जुन्या काळातील युद्धात वापरली जाणारी हत्यारं म्हणजे तलवारी, ढाल, भाले, वाघनखं ही असत. त्यामुळे युद्धात संरक्षण व्हावं म्हणून पोलादी चिलखत, शिरेटोप वापरलं जाई. पण आधुनिकतेबरोबरच युद्धाचं स्वरूप बदलून गेलं. तलवारी जाऊन बंदुका आल्या. युद्धातील हत्यारांबरोबर संरक्षण हत्यारेही बदलत गेली. आता तर अणुयुद्धाचीच धमकी दिली जाते. आता केवळ बंदुकीनं युद्ध होत नाही. आताच्या काळात बंदुकांचा वापर स्वसंरक्षणासाठी सर्रास होतो. बंदुकीच्या गोळीपासून संरक्षण व्हावं या उद्देशानं बुलेटप्रूफ जॅकेट तयार केलं गेलं. कशापासून बनवलं असेल हे जॅकेट? बंदुकीची गोळी थांबविण्याची क्षमता कशामुळे आली असेल?
केवलर या धाग्यांपासून बुलेटप्रूफ जॅकेट बनवलं जात. केवलर हे कृत्रिम धागे पॉलिमर या वर्गात मोडतात. या धाग्यांत पॉलिमरची अतिसूक्ष्म जाळी तयार झालेली असते. केवलर धाग्यात पॉलिमरच्या लांबच लांब साखळ्या असतात. प्रत्येक साखळी ही मोनोमिअरच्या अनेक घटकांनी बनलेली असते. हे मोनोमिअर घटक एक-दुसऱ्याशी रासायनिक बंधनानं जोडलेले असतात. केवलरमध्ये केवळ एकाच साखळीतील मोनोमिअर घटक रासायनिक बंधनानं जोडलेले नसतात, तर दुसऱ्या साखळीतील मोनोमिअर घटकांशीही याच बंधानं जोडलेले असतात. त्यामुळे रासायनिक बंधांचं जाळं तयार होतं. याचा परिणाम जाळीदार रचना होण्यात होतो.
या जाळीदार रचनेमुळे यातून एखादी पॉलिमरची साखळी वेगळी करणं कठीण जातं. केवलर धाग्यांच्या मजबुतीचं रहस्य यातच आहे. ही मजबुती पोलादापेक्षा सहा पटीनं जास्त आढळते, मात्र वजनाला पोलादापेक्षा कमी. अशा प्रकारच्या मजबूत पॉलिमरचा जाड थर तयार केला तर त्यात कमी वेग असणाऱ्या बंदुकीच्या गोळीला थोपविण्याची क्षमता येते. वेगवान बंदुकीच्या गोळीपासून महत्त्वाच्या अवयवांचं (उदा. हृदय, फुप्फुस) संरक्षण व्हावं म्हणून त्या त्या भागात केवलर धाग्यांचा जास्तीचा थर लावावा लागतो.
या मजबुतीमुळेच केवलरचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात होतो. वेगवेगळ्या खेळांसाठी लागणारं विविध साहित्य उदा. ग्लोव्हज्, हेल्मेट, पॅड इ. तयार करतात. पंक्चररोधक टायर तयार करण्यासाठीसुद्धा केवलर वापरतात. उच्च तापमानाचा या पदार्थावर परिणाम होत नाही म्हणून अग्निशामक दलातील जवानांचे कपडे या पदार्थापासून तयार केलेले असतात.
प्रबोधन पर्व: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – एक थोर क्रियावान् पंडित
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्रभर दिलेल्या व्याख्यानांची संख्या काही हजार भरेल. त्यांनी लिहिलेले लेख, प्रस्तावना, परीक्षणे आदींची संख्या शेकडय़ांच्या घरात आहे. ‘वैदिक संस्कृतीचा इतिहास’मध्ये त्यांनी भारताच्या प्रदीर्घ सांस्कृतिक वारशाची चिकित्सा केली, ‘हिंदुधर्माची समीक्षा’मध्ये सडेतोड मते मांडली आणि ‘सर्वधर्मसमीक्षा’मध्ये हा परखड बाणा उदारमतवादी झाला. विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्य संस्कृती मंडळांच्या अध्यक्षपदाची धुरा तर्कतीर्थानी समर्थपणे वाहून त्यांना लौकिक मिळवून दिला. सक्रिय राजकारणातली त्यांची क्रियाशीलताही तितकीच महत्त्वपूर्ण आहे.
त्यांच्याविषयी मे. पुं. रेगे लिहितात – ‘‘सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनात सहभागी झाल्यानेच केवळ बंदिस्त हिंदू वैचारिक परंपरेतून शास्त्रीजी बाहेर पडले नाहीत. पाश्चात्य तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, सांस्कृतिक मानवशास्त्र यांच्या अभ्यासातून लाभलेल्या वैचारिक आयुधांच्या साहाय्याने भारतीय बौद्धिक परंपरेचे कवच फोडून ते अधिक उदार आणि मुक्त अशा बौद्धिक वातारणात आले. भारतीय बौद्धिक परंपरेकडे चिकित्सक दृष्टीने आणि मानव जातीच्या इतर इस्लामी, ख्रिश्चन, ‘आधुनिक’ इ. परंपरांकडे सहानुभूतीने व मर्मग्राही दृष्टीने पाहणे त्यांना शक्य झाले. मानवजातीच्या सबंध सांस्कृतिक वारशावर आपला हक्क त्यांना सांगता येऊ लागला.’’ तर गोवर्धन पारीख म्हणतात – ‘‘प्राचीन संस्कृत विद्या, पाश्चात्त्य ज्ञानविज्ञान आणि अत्यंत विकसित स्वरूपांत आढळणारी आधुनिक तर्कपद्धति, विश्लेषणपद्धति यांवरील पकड यामुळें तर्कतीर्थाचा ज्ञानाच्या क्षेत्रांतील अधिकार कांहींसा ‘यासम हा’ अशाच स्वरूपाचा आहे असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं.. तर्कतीर्थाचे कार्यक्षेत्र विद्यार्जनापुरतेंच मर्यादित नाहीं. अनेक महत्त्वाच्या सामाजिक व राजकीय चळवळींतहि त्यांनीं भाग घेतला आहें. त्यांचे धर्मनिर्णयमंडळांतील कार्य, अस्पृश्योद्धाराच्या आंदोलनांत त्यांनीं घेतलेला महत्त्वाचा भाग, धर्माचें परिवर्तनवादी स्वरूप सिद्ध करतांना त्यांनीं गाजवलेल्या पंडितसभा इत्यादि प्रसिद्धच आहेत.’’ मानवेंद्रनाथ रॉय शास्त्रीजींना ‘अ मॅन ऑफ इंडियन रेनेसान्स’ म्हणत.
मनमोराचा पिसारा: ग्राहकाची मानसिकता
ग्रेग रॅप नावाच्या एका मार्केटिंग सायकॉलॉजीच्या तज्ज्ञाची ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं मुलाखत छापली. हे गृहस्थ टीव्ही, रीअल इस्टेट असल्या गोष्टींच्या विक्रीबद्दल सल्ला देत नाहीत. ग्रेग न्यूयॉर्कमधल्या रेस्तराँमधल्या पदार्थाचं मूल्य किती असावं, कोणत्या महागडय़ा किमतीच्या डिश घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो, याचा मानसिक अंदाज घेतो.
मेन्यू कार्डवरील सर्वात महाग डिश विकून रेस्तराँच्या मालकाला अधिक फायदा मिळेल हे उघड आहे, पण ग्रेगच्या अनुभवानुसार सर्वात अधिक महागडय़ा डिशपेक्षा, त्याच्या खालोखाल असलेल्या दुसऱ्या नंबरच्या डिशची विक्री भरमसाट वाढते आणि या दोन नंबरच्या डिशमधून मालकाला अधिक मार्जिन मिळते आणि फायदा वाढतो. मग महागडी डिश मेन्यूकार्डवर असण्याचा हेतू कोणता? ग्रेग म्हणतो, एकदा सर्वात महाग गोष्टीचा अंदाज ग्राहकाला आला, की त्यापेक्षा स्वस्त गोष्टी विकत घेण्याची ग्राहकाची मानसिकता असते.
ग्राहकाला तुलना करायला एक रेफरन्स मिळतो. सर्वात महाग गोष्टीच्या जवळ जाणारी, पण अर्थातच कमी किमतीची वस्तू हातोहात खपते.. ‘इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध मासिकाने यावर स्लोन विद्यापीठात एक प्रयोग केला.
त्यांनी आपल्या वर्गणीची जाहिरात दिली ती अशी..
१) इंटरनेट वर्गणी- ५९ डॉलर- १६ वर्गणीदार मिळाले. २) छापील मासिक वर्गणी- १२५ डॉलर- शून्य ३) छापील आणि इंटरनेट दोन्ही आवृत्त्या- १२५ डॉलर- ८४ वर्गणीदार मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांपुढे ‘इकॉनॉमिस्ट’च्या आवृत्त्यांसाठी हे तीन पर्याय ठेवले. मुलांनी निवडलेला पर्याय उघडपणे छापील आणि इंटरनेट आवृत्ती या ‘कॉम्बो’करिता होता. ही प्रयोगाची पहिली पायरी. फक्त छापील अंकापेक्षा अर्थात दोन प्रकारे अंक मिळणे हे फायदेशीर ठरलं. म्हणजे फक्त छापील अंकाची किंमत लावून ग्राहकापुढे आणखी दोन पर्याय उपलब्ध झाले होते. प्रयोगाच्या पुढल्या पायरीत त्यांनी छापील अंकाचा पर्यायच काढून टाकला. आता उरले दोन पर्याय.
इंटरनेट इकॉनॉमिस्ट आवृत्ती- ५४ डॉलर्स- ६४ वर्गणीदार
आणि छापील व इंटरनेट आवृत्ती- १२५ डॉलर- ३२ वर्गणीदार. इथे गंमत अशी झाली की, याआधी फक्त इंटरनेट आवृत्तीला फक्त १६ वर्गणीदार मिळाले, तर दुसऱ्या जाहिरातीत त्याच्या चौपट वर्गणीदार मिळाले. ग्रेग रॅप म्हणतो त्याप्रमाणे ग्राहकांनी महागडी गोष्ट खरेदी न करता, त्याखालोखाल असणारी गोष्ट खरेदी केली! मित्रा, मार्केटिंगच्या या मानसिक प्रयोगानं चक्रावून जाऊ नकोस. यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, ग्राहकाची म्हणजे तुझी-माझी मानसिकता ओळखून मार्केटिंग करणारी मंडळी वस्तूंची किंमत ठरवतात.
म्हणजे असं बघ, आपण साडी खरेदीला जातो तेव्हा आपल्या किमतीचा अंदाज घेण्यासाठी दुकानदार नेहमीच आपल्या बजेटच्या बऱ्याच वरच्या किमतीची साडी दाखवतो. मग आपल्या बजेटच्या किंचित खालच्या किमतीची दाखवतो. आपल्यापुढे दोन पर्याय ठेवतो आणि मग आपण कोणती साडी घ्यावी हे तो मनात जोखतो आणि आपल्या बजेटच्या तारा वर पण फार वर नाही अशी साडी दाखवतो. आपल्यापुढे तो साडीचे विविध पर्याय असे ठेवतो की, जेणेकरून आपण फार महागही नाही आणि स्वस्तही नाही, परंतु अपेक्षेपेक्षा- बजेटपेक्षा जास्त किमतीची साडी विकत घेतो.
आपल्याला असं वाटतं की, आपण अगदी नीट विचारपूर्वक तर्कनिष्ठपणे विचार करून खरेदी केली, परंतु आपले रेफरन्स बदललेले असतात आणि आपलं लॉजिक कोसळलेलं असतं. मानसशास्त्रातले असे प्रयोग फार मजेदार असतात. डोकॅलिटी वापरावी लागते, पण स्वत:ची नव्यानं ओळख होते.
संदर्भ: डॅन एरिअेली लिखित पुस्तक ‘प्रेडिक्टेबली इरॅशनल’
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com