कार्बन डायऑक्साइड वायू तसा उपयुक्त हरितगृह वायू आहे. सूर्यकिरणांना वातावरणात थोपवून, पृथ्वीला उष्ण ठेवण्याचे कार्य तो करीत असतो. जळणारा कोळसा आणि ज्वलनास मदत करणारा ऑक्सिजन वायू यापासून बनणारा हा वायू स्वत: मात्र ज्वलनास विरोध करतो. हा वायू गोठतो तेव्हा त्याचे द्रवात रूपांतर न होताच थेट बर्फात रूपांतर होते म्हणून त्याला कोरडा किंवा ‘शुष्क बर्फ’ म्हणतात. औद्योगिक क्षेत्रात त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो.
परंतु, औद्योगिकीकरण वाढले आणि हा वायू वाहने आणि कारखाने यांच्या धुरांडय़ातून प्रचंड प्रमाणात वातावरणात सोडला जाऊ लागल्याने त्याचे प्रमाण वाढले. परिणामी पृथ्वी तापू लागली. नसíगकरित्या वातावरणातील हा वायू कमी करण्याचे काम झाडे-झुडपे, वनस्पती करतात. पण, बेसुमार जंगलतोड केल्यामुळे वातावरणातील या वायूचे प्रमाण वाढले.
मग या वायूला अटकाव करण्यासाठी संशोधकांची धावपळ सुरू झाली. त्यावर आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा भरू लागल्या. प्रगती करायची तर कारखानदारी हवी. विकसित देश आपली जबाबदारी नाकारू लागले. विकसनशील देशांवर तो भार टाकण्यात आला.
आता, कार्बन फूट िपट्र (कार्बनच्या पाऊलखुणा) मोजल्या जात आहेत. आपल्या दैनिक कामकाजातून, कृतीतून आपण किती टन कार्बन डायऑक्साइड हा वायू हवेत उत्सर्जति करतो, याची मोजमापे केली जात आहे. ‘कॅप अॅण्ड ट्रेड’सारख्या योजना अस्तित्वात आल्या. एक तर कार्बन डायऑक्साइडच्या हवेतील उत्सर्जनावर नियंत्रण (कॅप) घाला किंवा कार्बन क्रेडिटच्या रूपाने दंड (ट्रेड) भरा, अशी तंबी उद्योजकांना मिळत आहे. मोटार उद्योजकांना तर आपण निर्माण केलेल्या वाहनांनी वातावरणात किती कार्बन डायऑक्साइड वायू सोडला जाईल याचा अंदाज घेऊन तितका वायू शोषून घेणाऱ्या झाडांची लागवड करावी असा त्यांना आदेश दिला जात आहे.
इतके करूनही भागत नाही, आता या कार्बन डायऑक्साइड वायूवर जप्ती घालण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. समुद्राखालील जमिनीच्या पोटातून खनिज तेल व नसíगक वायू उपसल्यानंतर उरणाऱ्या पोकळ्यांत, वातावरणात वाढणाऱ्या कार्बन वायूला रासायनिक प्रक्रियाद्वारे जप्त करून कोंडले जात आहे. त्यांचे अन्य वायूत रूपांतर करून उपयुक्त पर्यायी इंधने निर्माण करण्यावर संशोधन चालू आहे.
प्रबोधन पर्व: साडेसाताळलेले, ‘शन्याळलेले ’ दिङ्मूढ प्राणी
‘‘‘कुंडल्या कागदी असोत, नाही तर तळहाती असोत; त्यात चितारलेल्या प्रारब्ध-मर्यादेबाहेर मनुष्याला केव्हाही जाता येणार नाही. त्यातील भोग भोगल्याशिवाय सुटका नाही’, हा प्रवाद जर खरा मानला, तर मनुष्याच्या पुरुषार्थाला वाव तरी राहिला कोठे? सगळाच जर दैववाद, तर यत्नवाद हा शब्द जन्मला तरी कधी? आणि का? आणि कोणाकोणाच्या पोटी? बरे, प्रत्येकाचे दैव आणि सुखदु:खाचे फेरे हे जर घडय़ाळातल्या यंत्राप्रमाणे ठाकठीक आणि यथाकाळ, यथाक्रम घडणारे, तर त्यासाठी माणसाने आपले हात-पाय तरी का हलवावे? दु:ख येणार तर ते अगत्य येणारच येणार आणि सुखाचा मुसळधार पाऊस अमुक वेळी कोसळणार म्हणजे धो धो कोसणारच. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी! मग मला हात-पाय हलविण्याची जरूर काय? दैववाद्यांचे विचार जवळजवळ असेच असतात. नवल वाटते ते हेच की, या कपाळवाद्यांनासुद्धा आढय़ाला तंगडय़ा लावून स्वस्थ मात्र बसवत नाही. त्यांची काही ना काही धडपड चाललेलीच असते.. मग हे प्राणी आजूबाजच्या परिस्थितीचा, स्वत:च्या प्रवृत्तीचा, अंतस्थ धमकीचा, कार्यकुशलतेचा, कार्यकारण संबंधाचा, हातातील विहित कर्तव्याचा, कशाचाही कधी विचार करायचे नाहीत.’’ प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘शनिमाहात्म’ हे दोनशे पानी पुस्तक लिहिले. त्यात ते म्हणतात –
‘‘आत्मशोधनाची आणि सत्यशोधनाची प्रवृत्ती शेकडा ९९ लोकांत सहसा नसते. ..अर्थात, सत्यशोधक प्रवृत्तीच्या अभावामुळे बहुतेक सारे साडेसाताळलेले लोक पृथ्वीवरील या जिवंत शनिच्या हातात शेणगोळ्या-मेणगोळ्याप्रमाणे हवे तसे दाबले-फुगविले जातात. बाधा शनिची, पण तेल-शेंदराचा अभिषेक मारुतीच्या मस्तकावर काय म्हणून? काय, मारुती म्हणजे शनि? का, शनिचा वकील? या पृथ्वीवरील एजंट? शनिचे चरित्र काय! मारुतीचे चरित्र काय!! कशास काही मेळ? पण असला एकही प्रश्न बिचाऱ्या शन्याळलेल्या दिङ्मूढ प्राण्यांना कधी सुचायचा नाही.’’
मनमोराचा पिसारा: मर्फी म्हणतो म्हणून
मर्फी नावाच्या गृहस्थाने बऱ्याच सुवचनांची सोय करून ठेवली आहे. यापैकी काही सुवचनं यापूर्वी वाचली असल्यास लेखक त्याला जबाबदार नाही. दुनिया अजूनही न बदलल्यामुळे काही सत्ये आजही अबाधित आहेत. सर्व सुवचनं असॉर्टेड..
– हव्या त्या काठपदराच्या आणि पोताच्या साडय़ा शोधणाऱ्या स्त्रीकडून होकारात्मक विचार शिकावा. सेल्समनकडून पेशन्स.
– स्त्रियांच्या साडीबद्दलच्या होकारात्मक फुग्याला ‘अय्या, अश्शीच साडी मी परवाच सेलमध्ये निम्म्या किमतीत घेतली’ या वाक्याने टाचणी लागते.
– आपल्याला हवी ती गोष्ट शोध शोधून विकत घेतल्यावर दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट सेल्समन दारावर येऊन निम्म्या किमतीत गळ्यात घालतो.
– हवेत भटकणारा धुळीचा कण डोळे शोधतो, पण आपल्या एका डोळ्यात शिरल्यावर त्याचा शोध संपतो.
– वाऱ्यानं हातातले पैसे सांडले तर नोटा वाऱ्यावर उडून जातात आणि चिल्लर आपल्या पायाशी पडते.
– हातात गाडीचं स्टिअरिंग व्हील आल्यावर आपोआप शिव्या सुचतात.
– कोणालाही ‘फिट’ बसणारा ड्रेस कोणालाच फिट होत नाही.
– सहलीला जाताना बॅग भरते वेळी निम्मेच सामान पॅक करा आणि पाकिटात दुप्पट पैसे भरून घ्या.
– गुळगुळीत फरशीवर जपून चालल्यास पडत नाही. हा नियम शिकायला मुलांना कमीतकमी तीन वर्षे लागतात, तर काहींना आयुष्यभर हा नियम शिकता येत नाही.
– एखाद्या पुस्तकातून ‘गोष्टी’ चोरण्याला वाङ्मयचौर्य म्हणतात. बऱ्याच पुस्तकांतून बऱ्याच गोष्टी चोरण्याला ‘ओरिजिनल रिसर्च’ म्हणतात.
– इतिहासाची पुनरावृत्ती होते. ‘कॉपी’ ‘पेस्ट’ करण्याची सवय पूर्वीपासून चालू आहे.
– लिफ्टच्या रांगेत उभे असताना, आधी थांबणारी लिफ्ट आपल्याला वर जायचं असल्यास खाली जाते आणि खाली जायचं असल्यास ‘लिफ्ट खाली जाण्यासाठी नाही’ याकडे लिफ्टमन बोट दाखवितो.
– जड सामान घेऊन लिफ्टची वाट बघताना, सामान खाली ठेवल्याबरोबर लगेच लिफ्ट येऊन थांबते. लिफ्ट थांबल्यावर वरचा नियम लागू पडतो.
– आतला आवाज ऐकू लागल्यास बरेच लोक गप्प बसू लागतील.
– एखाद्या मोठय़ा समस्येच्या पोटात आणखी एखादी लहान समस्या दडलेली असते.
– एखाद्या लहान समस्येच्या पोटात अनेक मोठय़ा समस्या दडलेल्या असतात.
– सगळ्या समस्या लहानच असतात.
– तुमच्याकडे टीकेची हातोडी असेल तर सगळ्यांच्या डोक्यावर खिळे आहेत असं वाटतं.
ता. क. : हा मर्फी कोण? पहिला किंवा दुसरा नसून पुढचा..!
डॉ.राजेंद्र बर्वे