सामान्यपणे मृतदेह जास्त काळ अंत्यसंस्कारावाचून राहिला की तो कुजायला लागतो आणि दरुगधी येऊ लागते. इजिप्तमधल्या पिरॅमिडमध्ये हजारो वर्षांपूर्वीचे मृतदेह आहेत. हे मृतदेह म्हणजेच ‘ममीज’ अजूनही कुजलेले नाहीत. हे कसे काय? मानवी देहाच्या विघटनाचे वा कुजण्याचे सुधारित स्वरूप म्हणजे ‘ममीफिकेशन’ होय. ममीफिकेशन या प्रक्रियेत शरीरातील पाणी निघून जाऊन ते शुष्क होते, वाळून जाते. लहान बाळांमध्ये ममीफिकेशन झालेले अनेकदा आढळून येते. याचे कारण म्हणजे लहान बालकांच्या अवयवांमध्ये जंतू नसतात किंवा त्यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया एक तर होतच नाही किंवा झाल्यास अगदी सावकाश होते.
वातावरणाचे उच्च तापमान, आद्र्रतेचा अभाव व मृतदेहाभोवती हवा खेळती राहण्याची सोय या तीन गोष्टी असल्या; तर मृतदेह न कुजता त्याचे ममीफिकेशन होते. आस्रेनिक व अॅन्टीमनी यांसारखी मूलद्रव्ये अगदी सूक्ष्म प्रमाणात का होईना; पण शरीरामध्ये बराच काळ साठून राहिली असतील तर ममीफिकेशन लवकर होते. असा मृतदेह सुरकुतलेला दिसतो, त्याला वास येत नाही व त्याचा रंग काळपट असतो. मृतदेहाचे वजन घटते. त्वचा शुष्क व कडक होऊन शरीराला घट्ट चिकटून बसते. महत्त्वाची बाब म्हणजे वर सांगितलेल्या बदलांमुळे मृतदेहाच्या शरीरावरील रचनात्मक खुणा तशाच राहतात. यांचा मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी उपयोग होतो. इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये उच्च तापमान, खेळती हवा व आद्र्रतेचा अभाव या तीनही गोष्टी आढळून येत असल्याने तेथे मृतदेह कुजत नाहीत तर ते वाळून ममीज तयार होतात.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचना शिकण्यासाठी व काही वेळा मृतदेह एका देशातून दुसऱ्या देशात न्यायचा असेल वा अंत्यसंस्कारास खूप वेळ असेल तर कृत्रिमरीत्याही ममीफिकेशन करता येते. यात मृतदेहाच्या मांडीतील धमनीत वा मानेतील धमनीत फॉर्माल्डीहाइड किंवा आस्रेनिक, लेड सल्फाइड व पोटॅशिअम काबरेनेट यांचे द्रावण सुईद्वारे सोडतात. यामुळे शरीरातील जीवाणू मरून कुजण्याची प्रक्रिया थांबते. या प्रक्रियेत शरीरातील अवयव कडक होतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा