दोन किंवा अधिक अणू रासायनिक बंधाने एकमेकांशी बांधले गेले की त्यापासून रेणू बनतो. काही रेणू हे एकाच रासायनिक मूलद्रव्याच्या अणूंपासून तयार झालेले असतात; तर काही पदार्थाचे रेणू हे वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचे तयार झालेले असतात. या रेणूंच्या आकारांमध्येही भरपूर वैविध्य आढळतं. काही रेणू एखाद्या साखळीप्रमाणे असतात, तर काही रेणूंची रचना त्रिमितीय असते.
काही बाबतीत एकाच मूलद्रव्याचे रेणू वेगवेगळ्या आकारांमध्ये आढळतात. कार्बन हे मूलद्रव्य वेगवेगळ्या स्वरूपात आढळतं. इंधन म्हणून वापरला जाणारा कोळसा हा कार्बनच, शिसपेन्सिलीत वापरलं जाणारं ग्रॅफाइट आणि दागिन्यांमध्ये वापरण्यात येणारा मौल्यवान हिरा हासुद्धा कार्बनच! पण या तिन्ही पदार्थामध्ये कार्बनच्या अणूंची रचना अगदी वेगळी असते.
१९७० साली ईजी ओसावा या जपानी संशोधकाने कार्बनचे अणू एकमेकांशी चेंडूच्या आकारात बांधलेले असू शकतात, असं भाकीत केलं. यानंतर तब्बल १५ वर्षांनी म्हणजे १९८५ साली रॉबर्ट कर्ल, हॅरॉल्ड क्रॉटो आणि रिचर्ड स्मॉली यांनी प्रयोगशाळेत चक्क हा रेणू तयार करण्यात यश मिळवलं. चेंडूच्या आकाराचा बकीबॉल किंवा फुलेरीन हा एक रेणू असून तो कार्बनच्या ६० अणूंपासून बनलेला असतो. या ६० अणूंची रचना १२ नियमित पंचकोन आणि २० नियमित षटकोनांच्या स्वरूपात असते. या रेणूचा मधला भाग पोकळ असतो. बकीबॉलमध्ये दोन कार्बन अणूंमध्ये असलेले रासायनिक बंध अतिशय मजबूत असतात.
शुद्ध स्वरूपातला बकीबॉलचा रेणू विद्युत दुर्वाहक असला, तरी यात काही नवीन अणूंची भर टाकली की तो अतिसंवाहक बनतो.
बकीबॉल रेणूंची एकमेकांशी जोडणी करून अतिसूक्ष्म अशा नॅनोटय़ूब्ज करणं हे १९९१ साली साध्य झालं. या कार्बन नॅनोटय़ूब्ज म्हणजे नॅनो स्तरावर तयार करण्यात आलेला पहिला पदार्थ होय. अतिप्रचंड दाब, उष्णता यांचा या नॅनोटय़ूब्जवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून अतिशय पातळ पण मजबूत कवच, कृत्रिम हिरे, तसंच लवचीक पण तरीही मजबूत असलेले तंतू बनवता येतात.
मनमोराचा पिसारा: चालणे कैसे!
‘शिवरायांचे कैसे बोलणे , शिवरायांचे कैसे चालणे’, असं म्हणून समर्थानी श्रीमंत योगी शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचं सार्थ वर्णन केलं आहे. ते वाचता वाचता रायगडावर दमदार पावलं टाकीत, समस्त परिसरावर करडी नजर ठेवून वावरणाऱ्या तेजस्वी शिवरायांची मूर्ती डोळ्यांसमोर साकार होते. त्यांचा अमाप पराक्रम आणि धोरणी लढवय्या वृत्ती त्यांच्या व्यवहारातून सर्वाना प्रतीत होत असणार, यात शंका नाही.
शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वातील भारदस्त आत्मविश्वास आपल्यापर्यंत पोहोचतो त्यांच्या प्रतिमांतून, पण तरीही त्यांच्या वावरण्यातला आत्मविश्वास आपल्याला आजही जाणवतो. हा आत्मविश्वास अगदी पहिल्यापासून त्यांच्यात असावा, असंही आपल्याला वाटतं.
प्रभावी व्यक्तिमत्त्व, त्याच्या हालचालींमधून जाणवणारा आत्मविश्वास हा मानसशास्त्रज्ञांना आवाहनात्मक वाटत आलाय. हा आत्मविश्वास त्या व्यक्तीच्या चालण्या-बोलण्यावरून स्पष्ट जाणवतो, हे खरं असलं तरी अशा प्रभावी व्यक्तिमत्त्वाची नेमकी कोणती गोष्ट विशेष असते, यावर बरंच संशोधन चालू आहे. मानसशास्त्रानं काही मानवी व्यवहारांवर संशोधन करताना आपली दिशा एकशे ऐंशी अंशांत बदलली आहे. आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की, आपल्या मनात आत्मविश्वासाचे धुमारे फुटू लागले, स्वत:च्या क्षमतेची जाणीव वाढीस लागली की, आपोआपच आपलं वागणं-बोलणं बदलतं. आपला वावर, आपली चाल अधिक ठाम होते. त्या दिशेला आतून-बाहेर असं म्हणतात. मनात बदल आधी घडतो आणि नंतर बाहय़रूपात आणि वागण्यात फरक झालेला दिसतो.
मानसशास्त्रानं आता विरुद्ध बाजूनं वेध घ्यायला सुरुवात केलीय म्हणजे आपलं वागणं, बोलणं, व्यक्तिमत्त्वातील इतर गोष्टी (वेशभूषा, भाषा इ.) बदलत्या होकारात्मक केल्या, प्रयत्नपूर्वक अधिक जोरकस आणि ठाम केल्या तर आपल्या व्यक्तिमत्त्वात होकारात्मक बदल होतो. म्हणजे बाहेरून आत! आपण शिवरायांच्या चालण्यावर भाष्य केल्याचा उल्लेख केला. चालण्याच्या शैलीवर मानसशास्त्र पाहणी आणि संशोधन करते आहे.
फ्लोरिडा-अटलांटिक विद्यापीठातील सारा स्नॉडग्रास यांनी दमदार आणि कमकुवत चालण्याच्या मनोवृत्तीवर प्रयोग केले आहेत. इथं म्हटल्याप्रमाणे बाहेरून आत या दिशेनं प्रयोग केले. प्रयोगशाळेत काही स्वयंसेवकांना (प्रयोगाचा हेतू, कार्यकारणाविषयी अनभिज्ञ) दोन प्रकारे चालायला लावले. कालावधी होता फक्त तीन मिनिटं. एक गट : दमदार, लांब ढांगा टाकीत ताठ मानेनं चालला. (लष्करी कवायत नव्हे) तर दुसरा गट : पाय घासटत, पायांकडे पाहत, जवळजवळ पाय टाकीत. (लंगडत नव्हे) त्यांच्या नकळत इतर (अनभिज्ञ) स्वयंसेवक त्यांचं निरीक्षण करीत होते. लांब ढांगा टाकणाऱ्या व्यक्तींना अधिक प्रभावी, ठाम आत्मविश्वास आहे; असं त्यांना वाटलं तर पाय घासटत चालणारे स्वयंसेवक कमी आत्मविश्वासू आहेत असं वाटलं, असं निरीक्षण नोंदलं जाणारं स्वाभाविक आहे.
परंतु साराला तीन मिनिटं, दमदार, ताठ मानेनं चालणाऱ्या लोकांच्या मन:स्थितीविषयी उत्सुकता होती. फक्त तीन मिनिटे निश्चित ठाम पावलं टाकणाऱ्या व्यक्तींच्या मनात आपोआप आत्मविश्वास वाढला होता. समोरच्या आरशात जोरकस चालणारी आपली छबी पाहून, त्यांच्या मनात आपोआप आत्मविश्वास जागा झाला! गंमत आहे ना! आपल्या व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा (प्रतिबिंब)आपण प्रभावी केली तरी आपला आत्मविश्वास वाढतो.
मनमोर खूश हुआ!
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
संदर्भ : अॅज इफ प्रिन्सिपल, लेखक : प्रा. रिचर्ड वाइजमन
प्रबोधन पर्व: समुद्राने महासमुद्र व्हावे, नद्या पुष्कळ आहेत!
‘‘हिंदुधर्म हा विश्वधर्म आहे असे हिंदुधर्माचे थोर प्रवक्ते नेहमी सांगत असतात आणि ते बरोबरही आहे. हिंदुधर्म हा समुद्रासारखा आहे व इतर धर्म हे नद्यांसारखे आहेत असे विनोबांनी म्हटले आहे. हिंदुत्वातला हा वैश्विक गाभा विचारातून, आचारातून प्रकट होत राहील हे पाहण्याची जबाबदारीही ओघाने हिंदुत्वाभिमान्यांकडे येते. तात्कालिक आक्रमणे परतवून लावत असताना या मूळ गाभ्याला धक्का लावू देता उपयोगी नाही. मुस्लिम मनोवृत्तीचे हिंदू तयार होणे हा काही हिंदुत्ववादाचा अंतिम विजय नव्हे. सगळ्या पंथोपपंथांना सामावून घेण्याइतका हा हिंदुत्वाचा समुद्र विशाल व व्यापक असायला हवा. .. केवळ सहिष्णुता, केवळ सर्वधर्मसमभाव, एवढेच पुरेसे नाही. सर्वधर्मसत्यभाव हे हिंदुधर्माचे अनन्यसाधारण वैशिष्टय़ आहे.’’ श्री. ग. माजगावकर १९८१ सालच्या लेखात हिंदुधर्माचे वेगळेपण सांगताना लिहितात – ‘‘ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग शकतात. प्रत्येक मार्गात सत्याचा थोडा-अधिक अंश असू शकतो. अंतिम सत्य एकच असले तरी त्याचा साक्षात्कार विविध पद्धतीने होऊ शकतो, हे ज्ञानाचे उच्च शिखर आजवर फक्त हिंदुधर्म-तत्त्वज्ञानांनीच गाठले आहे. एक पुस्तक-एक प्रेषित-एक मार्ग याचा अट्टाहास हिंदुधर्माला मंजूरच नाही. ही वैश्विक व सर्वसमावेशक दृष्टी तात्कालिक चळवळींच्या गदारोळात लुप्त झाली तर जतन करण्यासारखे हिंदुधर्मात काही उरणार नाही.. गोळवलकरगुरुजी म्हणतात : ‘‘आमच्या धर्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्या शिकवणीनुसार हिंदूू व मुसलमान दोघे सारखेच आहेत. अंतिम ईश्वरी सत्याचा साक्षात्कार हिंदूलाच होऊ शकतो असे नाही. आपापल्या मतानुसार परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग अनुसरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.. ’’ ही अशी हिंदुधर्माच्या गाभ्याची धारणा असल्याने एखाद्या संप्रदायात तो बद्ध करून त्याला संकुचित करणे किंवा केवळ तात्कालिक, किंवा-प्रतिक्रियात्मक पातळीवर त्याचा विचार करणे उचित नाही. पूर्वीसारखी उदासीनता, न्यूनगंडही नको. खोटा, पोकळ अहंभाव आणि दुराभिमानही नको. समुद्राने महासमुद्र व्हावे, नद्या पुष्कळ आहेत!’’