आपल्या शरीरातला सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू! मेंदूच्या पेशींमध्ये निरोपांची देवाणघेवाण सतत होत असते. या देवघेवीचं माध्यम असतं रसायन आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं रसायन म्हणजे पाणी!
आपल्या मेंदूचा जवळजवळ ८५ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. मेंदूच्या पेशींमध्ये पाण्याच्या मदतीने सोडिअम, पोटॅशिअम आणि क्लोराइड यांची विशिष्ट हालचाल होते. या हालचालींमुळे पेशींच्या जवळपासच्या परिसरात विद्युत प्रवाह तयार होतो. विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून मेंदू संदेश स्वीकारतो आणि संबंधित अवयवाला पुढच्या कार्याचे आदेश पाठवतो. ही विद्युत-रासायनिक प्रक्रिया पाणी या रसायनाच्या माध्यमातून होते.
तसं बघायला गेलं तर आपलं शरीर हे निम्म्याहूनही जास्त पाणीच आहे. नुकतंच जन्माला आलेलं बाळ म्हणजे खरं तर ७५ ते ८० टक्के पाणीच असतं! हळूहळू आपण मोठे होऊ तसतसं आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन ते ६० टक्क्यांच्या जवळपास होतं. शरीरातली सर्व आवश्यक रसायनं, संपूर्ण शरीरभर व्यवस्थितपणे फिरती, वाहती ठेवण्याची आणि योग्य त्या वेळी आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी पाण्यावर असते. आपल्या शरीरातल्या रक्ताचं वजनही आपल्या शरीराच्या ७ ते ८ टक्के असतं. रक्तातला बहुतेक भाग पाण्याने व्यापलेला असतो. त्याशिवाय रक्तामध्ये अमिनो आम्लं, प्रथिनं, कबरेदकं, लिपिडस, अनेक प्रकारची संप्रेरकं, व्हिटॅमिन्स अशी अनेक रसायनं असतात. कार्बन-डाय- ऑक्साइड, ऑक्सिजन, नायट्रोजन यांसारखे वायूही रक्तामध्ये विरघळलेल्या स्थितीत आपापलं कार्य पार पाडत असतात. रक्तामध्ये असलेल्या अनेक रसायनांपकी हिमोग्लोबिन हे लोहाचं संयुग सर्वाना परिचित आहे. श्वसनावाटे शरीरात आलेला ऑक्सिजन वायू शरीरातल्या सर्व पेशींपर्यंत पोहोचवणं आणि पेशींमध्ये झालेल्या ज्वलनातून निर्माण झालेला कार्बन-डाय-ऑक्साइड वायू वाहून परत फुप्फुसापर्यंत पोहोचवणाची कामगिरी हे लोहाचं संयुग अव्याहतपणे करत असतं.
थोडक्यात काय तर आपण चालतो, बोलतो, विचार करतो, जेवलेल्या अन्नाचं पचन करतो, श्वासोच्छवास करतो, मलमूत्र विसर्जन करतो, पंचेंद्रियांद्वारे आजूबाजूच्या जगाचा अनुभव घेतो, किंबहुना जे काही जीवन जगतो, तो एक रसायनांचाच आविष्कार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा