मेंढीपालनाचे यश व कळपाच्या गुणवत्तेचे भविष्य पदासीकरिता वापरण्यात येणारा नर ठरवत असतो. मेंढीपालक जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी कळपातील सुदृढ व तगडे नर विकतात. त्यामुळे कळपात प्रजननासाठी चांगले नर उरत नाहीत. तसेच मेंढीपालक आपल्या कळपामध्ये अनेक वष्रे एकाच नराचा वापर करतात. परिणामी, कळपामध्ये सकुल प्रजनन होते. कळपाची उत्पादन व प्रजोत्पादन क्षमता हळूहळू कमी होत जाते. जन्माला येणाऱ्या कोकरांमध्ये आनुवंशिक दोष निर्माण होतात. जन्मलेली कोकरे कमी वजनाची व लहान आकाराची असतात. त्यांची सुदृढ वाढ होत नाही. अशा कोकरांना बाजारात कमी किंमत मिळते. मेंढीपालकाचे आíथक नुकसान होते. मेंढीपालकाने पदासीकरिता शास्त्रीय पद्धतीने कळपातील सुदृढ, निरोगी नराची निवड करावी.
पदासीचा नर उंच, लांब, मजबूत शरीरबांध्याचा, चपळ, उत्तम कामोत्तेजना असणारा असावा. त्यात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. शक्यतो दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा. म्हणजे पुढील पिढय़ांत जुळे कोकरे देण्याचे प्रमाण वाढते. नराचे अंडकोष मोठे व पोटाला चिकटलेले असावे. अशा नरात वीर्याचे प्रमाण व गुणवत्ता चांगली असते.
दीड-दोन वर्षांच्या नराची निवड पदासीकरिता करावी. ३०-४० मेंढय़ांच्या पदासीकरिता एक नर वापरावा. पदासीचा नर वयाच्या ७-८ वर्षांपर्यंत चांगली पदास करू शकतो. परंतु एका कळपात त्याचा वापर दोन वर्षांपर्यंतच करावा. नंतर तो दुसऱ्या कळपात प्रजननासाठी वापरावा. त्यामुळे कळपात जवळच्या नात्यातील प्रजनन टळते. कळपात दर दोन वर्षांनी नर बदलावा. नवीन नर शक्यतो लांब अंतरावरून आणावा. त्यामुळे कळपाची गुणवत्ता व प्रजोत्पादन क्षमता टिकून राहते.
उत्तम वंशावळीचा जातिवंत नर कळपात वावरल्याने उत्तम अनुवंश परावर्तित होऊन कळपाची उत्पादनक्षमता वाढते. कळपातील गर्भधारणेचे व जुळे कोकरे देण्याचे प्रमाण वाढते. जास्त वजनाची, आकाराने मोठी, रोगप्रतिकारक क्षमता असलेली, सुदृढ कोकरे जन्माला येतात. अशा कोकरांची उत्तम वाढ होऊन त्यांना बाजारात चांगली किंमत मिळते. मेंढपाळाची आíथक उन्नती होऊन व्यवसायात यश प्राप्त होते.
वॉर अँड पीस: टीबी ग्लॅन्ड कॅन्सर- गंडमाळा (भाग-९)
आठवडय़ातून एखादातरी रुग्ण ‘माझ्या मानेची ही गाठ हात लावून बघा’, असा आग्रह धरतो. काही वेळेस एकापेक्षा अनेक गाठी लहानमोठय़ा स्पर्शाला कळतात. क्वचित दोन्ही बाजूला असतात. महिलांत हे प्रमाण जास्त आढळते. त्यात थायरॉईडचे प्रमाण रक्ततपासणीत प्रमाणाबाहेर असलेल्या स्त्रीरुग्णांची वाढती संख्या मोठी चिंतनीय आहे. रुग्ण प्रकृतीने व्यवस्थित असल्यास चिंता करावयाचे कारण नसते. या टीबी ग्लॅन्ड असणाऱ्या कृश रुग्णांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला लागते. एकीकडे गाठी वाढतात. तुलनेने वजन घटते, नित्य बारीक ताप येतो. महिन्या-दोन महिन्यांनी जास्त काळ ताप टिकतो. अशा वेळेस वैद्यकीय चिकित्सकाला गाठी कमी करणे, कफविकारांना आवरणे, आहार सुधारणे अशा त्रिविध दिशांनी उपचार करावयास लागतात. आम्ही वैद्य डॉक्टर मंडळी रुग्णांचे राहण्याचे घर, घरातील कोंदट हवा,  भिंतीची ओल, आसपासचे वाढते प्रदूषण याचा मागोवा घेतो. बऱ्याच वेळा झोपडपट्टीतील दुर्दैवी मुले, स्त्रिया, बेकार तरुण यांच्या टीबी ग्लॅन्डचे रूपांतर कॅन्सरग्रंथीत केव्हा होते हे कळत नाही. रोग बळावतो. काटय़ाचा नायटा होतो. रुग्णाचे वजन, रक्ताचे प्रमाण घटते. रुग्णाला सतत थंडी वाजते. आहार कमी व नुसतीच औषधे, इंजेक्शन घेतल्यामुळे रुग्ण बरा न होता औषधे रुग्णाला खाऊन टाकतात. अशा अवस्थेत आयुर्वेदातील त्रिरूप, षडरूप, एकादशरूप, राजयक्ष्मा अशा रोगांच्या चिकित्सापद्धतीचा कटाक्षाने अवलंब करावा. अशा रोगांकरिता दोन वनस्पतींचे अनमोल साहाय्य घ्यावे. नियमितपणे दोन ते पाच लेंडी पिंपळी कपभर दूधपाणी एकत्र आटवावे. असे दूध सकाळी प्यावे. ताजी कांचनसाल मिळाल्यास १५/२० ग्रॅम सालीचा काढा निकाढा घ्यावा. कटाक्षाने बाहेरचे खाणे बंद करावे. मोकळय़ा हवेत राहावे. दीर्घश्वसन, प्राणायाम, पुदिना, आले-लसूण, ओली हळद,  तुळसपाने यांची चटणी घ्यावी. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, लाक्षादि, गोक्षुरादि, कांचनार, त्रिफळागुग्गुळ प्र. तीन दोन वेळा सुधाजलाबरोबर घ्याव्या. पाच ग्रॅम अमरकंद वनस्पतीचा काढा घ्यावा. रोगमुक्ती निश्चयाने  मिळते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी..       गोष्टी
हा स्तंभ जो टंकलिखित करतो त्याचे नाव अनिल हा शहाण्णव कुळी मोठा मिस्कील आहे. परवा त्याच्या घरातले कोणी तरी वारले तेव्हा त्याने साग्रसंगीत कार्य केले. मी त्याला म्हटले, आम्हा बामणांनी धर्माचे प्रस्थान मांडले आणि सुशिक्षिततेच्या नावाखाली सोडले इतरांनी ते टिकविले. तो म्हणाला, ‘सर आता काहीतरी नवे काढू नका हे लिहिता तेवढे पुरे आहे.’
माझ्याबरोबर वीसेक वर्षांची एक चुणचुणीत परिचारिका काम करते. ती म्हणाली बाबांनी नाशिकला खोल्या बांधल्या आहेत. गृहप्रवेश आणि शांती केली मग भिक्षूंनी रीतसर प्रार्थना केली, नंतर सत्यनारायणबी केला. मी भुवया उंचवल्यावर म्हणाली, सगळं करावं लागतं. धर्म बदलला म्हणजे कुंकू पुसायचं का? मी म्हटले हल्ली अध्र्या बायका मोकळ्या कपाळाच्या असतात तेव्हा हसली आणि म्हणाली, ‘अहो सर त्या सुधारलेल्या आहेत.’ हिच्या आई-वडिलांनी बौद्ध धर्म स्वीकारला ही सुधारणा होती हेच तिला माहीत नव्हते. सत्यनारायणातला नारायण म्हणजे विष्णू म्हणजे श्रीकृष्ण ज्याच्यापासून किंवा ज्याने जाती केल्या या गीतेतल्या श्लोकापर्यंत ती पोहोचलीच नव्हती. मोठी धिटुकली आहे. मी लग्नाचे विचारले तर म्हणाली कोणी परमनंटवाला भेटतच नाही. हा परमनंट शब्द नोकरीबद्दल होता, नवऱ्याबद्दल नाही. या सगळ्या धर्माच्या भानगडीशिवाय हिचा संसार सुखाचा व्हावा. परमनंट नोकरीवाला परमनंट नवरा तिला मिळो आणि संसार नेटका होवो, असे मनात आले. ज्ञानेश्वरीत पसायदानात ग्रंथोपजीविये असा एक शब्द आहे. गीता ग्रंथावर ज्याचे जीवन विश्वसलेले आहे, असे लोक विजयी होवोत अशी प्रार्थना आहे.
कोणीतरी अर्थ काढला, हा ग्रंथ ज्यांच्या उपजीविकेचे साधन आहे म्हणजे आधी प्रार्थना म्हणणारे भिक्षू आणि नंतर पूजा सांगणारे भिक्षुक. अहो शेवटी भिक्षू आणि भिक्षुकांना उदरनिर्वाह असतोच. धर्माचं सांगणारे गुरू, फतवा काढणारे मौलवी, भटभटजी ब्राह्मण भिक्षू किंवा भिकू फादर किंवा सिस्टर किंवा राबी यांना जे ज्ञान आहे ते त्यांना देवाकडून आले, असे गृहीतक आहे. ब्रह्माचे ज्ञान ज्याला आहे तो ब्राह्मण अशी एक फोड आहे. क्षेत्राचे रक्षण करतो तो क्षत्रिय.
मी शाळेत असताना एक मोठय़ा मुलाने मला मारले. तो होता मोठा. तेव्हा एकदा रस्त्यावरच्या अर्धवट विझलेल्या सिगारेटीचा मी त्याला चटका दिला. त्याच्या आईने तक्रार केली. माझी आई मला म्हणाली, ‘तू त्याची क्षमा माग’ मी आदळआपट केली, पण शेवटी मागितलीच. ही शिकवण आईला कोणी दिली? देवाने की ब्राह्मणाने? दोन्ही नसणार. ती तिला मिळाली तिच्या नैतिकतेमुळे आणि ती नीती आली संस्कारांमधून. देवाचा त्याच्याशी काय संबंध? त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते
आजचे महाराष्ट्रसारस्वत: ३० सप्टेंबर
१८९३ – कथाकार, नाटककार, नाटय़समीक्षक वासुदेव वामन भोळे यांचा जन्म. त्यांचे ‘सरलादेवी’ हे नाटक नव्या नाटय़प्रवाहाचे निदर्शक म्हणून गाजले. इब्सेनच्या नाटय़तंत्राची मांडणी या नाटकाद्वारे प्रथमच रंगभूमीवर केली होती. ‘समीक्षागौरव’ हा नाटय़विषयक समीक्षा लेखांचा संग्रह प्रकाशित.
१९१३ –  कथालेखक ललित गद्यलेखक मोरेश्वर शंकर भडभडे यांचा जन्म. ‘संध्याकाळच्या सावल्या, शांती, संधिप्रकाश, पुष्कराणी, गुलमोहर’ असे कथासंग्रह प्रकाशित.
१९४० – कवी अनियतकालिकांचे संपादक राजा ढाले यांचा जन्म. स्फुट लेखांचा संग्रह ‘अस्तित्वाच्या रेषा’ आणि ‘स्थितीच्या कविता’ हा लहानसा संग्रह असे मोजकेच लेखन करणारे ढाले हे १९६० नंतरच्या अनियतकालिकांना दिशा दाखवणारे ठरले.
१९४२ – समाजशास्त्रीय विचारवंत, ग्रंथकार भास्कर लक्ष्मण भोळे यांचा जन्म.  ‘दुसरे स्वातंत्र्य, राजकीय भारत, शिक्षण आणि संस्कृती, नवी घटनादुरुस्ती, जोतिराव फुले, वारसा आणि वसा, डॉ. आंबेडकरांचा वैचारिक वारसा इत्यादी पुस्तकांतून त्यांच्या वैचारिक कक्षेची व सामाजिक व वैचारिक भूमिकेची कल्पना येते. नवहिंदुत्वाची व्याघ्रमुद्रा, जातीपातीचे राजकारण अशी पुस्तके आणि अनुवादित साहित्य त्यांच्या नावावर आहे.
संजय वझरेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा