सुप्रसिद्ध संशोधक रिचर्ड फाइनमन यांनी कॅल्टेक इथल्या आपल्या भाषणात म्हटलं होतं की, विज्ञानाच्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन न करता एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या शास्त्रीय कोशाच्या सर्व खंडांमध्ये दिलेला मजकूर टाचणीच्या एका टोकावर लिहिणं भविष्यात शक्य होईल. त्याकाळी फाइनमन यांचं ते विधान म्हणजे परिकल्पना वाटली होती; पण आता मात्र हे शक्य झालं आहे ते नॅनो तंत्रज्ञानामुळे!
नॅनो पदार्थाचा वापर करून तयार केलेली उपकरणं अत्यंत वेगवान आणि कार्यक्षम असतात. उदाहरणार्थ, सुमियो जिजीमा या जपानी शास्त्रज्ञाने तयार केलेल्या कार्बन नॅनो टय़ुब्ज पोलादी तारांपेक्षा शंभर पटींनी मजबूत असल्याचं आढळून आलं आहे. तसंच त्यांची उष्णता आणि विद्युत वाहन क्षमतासुद्धा खूप जास्त आहे. कार्बन नॅनो टय़ुब्ज वापरून तयार केलेले सौरविद्युत घट अतिशय कार्यक्षम असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे. त्यामुळे भविष्यात सौरऊर्जेचा मोठय़ा प्रमाणावर वापर होण्याची शक्यता वाढली आहे.
आज जवळ जवळ सर्वच पदार्थाची, मग ते धातू असोत, अधातू असोत, अर्धवाहक असोत किंवा प्लास्टिकसारखे मानवनिर्मित पदार्थ असोत त्यांची नॅनो रूपं बनवली जात आहेत. इतकंच नाही तर हे नॅनो पदार्थ वापरून हळूहळू औषधं, कापड, रंग बनवण्यास आता सुरुवात झाली आहे. सोन्याच्या नॅनो कणांचा उपयोग करून तयार केलेले संवेदक अत्यंत कमी प्रमाणात असलेल्या शिसे, पारा यासारख्या जड धातूंचं अस्तित्व शोधून काढू शकतात.
इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक क्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानामुळे अभूतपूर्व क्रांती झाली आहे. संगणकाचा वेग आणि माहिती साठवून ठेवण्याची क्षमता यांमध्ये नॅनो तंत्रज्ञानामुळे प्रचंड वाढ झाली आहे. खूप मोठय़ा आकाराचं पण अत्यंत कमी जाडीचं स्क्रीन तयार करणं ह्य़ा तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आहे. स्मार्टफोनला असलेले अत्याधुनिक टचस्क्रीन्स तयार करतानासुद्धा नॅनो तंत्रज्ञान वापरलं जात आहे.
भारतात नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने जैवतंत्रज्ञान क्षेत्र आणि औषधनिर्मिती उद्योगांमध्ये दिसून येतो. केंद्र सरकारच्या Defense Research and Development Organization [DRDO] या संस्थेने नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून क्षय आणि विषमज्वर या रोगांचं निदान करण्यासाठी उपयुक्त ठरणारी उपकरणं तयार केली आहेत.
मनमोराचा पिसारा: तेंचि पुरुष दैवाचें
एकूणच पाश्चात्त्य जगतात ‘वसंता’मध्ये प्रणय बहरतो. विरहिणीची व्याकूळता विरून जाते आणि उत्कट शृंगार फुलून येतो. विदेशी गाण्यामधला हा वसंत आपल्याकडे वर्षांऋतूमध्ये बहरतो.
पावसात भिजलेली धुंद गाणी या दिवसात पदोपदी कानी पडतात. भिगी भिगी रात, झूमकर बरसनेवाले बादल, रिमझिमके तराने ऐकून या पावसाळ्यातला प्रत्येक क्षण मनात विलक्षण शृंगारिक झिंग निर्माण करतो.
ऋतुसंहारात कालिदासाने वर्षांऋतूचे कित्येक गुलाबी पैलू लीलया उलगडले आहेत.
अलीकडच्या काळातही अतिशय ‘बोल्ड’ वाटू शकेल असं नाटय़गीत याच पावसात भिजलेलं आहे.
नाटक आहे ‘मृच्छकटिक’. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातली ही गोष्ट अतिशय रंजक आहे.
चारुदत्त आणि वसंतसेना यांच्या प्रणयाभोवती रचलेले हे भास यांचे नाटक.
मृच्छकटिकाच्या मराठी आवृत्तीमधले हे नाटय़गीत थाटामाटात स्त्री-पुरुष भेटीचे बिनधास्त वर्णन करते आणि तेही गंभीर मालकंसात! कोणाचे भाग्य कशाने उजळेल, हे कोणी सांगू शकत नाही. स्त्रियांचे सौभाग्य पराक्रमी पुरुषाचे स्वामित्व स्वीकारण्यात आहे, असे म्हणत त्या काळात पुरुषाचे भाग्य कशात? याची गंमत या नाटय़गीतात आढळते.
तेंचि पुरुष दैवाचें
धन्य धन्य जगी जाहले
अंग भिजली जलधारांनी
ऐशा ललना स्वये येऊनी
देती आलिंगने
ज्या धावुनि
थोर भाग्य त्यांचे..
‘आज रपट’ या गाण्यातदेखील मुखडय़ा आणि अंतऱ्यानंतर अंगे भिजली जलधारांनी अशा स्मिता पाटीलला अमिताभ बच्चन आलिंगन देतो. त्यापेक्षा सरस भाग्य चारुदत्ताचे आणि त्या काळातल्या पुरुषांचे.
त्यांना स्त्रियांचे प्रणयाराधन न करताच, भिजल्या अंगाने युवती आलिंगन देतात. आधीच चारुगात्री ललनेने पुरुष घायाळ झालेले असतात. त्यात जलधारांनी न्हाऊन निघालेली ओलेती कोमलांगी म्हणजे सौदर्याचे, शृंगाराचे मूर्त रूप. अंगे भिजल्याने ती मदालसा अधिकच उत्कट होते. अंगाचे सौष्ठव कसेबसे जपत ती आत्मार्पणाला उत्सुक होते.
मर्दानी पुरुषाच्या बलदंड शरीरयष्टीकडे पाहून तिला शृंगाराचा उमाळा न आला तर नवलच. त्यामुळे तशा ललना स्वत:हून धावत येऊन पुरुषांना उबेकरता बिलगतात. अहाहा! या परीस आणखी भाग्याचा क्षण तो कोणता?
भारतीय वाङ्मय परंपरेत उत्कट प्रणय आणि शृंगाराची चमकदार रत्ने आहेत, पैकी हे एक. तेही मराठीत आणि जाहीर नाटय़प्रयोगातून हे मुक्तपणे व्यक्त होते.. आहे की नाही?
संगीत-गीत : गोविंद बल्लाळ देवल, स्वर- प्रभाकर कारेकर,
नाटक- सं. मृच्छकटिक,
राग- मालकंस, ताल- त्रिताल.
डॉ.राजेंद्र बर्वे
प्रबोधन पर्व: अण्णासाहेब िशदे – ‘शेती ज्ञानाचा चालता बोलता ज्ञानकोश’
हरित क्रांति आणि धवल क्रांती ही अण्णासाहेब िशदे (१९२२- १९९३) यांनी देशाला व महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. नाशिक जिल्ह्य़ातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी अहमदनगर जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात भूमिगत राहून स्वतंत्र्याच्या चळवळीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी वर्गामध्ये जागृती निर्माण केली. संगमनेर, अकोले तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जाची तहकुबी मिळवून देण्यासाठी मामलेदार कचेरीवर मोर्चा नेणे, शेतकऱ्यांच्या खंड वाढीसाठी चळवळ करणे अशा अनेक चळवळीत त्यांचा लक्षणीय सहभाग होता. १९६२ साली लोकसभेत ते खासदार म्हणून गेले आणि ६२ ते ७७ या काळात त्यांनी देशाचे कृषी उपमंत्री, राज्यमंत्रिपद भूषवले.
त्यांचा उल्लेख ‘शेती ज्ञानाचा चालता बोलता ज्ञानकोश’ अशा शब्दांत ज्योती बसू यांनी केला होता, तर तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी ‘कृषी खात्याला लाभलेला उत्कृष्ट मंत्री लाभला’ असा केला होता. त्याविषयी स्वामिनाथन म्हणतात – ‘देशाच्या शेती खात्याला लाभलेले बहुतांश कॅबिनेट मंत्री राजकीय घडामोडीत व्यग्र असत त्यामुळे कृषिराज्यमंत्री अण्णासाहेब िशदे हेच देशाच्या शेती खात्याचे सर्वार्थाने प्रमुख होते’’.
तर शरद पवार म्हणतात – ‘पाण्याची टंचाई नेहमीची होती. अण्णासाहेबांनी या संदर्भात खूप लिखाण केले. शेतीला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला पाहिजे तसेच दूध पोल्ट्री रेशीम उद्योग अशा जोडधंद्यांची शेती व्यवसायाला जोड दिली पाहिजे, असा अण्णासाहेब यांचा विचार होता.’’ याचमुळे धान्य आयात करण्याच्या कल्पनेला तिलांजली देता आली आणि हरितक्रांतीचे स्वप्न साकार झाले. गव्हाच्या आणि भाताच्या बाबतीत पंजाब राज्याने जी प्रगती केली आहे त्यातील पायाभूत कामाचे श्रेय अण्णासाहेब यांच्या नावावर आहे.