एखाद्या देशाच्या औद्योगिक प्रगतीचे परिमाण एकेकाळी सल्फ्युरिक अ‍ॅसिड किती वापरले जाते यावरून ठरविले जाई. नंतर पोलाद किती वापरले जाते ते परिमाण आले आणि नंतर आले प्लास्टिकचे परिमाण. तसे पाहिले तर प्लास्टिकचे उत्पादन जगात सुरू होऊन जेमतेम ६०-६५ एवढीच वष्रे झाली आहेत आणि प्लास्टिकचे हे परिमाण व्यवहारात आले ते ३०-३५ वर्षांपूर्वीच. सुरुवातीला प्लास्टिककडे शोभेच्या वस्तू बनवण्याचा पदार्थ म्हणून पाहिले जाई. पण नंतर प्लास्टिक प्रत्येकाच्या केवळ घरातच नव्हे तर जीवनाच्या सर्व व्यवहारात गेले आहे. आणि त्याचा विस्तार अजूनही चालूच आहे.
१९२६ साली हल्लीच्या बांगलादेशातील जेसोर येथे प्लास्टिकचे कंगवे बनवायला सुरुवात झाली. नंतर १९५७ साली पॉलिकेम कंपनीने मुंबईत पॉलिस्टायरीन बनवायला सुरुवात केली. पुढे दोन वर्षांत कोलकात्याला आय. सी. आय. कंपनीने पॉलिथिलीन बनवायला सुरुवात केली. मग युनियन कार्बाईड आणि नोसिल कंपन्यांचे कारखाने मुंबईत आले. त्यांनी इथिलीन आणि त्यापासून अनेक पदार्थ बनवायला सुरुवात केली. प्रथम इथिल अल्कोहोलपासून इथिलीन बनवले जाई आणि अ‍ॅसिटीलीन वायूपासून पीव्हीसी बनवले जाई. पण मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घ्यायला कार्बनी रसायनेच हवीत आणि त्यासाठी पेट्रोलियम पदार्थाचाच उपयोग करावा लागतो. ‘मुंबई हाय’ प्रकल्पातून तेलाबरोबर मिळणाऱ्या वायूमधून इथेन आणि प्रोपेन मिळवता येतो व त्यापासून अनेक पेट्रोरसायने आणि प्लास्टिक बनवता येतात. भारतातील प्लास्टिक उत्पादनाचे दोन भाग पडतात. एका भागात रेझिन निर्मितीचे कारखाने असतात. दुसऱ्यात रेझिनपासून अनेक वस्तू बनवतात. जगात आज अनेक प्रकारची रेझिन बनतात.
महाराष्ट्रातील प्लास्टिकचे लघुउद्योग १९७३ साली सुरू झाले. त्यात पाईप, रॉड, तोटय़ा, छत्र्यांच्या मुठी, फिल्म, पत्रे, पिशव्या, रेनकोट, रेझिन, तंतू, सूत, दोऱ्या, विणलेल्या पिशव्या, लवचीक पट्टय़ा, पादत्राणे, गृहोपयोगी वस्तू याशिवाय अनेक औद्योगिक वस्तू बनतात.

प्रबोधन पर्व: समाजसत्ता आणि सत्याग्रही संस्कृती
‘‘भांडवलशाही समाजात अपरिमित भौतिक उपभोग घेणारा एक छोटा मालकवर्ग आणि त्याच्या आर्थिक दास्यात रखडणारा दुसरा बुभुक्षित बहुसंख्य सेवकवर्ग असे निर्माण होत असल्याने अशा समाजात शांततेची व नीतीची अपेक्षा करताच येत नाही. ज्या समाजातील बहुसंख्य लोकांना आपल्या जीविताची व जीवितसाधनांची मुळीच शाश्वती नाही अशा समाजात शांतता व नीतिमत्ता नांदणे अशक्य आहे. हिंदुस्थानसारख्या खंडतुल्य राष्ट्रातील पस्तीस कोटी लोकसंख्येच्या पोटापाण्याचा प्रश्न भांडवलशाहीच्या  व साम्राज्यशाहीच्या मार्गाने सोडविणे अशक्य आहे. आणि एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येची जीवितयात्रा सुखाने चालविण्याचे सामथ्र्य केवळ हस्तव्यवसायाच्या ग्रामोद्योगात अथवा छोटय़ा प्रमाणावरच्या वैयक्तिक शेतीत आहे असे वाटत नाही. शिवाय, एवढा मोठा भारतीय समाज हा केवळ आश्रमवासी ऋषीप्रमाणे भौतिक सुखाविषयी विरक्त आणि आत्मिक सुखावर संतुष्ट राहील ही गोष्टही शक्य कोटीतील नाही. या खंडतुल्य भारताचा प्रश्न सोडविण्यास भौतिक विद्या आणि यंत्रकला यांचा भरपूर उपयोग केला पाहिजे व तो धनोत्पादनाचे व धनविभाजनाचे कार्य समाजसत्तेखाली आणूनच केला पाहिजे.’’ ही समाजसत्ता येण्यासाठी आणि आल्यावरही भारताला सत्याग्रहीवर्गाची खरी आवश्यकता आहे, किंबहुना ती सर्व मानवसंस्कृतीलाच आहे हे सांगताना आचार्य शं. द. जावडेकर म्हणतात – ‘‘यापुढे भारतीय संस्कृती व मानवसंस्कृती असा भेद राहणार नाही. भौतिक दृष्टय़ा आज सर्व मानवसमाज एका कुटुंबात अथवा एका घरात आणून कोंडल्यासारखा झाला आहे. त्यातील लोकांना एकत्र नांदल्याखेरीज सुटका नाही व त्यांनी एकत्र नांदावे यातच मानवकुलाची उन्नती आहे. पण एका घरात नांदणाऱ्या लोकांप्रमाणे त्यांनी बंधुभावनेने नांदावयास शिकले पाहिजे. येथून पुढे मानवसंस्कृतीची उन्नती या बंधुभावनेच्या प्रचारावर आणि प्रस्थापनेवर अवलंबून आहे. मानवांच्या अंत:करणातील या बंधुभावनेस प्रेम अशी संज्ञा आहे आणि हा प्रेमरूप परमेश्वर प्रत्येकाच्या अंत:करणात वास करीत असतो, या सिद्धांतावर सत्याग्रही संस्कृतीचा आधार आहे.’’

मनमोराचा पिसारा: जॉन ग्रिशम आणि त्याचे कादंबरीविश्व
पंधरा-वीस वर्षांपूर्वी जॉन ग्रीशम मला भेटला. बहुतेक एखाद्या विमानतळावर असं आठवतंय. विमानाच्या उड्डाणाला ‘अनिश्चित समय तक देरी होनेवाली है’ अशा स्वरूपाची उद्घोषणा ऐकली. काऊंटवर जाऊन नास्त्याचे कूपन घेतले. पुस्तकांच्या दुकानात शिरलो तर हा तिथे दारातच दिसला. आकर्षक वाटला. म्हटलं काय म्हणतोस? तर त्याचं उत्तर गमतशीर वाटलं. म्हणाला, ‘बऱ्याच जणांची माझ्याशी ओळख अशाच एखाद्या विमानतळावरल्या कंटाळवाण्या लाऊंजमध्ये होते.’ ‘भले, मी ही त्यातला आणखी एक’. ग्रीशम तसा खास अमेरिकन बांध्याचा होता. अंगानं मजबूत. नीटनेटका चेहरा, गुळगुळीत चेहऱ्यावरील सर्व गोष्टींची मांडणी अत्यंत नेमकी आणि सौष्ठवपूर्ण. मागे वळून पाहतो, तर त्याचं कौतुक करायला बरेच जण बसले होते. मोजक्या शब्दांत, त्याचं गुणवर्णन करून याच्याशी दोस्ती करा असं आग्रहाने म्हणत होते. मी म्हटलं, ‘निवड चांगली म्हणायची आपली. आता चोखंदळ आहे की कशी हे मैत्री झाल्यावरच कळेल.’
मग ग्रीशम माझ्याबरोबर अनिश्चित काळपर्यंत लाऊंजमध्ये होता. इतकंच काय तर विमानातही माझ्यासमवेत आला. मग मी त्याला घरी घेऊन आलो. सगळ्यांशी ओळख करून दिली. सगळे खूष झाले. गट्टीच झाली आमची. मग आम्ही त्याची वाट पाहू लागलो. दर चार-पाच महिन्यांनी तो भेटायचा. केवळ मलाच नव्हे तर सगळ्यांबरोबर सदैव जात येत असायचा.
तरी कुटुंबात त्याची ओळख ‘बाबाचा मित्र’ अशी झाली.
तो तसा दूरदेशीचा, नावावरनं कळलंच असेल म्हणा. गोरा कॉकेशिअन. अमेरिकेतल्या दक्षिणेकडच्या मिसिसिपी राज्याच्या परिसरातला. मेम्फीस (एल्वीस प्रिस्लेचं गाव) अशा किंचित परिचित वाटणाऱ्या गावापासचा.
ग्रीशमनं तशा अपरिचित गावांची आणि मुख्य म्हणजे लोकवस्तीची ओळख करून दिली. त्यांच्या जीवनपद्धती, राहणीमान, चालीरीती, हेवे आणि विशेष करून कोर्टातले दावे यांची जानपहचान करून दिली.
जॉन ग्रीशम या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाच्या पुस्तकांशी झालेल्या मैत्रीची गोष्ट सांगतोय. फक्त पुस्तकच नाही तर त्याच्या गोष्टींवर अतिशय गाजलेले हॉलीवूड चित्रपट पाहिलेले आहेत. मॅटडीमन हा जॉन ग्रीशमचा आयकॉनिक हीरो आहे. देखणे म्हणावे असे लुक्स मॅटकडे नाहीत पण अत्यंत बोलका चेहरा, रोखून पाहणारी नजर आणि इंटेन्सिटी आहे. (पाहा त्याचा बोर्न आयडेंटिटी) त्यामुळे जॉनच्या कोणत्याही कादंबरीत मला ‘मॅट’च दिसतो. पठडीतल्या ‘थ्रिलर’ कादंबऱ्या म्हणाव्या अशा त्याच्या कादंबऱ्या असतात. पण त्यातल्या रहस्यापेक्षा त्यात गुंतलेली माणसं, त्यांचे स्वभाव हव्यास, पैशाची हाव यांची गोष्ट असते. कष्टानं श्रीमंत झालेले पहिल्या पिढीतले उद्योजक, सी. ई. ओ. इत्यादींचे एकटे आयुष्य आणि सहसा दुभंगलेली कुटुंबे यांच्या गोष्टी असतात. अर्थात त्याच्या कादंबऱ्यांचा नायक एखादा नवखा वकील असतो.
किंबहुना अशा नवशिका खटल्यांची कामं शोधण्यात जिकिरीस आलेला वकील हाच ‘हीरो’ असतो. बऱ्याचदा, तो आजारी माणसांच्या हॉस्पिटलची बिलं आणि अपघातग्रस्त अशिलांच्या मागे हात धुऊन लागतो. त्यांना ‘अ‍ॅम्ब्युलन्स चेजर्स’ असं म्हणतात. अशा एखाद्या आयुष्यातल्या एखाद्या वाटेवर सत्याचा शोध घेण्याच्या वळणावर त्या वकिलाच्या जीवनरूपी गाडीचा वेग मंदावतो आणि आपण त्याच्याबरोबर प्रवास करू लागतो. काही प्रमाणात यश किंवा अपयश पचवत तो एका टप्प्यावर येतो. ‘सिकॅमोर रो’ या त्याच्या नव्याकोऱ्या कादंबरीत असाच एक ‘जेक’ भेटतो. १८०० शतकातल्या कृष्णवर्णीयांवर हल्ला करून, ठार मारून जाळपोळ करणाऱ्या गौरवर्णीयांच्या गावातल्या राजकारणात गोवला जातो. ‘सिकॅमोर’ हे दक्षिणेकडचं कुंपणावर वाढणारं देखणं झाड, त्याचभोवती कादंबरी उलगडते. अर्थात गेल्या शतकातल्या क्यू क्लस क्लॅन(ङ ङ ङ)चे कृष्णसंदर्भ अजूनही पुसलेले नाहीत आणि अगदी नव्वदाच्या शतकापर्यंत त्यांची दाहकता शिल्लक होती. कादंबरीत रहस्य आहे, पण जेक, क्लॅरा आणि हॅना या चिमुकल्या कुटुंबाची त्या छोटय़ाशा गावाची ही गोष्ट आहे. सुरुवात चुकवू नकोस, शेवट सांगू नकोस.. अश्शी!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

Story img Loader