बायोडिझेल आणि पेट्रोडिझेल हे दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत. खनिज तेलापासून मिळवलेल्या डिझेलला पेट्रोडिझेल म्हणतात, तर बायोडिझेल हे वनस्पती किंवा प्राण्यांमधील स्निग्ध पदार्थापासून तयार करता येते. बायोडिझेल बनविण्यासाठी जे तेल वापरतात ते सोयाबीन, रेपसीड, जट्रोपा, पाम, जवस, सूर्यफूल, नारळ, करंजा, मका, शेंगदाणे, सरकी, मोहरी इत्यादींपासून मिळवतात. अगदी तळणाचे तेलसुद्धा चालते. याशिवाय प्राणी, अगदी गटारात जगणारे जीवजंतू, शेवाळ वगरेमध्ये असलेल्या स्निग्धांशापासून पण बायोडिझेल बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या तेलापासून डिझेल मिळवण्यासाठी त्यावर बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात. या तेलात ट्रायग्लिसराइड हे रसायन असते. ट्रायग्लिसराइड हा एक ग्लिसरॉलचा रेणू व तीन मेदाम्लांचे रेणू याचा संयोग होऊन बनलेले असते. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या मेदाम्लात साधारणत: १६-१८ कार्बनचे अणू असलेल्या साखळ्या असतात. ट्रायग्लिसराइडमधली तीन मेदाम्लेपण सारखी नसतात. यातली काही मेदाम्ले असंपृक्त असतात व त्यामुळे त्यात हायड्रोजनचे प्रमाण कमी असते. पेट्रोडिझेलमध्ये संपृक्त मेदाम्ले असतात. त्यात हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे त्याची प्रत चांगली असते. शिवाय त्यामुळे त्यांच्या गुणधर्मात थोडा फरक असतो. बायोडिझेलमध्ये सल्फर कमी असते व प्राणवायू जास्त असतो. बायोडिझेलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होते. अल्कली वापरून ट्रायग्लिसराइडचे विघटन करतात. त्यामधून ग्लिसरॉल हा जास्त घनता असलेला पदार्थ वेगळा करतात व कमी घनता असलेल्या मेदाम्लाचे मिथेनॉल याबरोबर संयोग करून बायोडिझेल बनवितात.
वनस्पती आणि प्राणी यांमध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ आढळतात. प्राण्यात कोलेस्टेरॉल तर वनस्पतीत मेणासारखे पदार्थ असतात. निरनिराळ्या तेलातील वेगवेगळ्या स्निग्ध पदार्थामुळे व मेदाम्लांमुळे बायोडिझेलची प्रत थोडी वेगळी असते.
१९०० मध्ये रुडोल्फ डिझेल याने डिझेल इंजिन शेंगदाण्याच्या तेलावर चालवून पाहिले होते. आता परत वनस्पती तेलावर इंजिन चालवायची वेळ आली आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा