मानवनिर्मित तंतू हे रसायने वापरूनच उत्पादित केले जातात. जशी कापडाची गरज वाढली, नसर्गिक तंतूच्या उत्पादनाच्या आणि रंगाईच्या मर्यादा माहीत झाल्या, त्या लक्षात घेऊन पुढील पावले टाकली गेली. त्याचा विचार करून त्या तंतूच्या रासायनिक रचनेशी प्रक्रिया होणारे रंग मोठय़ा प्रमाणात वापरले जाऊ लागले. या रंगांचा वापर वनस्पतिजन्य आणि प्राणिजन्य अशा दोन्ही प्रकारच्या नसíगक तंतूंसाठी करता येतो. इतकेच नाही तर वेगवेगळ्या मिश्र तंतूंकरितासुद्धा ते वापरता येतात.
रासायनिक प्रक्रियेमुळे या रंगांचा पक्केपणा इतर सर्व रंगांपेक्षा उजवा आहे. त्यामुळे याचा वापर आता सर्रास केला जातो. या रंगांची किंमत मात्र जास्त आहे. त्यामुळे रंगीत कापडासाठी, ज्या वेळी या रंगांचा वापर केला जातो, तेव्हा त्याची किंमत अधिक असते हे ओघाने आलेच. पण रंगांचा टिकाऊपणा मिळतो, त्यामुळे ही जास्तीची किंमत द्यायला ग्राहक तयार होतात.
सुती कपडय़ांच्या किमती वाढल्या, त्यामधील एक कारण हेही आहे याची सर्वानी नोंद घ्यायला हवी. रंग प्रत्येक धुण्यात फिके पडत गेले, की आपली निराशा होते. त्याचा बंदोबस्त करण्याचे काम या प्रक्रिया होणाऱ्या रंगांनी साध्य केले. त्यामुळे या रंगांचा वापर आता अग्रक्रमाने होताना दिसतो.
दीर्घकालीन फायद्याकडे लक्ष देता सुरुवातीचा जास्तीचा खर्च परवडतो असेच म्हणायला हवे. या रंगांच्या वापरामुळे आता पडद्याची बाहेरील बाजू लवकर फिकी पडणे खूप काळाने घडते. म्हणजेच पडद्यांची उपयुक्तता दीर्घकाळ टिकेल. तसेच अंगावर घालायच्या वस्त्रांबाबतीत इतर कपडय़ांना रंग लागला, अंतर्वस्त्रांना बाहेरील कपडय़ांचा रंग लागला या आणि अशा तक्रारीपण मोठय़ा प्रमाणात कमी झालेल्या आढळतात. रंगीत डाग पडून अन्य कपडे विद्रूप होण्याची वेळच आता येणार नाही, याकडे आपली वाटचाल सुरू आहे. ‘गरज शोधाची जननी’ म्हणतात त्याचा प्रत्यय इथे येतो. नवनवीन संशोधन समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधत असते, त्याचा दैनंदिन जीवनातील हा एक प्रत्यय असे म्हणावेसे वाटते.
प्रबोधन पर्व: भारतीय राज्यघटना हाच खरा धर्मग्रंथ
‘‘धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. धर्माचा अभिमान-अस्मिता-अभिनिवेश-अहंकार अधिकाधिक बलवान करण्याचा प्रयत्न सर्वच धर्मात चालू आहे. देवळात जाणे, यात्रा करणे, धर्माची प्रवचने-कीर्तने, देवतांचे व धर्माचे उत्सव यांचे उदंड पीक समाजात आले आहे. त्याकडे धर्मातील सर्वसामान्य समाजच नव्हे, तर सुशिक्षित तरुण पिढीही आकर्षित झालेली दिसते. संतांनी धर्मभावना नैतिकतेकडे वळवली; ती आता धर्माधतेकडे वळवली जात आहे. शिवाय, हा सर्व अब्जावधी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करणे चालू आहे. लोकांच्या प्रश्नांवर काम करून मते मागण्याऐवजी लोकांची धर्मभावना उद्दीपित करून व ठेवून सत्तेकडे जाण्याचा राजकीय शॉर्टकट शोधला जात आहे.. धर्माचे भ्रष्टीकरण व साधनीकरण होण्याचे भय वाढले आहे, अशा वेळी तर या स्वरूपाची विधायक धर्मचिकित्सा हा महत्त्वाचा प्रश्न मानावयास हवा.’’
नरेंद्र दाभोलकर ‘समता-संगर’ (जून २०१४) या पुस्तकातील ‘चिकित्सेचे धर्मकारण का प्रसिद्धीचे राजकारण’ या लेखात म्हणतात – ‘‘महाराष्ट्रातील आजच्या प्रबोधनातून हा प्रश्न जवळजवळ रद्दबातल झाला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या अंगाने तो उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तरी धर्माचे अघोषित प्रवक्ते त्याला तीव्र व हिंसक विरोध करतात. ‘समाजाचे धारण करतो तो धर्म’ ही आदर्श धर्माची व्याख्या झाली. जगात असा आदर्श धर्म कुठेही नाही. पण प्रत्येक धर्म स्वत:ला आदर्श मानतो. समाजाचे कल्याण कशामुळे होते; ते प्रत्यक्षात होते की नाही, हे प्रत्येक धर्म स्वत: ठरवत असतो.. धर्मासंबंधातील वादाचा खरा मुद्दा आदर्श धर्म कसा असावा हे सांगणे नाही तर धर्म आदर्श नसल्यास तसे ठरवावे कोणी आणि ते बदलावे कोणी, हा आहे. कोणताच धर्म असे अधार्मिक व धर्मद्रोही प्रश्न उपस्थित करू देणार नाही. भारताची राज्यघटना आज समाजाची धारणा करते, म्हणून राज्यघटनेला धर्मग्रंथ मानण्यास व त्यातील आदेशाला धर्म मानण्यास कोणताही धार्मिक तयार होत नाही.’’
मनमोराचा पिसारा: गूढवाद आणि विज्ञान यांचा परस्पर समन्वय
या सदरात इंग्रजी पुस्तकांविषयी दर शनिवारी लिहायचे ठरल्यानंतर मनात अनेक नव्या-जुन्या पुस्तकांची गर्दी झाली. त्यापैकी मनाला वळण आणि दिशा दाखवणाऱ्या एका पुस्तकाविषयी लिहिल्याशिवाय प्रस्तुत लेखमाला संपवायची नाही, असं मनोमन ठरवलं. म्हणून आता ‘द ताओ ऑफ फिजिक्स’विषयी.
पुस्तकाच्या वाचनातून काही मानसिक प्रश्न सुटले पाहिजेत आणि नवे उपस्थित झाले पाहिजेत. ललित लेखनातील नायक-नायिकांच्या जीवनातील चढ-उतार वाचताना आपले मन सहजपणे त्यांच्याबरोबर चालू लागते. म्हणून कधी गहिवर दाटतो तर कधी खुदकन हसू येते.. कधी करुणा, कधी शांत. परंतु या भावनिक अनुभूतींपलीकडे मनातल्या मूल्यांची बैठक असते. तिथपर्यंत पोहोचणाऱ्या पुस्तकामध्ये विलक्षण सामथ्र्य असतं. फ्रिट्जॉफ काप्रा यांचे ‘द ताओ ऑफ फिजिक्स’ पुस्तक असं आहे. ते वाचताना काप्रा यांच्या स्पष्ट आणि धारिष्टय़पूर्ण विचारांनी मन भरून येतं. काप्रा यांनी बुद्धी आणि भावना यांना प्रभावीपणे हात घातला आहे.
अनेक र्वष एक प्रश्न सातत्यानं छळत होता. एका बाजूला जडवादी, इहवादी, तर्कनिष्ठ विचार आणि दुसऱ्या बाजूला चैतन्यवादी, आध्यात्मिक, गूढवादी या वैचारिक बैठकांची मनात रस्सीखेच चाले. दुसरं असं की, जड-अचेतन वस्तूंपासून जिवंत नि जगण्याला उत्सुक, सजीवांची निर्मिती कशी होते? या अचेतन कणांमध्ये अणू-रेणूंमध्ये कोणते असे गुणधर्म असतात? त्यांच्या सुसूत्र एकीकरणामुळे त्यांच्यामध्ये जीवनचैतन्य निर्माण होतं? त्याचप्रमाणे मनात आणखीही काही प्रश्न होते. जडवादी, इहवादी विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगती करून सृष्टीची न भरून येणारी वाताहत का व कशी झाली?
सृष्टीचा अभ्यास करताना शे-पाचशे वर्षांपूर्वी प्रत्येक वस्तूचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी बारीक बारीक तुकडे करा. त्या तुकडय़ांचा अभ्यास केल्यास त्या संपूर्ण वस्तूंचे गुणधर्म समजून येतील असा विघटनवादी देकार्तचा विचार आधारभूत ठरतो. ज्याप्रमाणे घडय़ाळातील अनेक लहान-मोठी चकं्र आणि घटक एकत्र करून त्यांना चालना दिली की घडय़ाळ सुरू होते, त्याप्रमाणे सर्व सृष्टी चालते. पण मनाचे चलनवलन, जीवनातले स्वारस्य, श्रेयसप्रेयस यांचा ध्यानधारणेमार्गे अभ्यास करताना येणाऱ्या प्रशांत, गूढवादी अनुभवांचा अर्थ उलगडत नव्हता.
बुद्धप्रणीत विचारांमध्ये आंगिक अनुभवांच्या अनित्यतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारीरिक, इंद्रियप्रणीत संवेदना उद्भवतात आणि लय पावतात. त्यांच्या क्षणभंगुरतेचा अनुभव येतो. मनामध्ये उद्भवणारे शेकडो विचार, भावना विलक्षण गतिशील असतात. त्यांच्या जाणिवेविषयी मन संभ्रमित होत असे.
गूढवादी आणि विज्ञानवादी विचार परस्परविरोधी आणि एकमेकांशी पूर्णपणे फटकून असतात असा समज झाला. मन या वैचारिक रस्सीखेचीमुळे हैराण होत असे. अशा मानसिक अवस्थेत असताना काप्रा यांचे ‘द ताओ ऑफ फिजिक्स’ वाचू लागलो आणि हादरलो. क्वांटम फिजिक्स, न्युक्लिअर फिजिक्स अशा पूर्णपणे वैज्ञानिक विचारांवर, संशोधनाधिष्ठित काम करणाऱ्या काप्रा यांनी या दोन परस्परविरोधी विचारधारांचा धक्कादायक समन्वय साधला आहे. त्यामुळे पार्टिकल वेव्ह थिअरी, नील बोहर, रुदरफोड, हायडेनबर्ग ही नावं मित्रांचीच आहेत असं वाटू लागलं.
सजीव अथवा निर्जिव सृष्टीचे पूर्ण आकलन मेकॅनिस्टिक मॉडेलच्या वापरानं नव्हे तर संपूर्णवादी (होलिस्टिक) विचारांच्या मदतीनं करता येते. देकार्तनं द्वैतवादी (आपण आणि सृष्टी वेगवेगळे) विचारांवर आधारित विज्ञानाचा पाया घातला, तर अध्यात्मामध्ये (ताओ झेन वेदान्तप्रणीत) अद्वैतवादानं जीवनाचे प्रश्न सुटतील असं म्हटलं आहे. ताओ म्हणजे प्रवाहीपणा. झेनमध्ये क्षणाच्या अनुभवात ‘स्व’चं विसर्जन आणि वेदान्तामधील ‘स्व’ आणि चैतन्य (सत्य) यांच्यातील अद्वैत आहे. माननीय विज्ञानाचा असा अभ्यास पदार्थ विज्ञानाला पोषक आहे. हे दोन विचारप्रवाह एकरूप होऊ शकले तर सृष्टीचा विनाश थांबवणारं, टिकाऊपणाला टिकवणारं विज्ञान निर्माण होऊ शकतं, असं काप्रा म्हणतात.
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com