कार्बन तंतू मानवाला खूप पूर्वीपासून माहीत असलेला तंतू आहे. पण कार्बन तंतूंचा शोध हा उच्च कार्यक्षमता तंतूंच्या प्रगतीमधील एक महत्त्वाचा टप्पा होता. ज्या पदार्थात (तंतू, धागे, सूत) वजनाने ९२% कार्बन असतो त्याला कार्बन पदार्थ असे म्हटले जाते. कमी घनता, उच्च ताकद आणि कणखरपणा, उत्कृष्ट रासायनिक स्थिरता, जैविक सुसंगतता, उष्णतेने कमी प्रसरण, आणि ताणाखाली उत्कृष्ट स्थिरता ही कार्बन तंतूची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. कार्बन तंतूंच्या चांगल्या रचनात्मक गुणधर्मामुळे या तंतूंचा, तंतू मजबुतीकरण केलेल्या संयुक्तामध्ये धातूंना पर्याय म्हणून विपुल प्रमाणात वापर केला जातो. अशा संयुक्तांचा वापर अवकाश, संरक्षण, अणू तंत्रज्ञान, मोटारगाडय़ा, सागरी क्षेत्र, स्थापत्य तंत्रज्ञान आणि जैव-वैद्यकीय या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर केला जातो. कार्बन तंतू बनविण्यासाठी पहिली पायरी म्हणून एखादा सेंद्रिय बहुवारिकापासून बनविलेला तंतू वापरावा लागतो. या तंतूचे ऑक्सिडीकरण व काबरेनायझेशन करून कार्बन तंतू उत्पादित केला जातो. या उत्पादन प्रक्रियेच्या पूर्वस्तरामध्ये स्तरावर वापरण्यात येणाऱ्या तंतूला प्री-कर्सर तंतू असे संबोधले जाते. हा प्री-कर्सर तंतू ऑक्सिडीकरण व काबरेनायझेशन प्रक्रियेच्या वेळी न वितळणारा असावा लागतो. याशिय या तंतूचे सहजपणे कार्बनमध्ये रूपांतर व्हावे लागते. या तंतूपासून मिळणाऱ्या कार्बनचे प्रमाण जास्त असावे लागते आणि रूपांतरणाची प्रक्रिया कमी खर्चाची असावी लागते. प्री-कर्सर म्हणून पूर्वी व्हिस्कोज रेयॉन तंतूचा वापर केला जात असे. त्या नंतर पिचचा वापर केला जाऊ लागला. आणि आता पॉलीअक्रिलोनायट्राईल (ढअठ) तंतूंचा उपयोग केला जातो.
पॉलीअक्रिलोनायट्राईल तंतू वापरून तयार केलेला कार्बन तंतू हा सर्वात ताकदवान तंतू असतो. पॉलीअक्रिलोनायट्राईल तंतूपासून अधिक (५०-५५%) कार्बन मिळतो; त्याचे काबरेनायझेशन सहज होऊ शकते आणि तयार होणाऱ्या कार्बन तंतूंमध्ये सूक्ष्म छिद्रांसारखे दोष अत्यंत कमी प्रमाणात असतात. त्यामुळे या तंतूंची ताकद व स्थिरता अधिक चांगली असते. याशिवाय ज्या उपयोगासाठी हे तंतू वापरले जाणार आहेत, त्याप्रमाणे त्यांची रचना करता येते. या सर्व कारणांमुळे पॉलीअक्रिलोनायट्राईल हा तंतू प्री- कर्सर म्हणून सर्वात अधिक प्रचलित झाला. आज जगभर उत्पादित केले जाणारे बहुतांश कार्बन तंतू हे पॉलीअक्रिलोनायट्राईल वापरूनच बनविले जातात.
संस्थानांची बखर: संस्थान लोहारू
सध्याच्या हरियाणातील भिवानी जिल्ह्यात असलेले लोहारू शहर स्वातंत्र्यपूर्व काळात एक संस्थान होते. पूर्वी जयपूरचे राजे या गावातल्या लोहारांना जयपुरात नेऊन त्यांच्याकडून नाणी बनवून घेत. सुबक नाणी बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. तेव्हापासून या गावाचे नाव लोहारू पडले. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भरतपूरच्या जाट राजांच्या विरोधात मोहीम काढली त्यावेळी झालेल्या लढाईत अहमदबक्ष खान या सेनानीने केलेल्या कामगिरी बद्दल लॉर्ड लेक याने कंपनीच्या वतीने लोहारू हे गाव आणि फिरोजपूर जिरका हा परगाणा इनाम दिला. लोहारू येथे आपले मुख्य ठाणे ठेवून अहमद बक्षने १८०३ साली हे छोटे राज्य स्थापन केले. तेव्हापासून १९४८ पर्यंत लोहारू हे ब्रिटिश संरक्षित संस्थान होते.
लोहारू संस्थापक अहमदबक्षनंतर आलेला त्याचा मुलगा शम्स-उद्-दीन खान, दिल्लीचा ब्रिटिश रेसिडंट विल्यम फ्रेझर याच्या खुनाच्या प्रकरणात गोवला गेल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला १८३५ मध्ये देहांताची शिक्षा दिली. ब्रिटिशांनी लोहारूतला फिरोजपूर परगाणा स्वतकडे घेऊन लोहारूचे बाकी राज्य क्षेत्र गादीचे वारस अमीन-उद्-दीन आणि झिया-उद्-दीन यांच्या हवाली केले. लोहारूच्या पुढच्या राज्यकर्त्यांपकी नवाब अमीर-उद्-दीन अहमदखान हा विशेष कर्तृत्ववान निघाला. चोख प्रशासनाबद्दल ब्रिटिशांनी त्याला के.सी.एस.आय. हा बुहमान देऊन नऊ तोफसलामींचा बहुमान दिला. भारताच्या व्हाईसरॉयला कायदेविषयक सल्लागाराचेही त्याने काम केले. कवी मिर्झा गालिब आणि भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद, हे मूळचे इथले! मिर्झा गालिब हा नवाब अहमद बक्षखान याचा मेहुणा होता.
भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या काळातले नामधारी नवाब अमीन-उद्-दीन हे भारतीय सन्यात सेनाधिकारी होते. १९६१ साली त्यांनी गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतला. राजस्थानात सन १९६७ ते ७६ या काळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे ते मंत्री होते आणि १९७७ ते ८१ या काळात हिमाचल प्रदेशचे राज्यपालपद त्यांनी भूषविले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com