‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा! आई मला नेसव शालू नवा॥’
जरीचा उपयोग कुठे आणि कशासाठी करायचा? हे वरील लावणीत ठळकपणे सांगितले आहे. विशेष प्रसंगी वापरायची वस्त्रे जसे शालू, शेले, पठण्या, पितांबर आदी वस्त्रप्रावरणे सुशोभित करण्यासाठी जरीचा उपयोग केला जातो. अशा उपयोगाची भारतामध्ये किमान दोन हजार वर्षांची परंपरा आहे.
ज्याच्यापासून तार काढता येते अशा धातूपासून तलम, अखंड तंतू काढता येतो. असा तंतू कापसाच्या अथवा रेशमाच्या सुताभोवती गुंडाळून जरीची निर्मिती केली जाते. फुलांचे हार सुशोभित करण्यासाठी वापरण्यात येणारी कलाबूत हा जरीचाच एक स्वस्तातला प्रकार आहे.
या कलेचा उगम भारतातच झाला असावा असे संशोधकांचे मत आहे. आठव्या-नवव्या शतकात बनारस व पठण ही शहरे या कामासाठी प्रसिद्ध होती. भारतातून मध्य-पूर्व आशियामाग्रे ही कला युरोपात पोहोचली. चौदाव्या शतकानंतर इटली हा देश या कामात अग्रेसर ठरला. जर निर्मितीची जुनी प्रक्रिया अंगमेहनतीवर व कौशल्यावर अवलंबून होती. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीमुळे स्वयंचलित यंत्रांचा शोध लागला आणि जरीचे उत्पादन वाढवणे शक्य झाले.
सोने, चांदी यांच्या वापरामुळे खऱ्या जरीचे कापड श्रीमंतच वापरू शकत होते. सामान्यांकरता नकली जर निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात पितळ, अॅल्युमिनियम इत्यादींचा वापर केला जातो. प्लास्टिकच्या उदयानंतर नकली जरीमध्ये प्लास्टिक जरीची भर पडली.
खऱ्या आणि नकली जरीचा उपयोग वस्त्रप्रावरणे सुशोभित करण्यासाठी केला जातो. किनारी, बुट्टे, पदर यांमध्ये जर वापरून कपडय़ाची शोभा वाढवली जाते. जरीचे प्रमाण खूप वाढल्यास ते वस्त्र वापरायला अडचणीचे ठरू शकते. उशांचे अभ्रे, गृहसजावटीचे पडदे, पस्रेस यांसारख्या वस्तूंमध्येही जरीचा वापर केला जातो. आज भारतात सुरत आणि बनारस ही शहरे जर निर्मितीमध्ये अग्रेसर आहेत. सुरतमध्ये हा उद्योग मोठय़ा प्रमाणावर असून त्यात यांत्रिक पद्धतींचा वापर अधिक होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा