असे म्हणतात. हे ट्रायअॅसिटेटचे मिश्रण मोठय़ा भांडय़ांमध्ये काही काळासाठी साठवून त्यावर जलीय अपघटनाची प्रक्रिया (वॉटर हायड्रॉलिसिस) केली जाते. या अपघटनाच्या प्रक्रियेमुळे सेल्युलोज ट्रायअॅसिटेटमधील अॅसिटेटचे दोन रेणू बाजूला काढले जाऊन एकच रेणू उरतो. याला सेल्युलोज अॅसिटेट असे म्हणतात. अपघटनाच्या प्रक्रियेनंतर सेल्युलोज अॅसिटेट हे पांढऱ्या चकत्यांच्या किंवा खपल्यांच्या रूपात खाली बसतात.
या चकत्यांतून पाणी काढून टाकण्यासाठी त्यांचे केंद्रोत्सर्जन (सेंट्रीफ्युजिंग) केले जाते आणि नंतर या चकत्यांच्या स्वरूपातील सेल्युलोज अॅसिटेट पूर्णपणे वाळवले जाते. हे वाळवलेले सेल्युलोज अॅसिटेट अॅसिटोन या द्रावकात विरघळवण्यात येते. या द्रावणाला कताई द्रावण किंवा डोप असे म्हणतात. हे द्रावण त्यानंतर गाळून त्यामधील हवा काढून टाकली जाते. हे द्रावण नंतर सूक्ष्म छिद्रे असलेल्या तनित्रामधून तलम धारांच्या रूपात बाहेर सोडले जातात. या धारा बाहेर येताच त्यांच्यावर उष्ण हवेचे वाफारे सोडले जातात. ही उष्ण हवा तनित्रातून बाहेर पडणाऱ्या धारांच्या रूपातील द्रावणाला लागल्याबरोबर या द्रावणातील अॅसिटोन उडून जाते आणि सेल्युलोज अॅसिटेटचे तंतूंच्या रूपात घनीकरण होते. उष्ण हवेमुळे हे तंतू वाळतात आणि नंतर ते एका बॉबिनवर गुंडाळले जातात.
या तंतूंची ताकद व्हिस्कोजपेक्षा थोडी कमी असते, परंतु पाण्याने ओले केले असता व्हिस्कोजची ताकद जितकी घटते तेवढी अॅसिटेट रेयॉन तंतूंची घटत नाही. हे तंतू व्हिस्कोजच्या तंतूंपेक्षा कमी आद्र्रताशोषक असतात, परंतु पाणी एका भागातून दुसऱ्या भागात वाहून नेण्याची त्यांची क्षमता मोठी असते. सूक्ष्म जंतू व कीटक यांच्या आक्रमणाचा हे तंतू यशस्वीरीतीने सामना करतात त्यामुळे अशा तंतूंचा या तंतूंपासून तयार केलेल्या कपडय़ांवर परिणाम होत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा