एखाद्या देशाच्या औद्योगिक प्रगतीचे परिमाण एकेकाळी सल्फ्युरिक अॅसिड किती वापरले जाते यावरून ठरविले जाई. नंतर पोलाद किती वापरले जाते ते परिमाण आले आणि नंतर आले प्लास्टिकचे परिमाण. तसे पाहिले तर प्लास्टिकचे उत्पादन जगात सुरू होऊन जेमतेम ६०-६५ एवढीच वष्रे झाली आहेत आणि प्लास्टिकचे हे परिमाण व्यवहारात आले ते ३०-३५ वर्षांपूर्वीच. सुरुवातीला प्लास्टिककडे शोभेच्या वस्तू बनवण्याचा पदार्थ म्हणून पाहिले जाई. पण नंतर प्लास्टिक प्रत्येकाच्या केवळ घरातच नव्हे तर जीवनाच्या सर्व व्यवहारात गेले आहे. आणि त्याचा विस्तार अजूनही चालूच आहे.
१९२६ साली हल्लीच्या बांगलादेशातील जेसोर येथे प्लास्टिकचे कंगवे बनवायला सुरुवात झाली. नंतर १९५७ साली पॉलिकेम कंपनीने मुंबईत पॉलिस्टायरीन बनवायला सुरुवात केली. पुढे दोन वर्षांत कोलकात्याला आय. सी. आय. कंपनीने पॉलिथिलीन बनवायला सुरुवात केली. मग युनियन कार्बाईड आणि नोसिल कंपन्यांचे कारखाने मुंबईत आले. त्यांनी इथिलीन आणि त्यापासून अनेक पदार्थ बनवायला सुरुवात केली. प्रथम इथिल अल्कोहोलपासून इथिलीन बनवले जाई आणि अॅसिटीलीन वायूपासून पीव्हीसी बनवले जाई. पण मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घ्यायला कार्बनी रसायनेच हवीत आणि त्यासाठी पेट्रोलियम पदार्थाचाच उपयोग करावा लागतो. ‘मुंबई हाय’ प्रकल्पातून तेलाबरोबर मिळणाऱ्या वायूमधून इथेन आणि प्रोपेन मिळवता येतो व त्यापासून अनेक पेट्रोरसायने आणि प्लास्टिक बनवता येतात. भारतातील प्लास्टिक उत्पादनाचे दोन भाग पडतात. एका भागात रेझिन निर्मितीचे कारखाने असतात. दुसऱ्यात रेझिनपासून अनेक वस्तू बनवतात. जगात आज अनेक प्रकारची रेझिन बनतात.
महाराष्ट्रातील प्लास्टिकचे लघुउद्योग १९७३ साली सुरू झाले. त्यात पाईप, रॉड, तोटय़ा, छत्र्यांच्या मुठी, फिल्म, पत्रे, पिशव्या, रेनकोट, रेझिन, तंतू, सूत, दोऱ्या, विणलेल्या पिशव्या, लवचीक पट्टय़ा, पादत्राणे, गृहोपयोगी वस्तू याशिवाय अनेक औद्योगिक वस्तू बनतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा