स्निग्ध पदार्थामुळं वजन वाढू नये म्हणून बरीच जणं आहारातून स्निग्ध पदार्थ हद्दपार करतात. याचबरोबर तेलामुळं कोलेस्टेरॉलचं शरीरातील प्रमाण वाढू शकतं, अशीही भीती असते. कोलेस्टेरॉलचं वाढणारं प्रमाण हे हृदय रोग्यांना धोकादायक असतं. या गोष्टींचा फायदा घेऊन जाहिरात केली जाते की ही तेलं कोलेस्टेरॉल मुक्त आहेत.
खरं तर कोणत्याच तेलात (वनस्पतीजन्य) कोलेस्टेरॉल नसतं. कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीत असणारा एक महत्त्वाचा घटक आहे, पण तो आहारात असलाच पाहिजे असं नाही; कारण तो शरीरातच निर्माण होतो. शरीरात अनेक हार्मोन्स, पित्त व ‘ड’ जीवनसत्त्व यांची निर्मिती करण्यास तो मदत करतो. अन्नातून मिळणारं कोलेस्टेरॉल फक्त प्राणिजन्य (उदा. मांस, मासे, अंडी वगरे) पदार्थातून मिळतं. तूप, लोणी, वनस्पती तूप आहारात वापरल्यानं शरीरात कोलेस्टेरॉल निर्माण व्हायला मदत होते. सर्वसाधारण अन्नातून फक्त १/३ कोलेस्टेरॉल मिळतो आणि बाकी राहिलेलं २/३ कोलेस्टेरॉल आपल्या शरीरातच तयार होतं.
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा स्टिरॉल गटातील रक्तात न मिसळणारा पदार्थ आहे; पण जेव्हा त्यांचा प्रथिनांशी संयोग होतो, तेव्हा एक एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि दुसरा एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, अशी दोन प्रकारची कोलेस्टेरॉल तयार होतात. एचडीएलमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त व स्निग्ध पदार्थाचं प्रमाण कमी, तर एलडीएचमध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी आणि स्निग्ध पदार्थाचं प्रमाण जास्त असतं. एचडीएल रक्तमार्फत यकृतात गेल्यानंतर त्यातील कोलेस्टेरॉलचं पित्ताम्लात रूपांतर होतं. ही पित्ताम्लं कालांतरानं मोठय़ा आतडय़ातून मलाबरोबर उत्सर्जित होतात. अशाप्रकारे एचडीएल शरीरातील जास्त झालेलं कोलेस्टेरॉल यकृताद्वारे विसर्जन करायला मदत करतो. म्हणून एचडीएल हे शरीराला उपकारक आहे. याउलट एलडीएल शरीरात कोलेस्टेरॉल साठविण्यास मदत करतो. रक्तवाहिन्यात कोलेस्टेरॉलचा थर जमून रक्त वाहिन्यास अडथळा उत्पन्न होतो, म्हणून एलडीएल शरीराला हानिकारक आहे.
मोनोअसंपृक्त मेदाम्लं (टवाअ) युक्त तेलामुळं हानिकारक एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास, तर उपकारक एचडीएल कोलेस्टेरॉल वाढविण्यास मदत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा