आपल्या शरीरातला सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू! मेंदूच्या पेशींमध्ये निरोपांची देवाणघेवाण सतत होत असते. या देवघेवीचं माध्यम असतं रसायन आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं रसायन म्हणजे पाणी!
आपल्या मेंदूचा जवळजवळ ८५ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. मेंदूच्या पेशींमध्ये पाण्याच्या मदतीने सोडिअम, पोटॅशिअम आणि क्लोराइड यांची विशिष्ट हालचाल होते. या हालचालींमुळे पेशींच्या जवळपासच्या परिसरात विद्युत प्रवाह तयार होतो. विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून मेंदू संदेश स्वीकारतो आणि संबंधित अवयवाला पुढच्या कार्याचे आदेश पाठवतो. ही विद्युत-रासायनिक प्रक्रिया पाणी या रसायनाच्या माध्यमातून होते.
तसं बघायला गेलं तर आपलं शरीर हे निम्म्याहूनही जास्त पाणीच आहे. नुकतंच जन्माला आलेलं बाळ म्हणजे खरं तर ७५ ते ८० टक्के पाणीच असतं! हळूहळू आपण मोठे होऊ तसतसं आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन ते ६० टक्क्यांच्या जवळपास होतं. शरीरातली सर्व आवश्यक रसायनं, संपूर्ण शरीरभर व्यवस्थितपणे फिरती, वाहती ठेवण्याची आणि योग्य त्या वेळी आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी पाण्यावर असते. आपल्या शरीरातल्या रक्ताचं वजनही आपल्या शरीराच्या ७ ते ८ टक्के असतं. रक्तातला बहुतेक भाग पाण्याने व्यापलेला असतो. त्याशिवाय रक्तामध्ये अमिनो आम्लं, प्रथिनं, कबरेदकं, लिपिडस, अनेक प्रकारची संप्रेरकं, व्हिटॅमिन्स अशी अनेक रसायनं असतात. कार्बन-डाय- ऑक्साइड, ऑक्सिजन, नायट्रोजन यांसारखे वायूही रक्तामध्ये विरघळलेल्या स्थितीत आपापलं कार्य पार पाडत असतात. रक्तामध्ये असलेल्या अनेक रसायनांपकी हिमोग्लोबिन हे लोहाचं संयुग सर्वाना परिचित आहे. श्वसनावाटे शरीरात आलेला ऑक्सिजन वायू शरीरातल्या सर्व पेशींपर्यंत पोहोचवणं आणि पेशींमध्ये झालेल्या ज्वलनातून निर्माण झालेला कार्बन-डाय-ऑक्साइड वायू वाहून परत फुप्फुसापर्यंत पोहोचवणाची कामगिरी हे लोहाचं संयुग अव्याहतपणे करत असतं.
थोडक्यात काय तर आपण चालतो, बोलतो, विचार करतो, जेवलेल्या अन्नाचं पचन करतो, श्वासोच्छवास करतो, मलमूत्र विसर्जन करतो, पंचेंद्रियांद्वारे आजूबाजूच्या जगाचा अनुभव घेतो, किंबहुना जे काही जीवन जगतो, तो एक रसायनांचाच आविष्कार आहे.
मनमोराचा पिसारा: कोडं बुद्धीचं
माकडाचा माणूस होण्याची प्रक्रिया करोडो वर्षे घडत होती, म्हणजे शरीराची रचना बदलून चतुष्पाद माकडाचा. या शेपटीवाला प्राण्याचा द्विपाद माणूस झाला त्याचा कणा ताठ झाला. अंगठा बोटांपासून विलग झाला. त्याची शेपूट गळू गेली आणि माणूस होमो सेपिअन या अवस्थेतला माणूस उत्क्रांत झाला.
परंतु त्यापुढे बदल घडला तो मात्र बराचसा अदृश्य स्वरूपात. उभं राहिलेल्या माणसामध्ये प्राण्याइतका चपळपणा नव्हता. हत्तीसारखं बळ नव्हतं, मुंगीइतका डंख नव्हता, माशासारखे कल्ले नव्हते की, पक्ष्यासारखे पंख. त्याच्या शरीरात एक अद्भुत बदल झाला. त्याच्या मेंदूचा कपाळामागचा हिस्सा झपाटय़ानं वाढू लागला. त्यात नव्या प्रणाली निर्माण झाल्या.
परिणामत: माणसाच्या शरीराच्या वजनाच्या दोन टक्के असलेला मेंदू शरीरातल्या वीस टक्के ऊर्जेवर हक्क सांगू लागला कारण या नव्या मेंदूत विचार करण्याचं सामथ्र्य होतं. कमालीची चतुरता आणि विजेच्या वेगानं संदेशवहन करणारी सिस्टीम होती. ही सिस्टीम परिपूर्ण झालीय का? विण्डोजप्रमाणे तिच्या सतत नव्या आवृत्त्या घडत आहेत? एका साध्या प्रयोगातून त्याचा पडताळा घेऊ. एक छोटं कोडं घालतो. अट एकच की कोडं सोडवून पुढे वाचायचं, आणि दिलेल्या वेळात उत्तर शोधायचं वेळ आहे ३० सेकंद, युअर टाइम स्टार्ट्स नाऊ!
बिस्किटांचा एक छोटा पुडा आणि च्युइंगमची एक वडी या दोघांची मिळून किंमत १० रुपये ६० पैसे आहे. बिस्किटाच्या पुडय़ाची किंमत च्युइंगमच्या वडीपेक्षा १० रुपयाने अधिक आहे. चटकन उत्तर द्या तर च्युइंगमच्या वडीची किंमत किती? वेळ संपलेली आहे. सर्व मित्रमंडळींनी च्युइंगमच्या वडीची किंमत ६० पैसे आहे, असं उत्तर दिलंय ना? उत्तर चुकलंय.
आता थोडा वेळ घेऊन कागदावर हिशेब मांडा. गमच्या वडीची किंमत ६० पैसे आणि त्यापेक्षा पुडय़ाची किंमत १० रुपये अधिक म्हणजे पुडय़ाची किंमत १० रुपये ६० पैसे आणि दोन्ही मिळून किंमत ११ रुपये २० पैसे होईल!! आणि गणितात त्याची किंमत तर १० रुपये ६० पैसे आहे. च्युइंगमच्या वडीची किंमत जर ३० पैसे असेल तर पुडय़ाची किंमत १० रुपयांनी अधिक म्हणजे १० रु. ३० पैसे आणि दोघांची मिळून १० रु. ६० पैसे!
हिशेब कसा चुकला यापेक्षा तो का चुकला हे महत्त्वाचं. खरं तर उत्तर चुकलं कारण मेंदूला अजिबात अवसर मिळाला नाही तर तो चटकन सुचलेलं उत्तर देतो. म्हणजे तपशिलात जाऊन विचार न शोधता. मेंदू प्रतिक्षिप्त क्रियेनुसार उत्तर देतो. मेंदूला अवसर दिला तर तर्काला धरून, विश्लेषण करून उत्तर देतो. ही किंचित मंदगतीने घडणारी विचारप्रक्रिया मेंदूमध्ये हळूहळू विकसित होते आहे, विचारप्रणालीच्या या दोन प्रक्रिया म्हणजे मेंदूनामक रथाची दोन चाकं. पहिली प्रतिक्षिप्त क्रिया आपण प्राण्यांच्या मेंदूकडून वारसाहक्कामुळे मिळवलीय तर दुसरी प्रक्रिया माणसाची खासियत!
पैकी महत्त्वाची कोण विचारतोस मित्रा? दोन्ही प्रणाली महत्त्वाच्या.
मानसशास्त्र या दोन्ही प्रणालींचा अभ्यास करतंय, हा अभ्यास ट्रेकिंग आणि हायकिंगइतका रोमांचकारी आहे. पिसारा फुलतो तो असा बरं..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व: गीता साने – विचारवंत लेखिका
गीता जनार्दन साने (३ सप्टेंबर १९०७-१२ सप्टेंबर १९९१) यांनी १९३६ ते ४२ या काळात ‘निखळलेली हिरकणी’ (१९३६), ‘वठलेला वृक्ष’ (१९३६), ‘हिरवळीखाली’ (१९३६), ‘लतिका’ (१९३७), ‘फेरीवाला’ (१९३८), ‘आविष्कार’ (१९३९), ‘माळरानात’ (१९४१), ‘आपले वैरी’ (१९४१), ‘धुके आणि दहिवर’ (१९४२) अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या. यातील बहुतेक कादंबऱ्यांचे विषय हे भारतीय कुटुंबसंस्थेतील दोष, त्यांच्या मर्यादा आणि त्यात स्त्रीच्या होणाऱ्या घुसमटीसंदर्भातील होते.
स्त्रीच्या अंत:करणातील स्वातंत्र्याच्या ऊर्मीची जाणीव साने यांनी आपल्या कादंबऱ्यांतून सातत्याने प्रकट केल्यामुळे त्या तत्कालीन काळात बंडखोर ठरल्या. ‘आविष्कार’ आणि ‘धुके आणि दहिवर’ या कादंबऱ्यांमध्ये साने यांनी तत्कालीन राजकीय स्थिती व विचारप्रवाहांचे दर्शन घडवले आहे, तर ‘दीपस्तंभ’ या कादंबरीतून समाजक्रांतीचे चित्र रंगवले आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात जी सामाजिक, राजकीय परिस्थिती होती, त्याकडे साने अतिशय बारकाईने पाहात होत्या. त्यांनी नोंद घेत होत्या. त्यांच्या या कादंबऱ्या लघु म्हणाव्यात अशाच आहेत; पण पुढे त्यांचे कादंबरीलेखन मंदावले आणि त्या संशोधनाकडे वळल्या. चंबळच्या खोऱ्यात फिरून दस्यूंच्या जीवनाची ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक निकषांवर पाहणी करून १९६५ साली ‘चंबळची दस्यूभूमी’ हे संशोधनपर पुस्तक लिहिले. त्यानंतरचे त्यांचे असेच महत्त्वाचे संशोधनपर पुस्तक म्हणजे ‘भारतीय स्त्रीजीवन’ (ऑगस्ट १९८६). ‘परतंत्र भारतीय स्त्रीजीवनाची सुखदु:खे स्पष्ट करणे’ हा या पुस्तकामागचा साने यांचा दृष्टिकोन होता. हा त्यांचा पीएच.डी.चा विषय. या पुस्तकामध्ये त्यांनी स्त्रीप्रश्नाचा विचार सर्वागीण स्वरूपाने करत भारतीय कुटुंबव्यवस्था आणि स्त्रीजीवन यांच्याशी निगडित असलेल्या बहुतेक सर्व प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशा’त म्हटल्याप्रमाणे स्त्रियांच्या जीवनातील समस्यांचा, मूलगामी वेध घेणाऱ्या, त्यावरील उत्तरांचा शोध घेऊ पाहणाऱ्या आणि अर्धशतकापूर्वीच स्त्रीमुक्तीची, निष्ठावान आणि जागरूक स्त्रीची प्रतिमा उभी करणाऱ्या ‘विचारवंत लेखिका’ असे मराठी साहित्यातले साने यांचे स्थान आहे.