जैवइंधन म्हणजे जिवंत वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून मिळवलेले इंधन. वनस्पती आणि प्राणी मुख्यत: कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन व थोडय़ा प्रमाणात इतर खनिज यांपासून बनलेले असतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, जमिनीतील पाणी आणि सूर्यप्रकाशामधील ऊर्जा वापरून वनस्पती, शेवाळे आणि इतर हरित वनस्पतीसारखे जिवाणू प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे शर्कारामय कबरेदके तयार करतात. ही कबरेदके त्या वनस्पतींच्या स्वत:च्या वाढीसाठी व संवर्धनासाठी उपयोगात येतात व त्यातूनच प्राणिजगतासाठी अन्नपुरवठा होतो. ह्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेतून निर्माण झालेल्या कबरेदकांपासून जैववस्तुमान तयार होते. जैवइंधनात जैववस्तुमान, जैवतेल व जैववायू यांचा समावेश असतो. जैववस्तुमानावर जीवरासायनिक प्रक्रिया वापरून इथेनॉल म्हणजेच दारू व तत्सम इतर रसायने पण निर्माण होऊ शकतात. त्यातील काही रसायनेही इंधन म्हणून वापरता येतात.
सध्याची पेट्रोरासायनिक खनिज तेलेसुद्धा प्राणी आणि वनस्पतीपासून तयार झालेली आहेत व ती एक प्रकारची जैवइंधनेच म्हणता येतील. फक्त ही खनिजतेले हजारो-लाखो वर्षांपूर्वी सडलेल्या व पृथ्वीच्या पोटात गाडल्या गेलेल्या प्राणी आणि वनस्पती यांवर तेथील उष्णतेच्या व दबावामुळे झालेल्या रासायनिक प्रक्रियेपासून तयार झालेली असतात. रूढार्थाने मात्र केवळ सध्याच्या काळात जगत असलेल्या वनस्पतीपासून जी इंधने तयार होतात त्यालाच ‘जैवइंधन’ असे म्हणतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा