कृषिशास्त्रज्ञांना कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा शिरकाव करण्याचे तंत्र अवगत झाल्याने कृषी क्रांतीची नवी दिशा नव्वद व त्यापुढील दशकात सापडली आहे. जैवतंत्राचा उपयोग करून नवीन वाणांच्या निर्मितीच्या कार्यामध्ये उतीसंवर्धनाचा वाटा फार मोठा आहे. सध्या उतीसंवर्धनाची केळी, ऊस यांसारख्या पिकांची रोपे उपलब्ध झाल्यामुळे उत्तम गुणधर्माची पिके जोपासता येत आहेत. ज्या दोन जातींच्या फुलांचा परस्परांशी संकर घडवून आणता येत नाही, त्यांचा अलंगिक संकर उतीसंवर्धनाच्या तंत्राने घडवून आणता येतो.
युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरच्या शास्त्रज्ञांना खाद्य बटाटा व रानटी बटाटा याच्या पेशींच्या उतीसंवर्धन माध्यमात संकर घडवून आणण्यात यश मिळाले आहे. या तंत्रामध्ये संकरित पिकांची रोपे आणि कृत्रिम बीज यांचाही समावेश आहे. या तंत्राने विशिष्ट गुणधर्माची लावणीयोग्य रोपेही तयार करता येतात. उतीसंवर्धनाचा वापर करून एका रोपापासून केवळ काही महिन्यांमध्ये लक्षावधी रोपे तयार करण्याचे तंत्र शास्त्रज्ञांना अवगत झाले आहे. वनस्पतीच्या गुणसूत्रामधील जनुकांच्या कार्यपद्धतीसंबंधी मूलभूत माहिती काही अंशी शास्त्रज्ञांना मिळाली आहे.
व्यावसायिक स्पर्धा, खुली व मुक्त बाजारपेठ, दर्जा आणि लोकांची आवड व उच्च दर्जाच्या कृषिमालाची मागणी यामुळे भावी काळामध्ये कृषी क्षेत्रात कापूस, टोमॅटो, काही प्रमाणात फळे, केळी, गहू, तांदूळ या पिकांप्रमाणेच भाजीपाला, फळभाज्या, हंगामी फळे-फुले, शोभेच्या वनस्पती, आयुर्वेदीय दुर्मीळ वनस्पती, चारापिके इत्यादीमध्येही उतीसंवर्धन जैवतंत्रज्ञान वापरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
हे तंत्र वापरून नसíगकरीत्या हिरवा, निळा, गुलाबी, लाल, पिवळा इत्यादी रंगछटा असणारा उत्तम दर्जाचा कापूस, धागे, वस्त्र तयार करण्याकरिता उत्पादन करण्याचे यशस्वी प्रयोग काही पाश्चिमात्य राष्ट्रांनी सुरू केले आहेत. या तंत्रज्ञानाने बासमतीसारख्या सुवासिक व उत्पादकतेत व गुणधर्माने अग्रेसर असणाऱ्या तांदळाच्या वाणांनी बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न होत आहेत. आपल्याकडे कोबी, फ्लॉवर, वांगी, मिरची, हरभरा, भुईमूग, तूर, मका, कापूस, मोहरी, बटाटा, भात, आले, ऊस, केळी इत्यादी पिकांच्या प्राथमिक चाचण्या या तंत्रज्ञानाने घेतल्या जात असल्या तरी पर्यावरण संतुलनाच्या कारणामुळे याबाबत साशंकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा