पॉलिएस्टर, पॉलिअमाइड (नायलॉन) प्रमाणे तिसरा मानवनिर्मित तंतू म्हणजे अॅक्रिलिक. लोकरीमधील कमतरता लक्षात घेऊन तयार केलेला हा तंतू आता सर्वाच्या वापरात आहे. इ.स. १९४५मध्ये या तंतूची निर्मिती झाली. कॅशमिर या प्राणिजन्य तंतूशी असलेले साधम्र्य लक्षात घेऊन या तंतूला कॅश्मिलॉन म्हणून ओळखतात. अॅक्रिलिक तंतूंची निर्मिती अॅक्रिलोनायट्राईल यापासून केली. सुरुवातीला १०० टक्के अॅक्रिलोनायट्राईलपासून ही निर्मिती केली जायची. त्यापासून मिळणाऱ्या तंतूमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे पुढील कताई, विणाई, रंगाई, छपाई इ. करणे अडचणीचे ठरत होते. म्हणून विविध प्रयोग करून ८५ टक्के ते ९० टक्के अॅक्रिलोनायट्राईलबरोबर एक उदासीन एकवारिक आणि दुसरे आम्लधर्मी एकवारिक यांचा वापर करून अॅक्रिलिक तंतूची निर्मिती केली. वेगवेगळी उदासीन/आम्लधर्मी एकवारिक वापरून तंतू तयार केला जाऊ लागला. ह्या तंतूच्या लवचीकपणात वाढ होऊन द्रावणात तंतू विरघळवणे सोपे बनले. रंगाईमधील अडचणी मिटल्या आणि पुढील सर्व प्रक्रियांसाठी सुयोग्य असा तंतू निर्माण झाला. तंतू तयार करताना सह-बहुवारिकीकरणाची प्रक्रिया केली जाते तेव्हा उत्प्रेरकाचा वापरही केला जातो. एका पद्धतीत उत्प्रेरक म्हणून फेरस सल्फेटचा वापर करतात. द्रावणाचे तापमान, त्याचा सामू यावर नियंत्रण ठेवले जाते. प्रक्रिया पूर्ण होण्यास ३ ते १५ तास इतका वेळ लागतो.
या तंतूला सुरकुती पडत नाहीत. या तंतूपासून कापड यंत्रावर सहज शिवता येते. कापडाला गोळी धरण्याची क्रिया खूप कमी होते. रंगाई चांगली करता येत असल्यामुळे चमकदार आणि आकर्षक रंगात हे सूत मिळते. लोकरीचा हा मोठा दोष इथे टाळला जातो. ह्या तंतूवर आम्लांचा आणि सौम्य आम्लारींचा परिणाम होत नाही. मात्र तीव्र आम्लारीबरोबर उकळल्यास त्या द्रावणात तंतू विरघळतो. धुलाई करताना या गुणधर्माचा परामर्ष घ्यायला हवा. रंगाई केलेल्या तंतूवर सूर्यप्रकाशाचाही विपरीत परिणाम होत नाही. म्हणून रंगाचा आकर्षकपणा टिकून राहतो. कसर किंवा बुरशीचा परिणाम या तंतूवर होत नाही. या तंतूची पाणी शोषण्याची क्षमता चांगली असते, त्यामुळे घाम टिपायला त्याचा उपयोग होतो. आता बाजारात हाती विणण्यासाठी म्हणून जे लोकरीचे गुंडे मिळतात, ते बहुदा सर्वच अॅक्रिलिकचे असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा