सिमेंट, रेती, खडी आणि पाणी यांच्या मिश्रणाला काँक्रीट म्हणतात. काँक्रीट तयार करीत असताना त्यामधील घटक हे ठरावीक प्रमाणात घ्यावे लागतात, अन्यथा काँक्रीटची ताकद कमी होते. सिमेंटचे पाण्याबरोबर मिश्रण केले तर उष्णता निर्माण होऊन हायड्रेशन होते आणि कॅल्शिअम, अॅल्युमिनिअम, सिलिका यांच्या मिश्रणापासून जेलीसारखा चिकट पदार्थ निर्माण होतो. हे मिश्रण केल्यानंतर ४० ते ५० मिनिटांमध्ये त्याचा वापर करावा लागतो. जेव्हा लोखंडी सळ्यांभोवती स्लॅब टाकला जातो तेव्हा काँक्रीट सळ्यांभोवती ओतत असताना त्या दोघांमध्ये मोकळी जागा राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. नाही तर त्या काँक्रीटमध्ये भेगा पडतात आणि त्याची ताकद कमी होते. त्यासाठी यांत्रिक हालचाल करून कंपन निर्माण करणारे यंत्र (व्हायब्रेटर) वापरतात. ज्यामुळे काँक्रीट व लोखंडी सळ्या यांमध्ये या कंपनांमुळे मोकळी जागा राहत नाही आणि पर्यायाने त्यांची ताकद वाढते.
काँक्रीटचे मिश्रण हे सकाळी किंवा संध्याकाळी करणे हे अधिक श्रेयस्कर असते. कारण जर ते दुपारी केले गेले तर मिश्रणातील पाणी उडून गेल्याने त्यामधील घटकाचे प्रमाण बदलते आणि हायड्रेशन व्यवस्थित होत नाही. परिणामी काँक्रीटची ताकद कमी होते. जर दुपारी काँक्रीट मिश्रण बनवणे अपरिहार्य असेल तर ओतलेल्या मिश्रणावर प्लास्टिक पेपर अंथरल्याने त्यातील पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होते आणि हायड्रेशन व्यवस्थित होते. काँक्रीटमध्ये ओलावा टिकवणे महत्त्वाचे. सर्वसाधारणपणे हा ओलावा बाहेरून पाणी मारून टिकवला जातो. या ओलाव्याचा (क्युिरगचा) कालावधी २१ दिवस असतो.
काँक्रीटला बऱ्याचदा चिरा पडलेल्या आढळतात. कारण अशा मिश्रणात वापरलेल्या वाळूमध्ये बारीक चिकणमाती असते. ती पाणी शोषते. त्यामुळे काँक्रीटमध्ये पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा कमी पडते आणि हायड्रेशन व्यवस्थित होत नाही. हे सर्व टाळायचे असेल तर वाळूमधील चिकणमाती व्यवस्थित धुतली पाहिजे.
विटा पूर्णत: भाजलेल्या नसतील किंवा त्यांच्या कडा तुटल्या असतील तर त्या काँक्रीटमधील पाणी शोषतात. त्यामुळे विटा बांधकामापूर्वी २४ तास पाण्यात भिजवून नंतर वापराव्या. जेणेकरून काँक्रीटमधील ओलावा टिकवला जाऊ शकेल.
मनमोराचा पिसारा: फॅण्टम्स इन द ब्रेन
वैज्ञानिक, संशोधक आणि शास्त्रज्ञांनी विज्ञानसंबंधात कोणतं लेखन करावं? विज्ञानासंबंधित लिखाणाचे वाचक कोण असतात? मुळात वैज्ञानिकांनी कोणत्या प्रकारच्या लेखनाला आपलं क्षेत्र मानावं? असे अनेक प्रश्न विज्ञानामधल्या शोधक्रांतीनंतर समाजात निर्माण झाले. वैज्ञानिकांनी त्यांची दखल घेऊन- न घेऊन लेखन करायला सुरुवात केली. विज्ञानासबंधातील संशोधन प्रसिद्ध करणारी शास्त्रीय नियतकालिके, मूलभूत सिद्धान्तावर बेतलेल्या प्रमेय आणि रायडरवरील ग्रंथ, विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी पाठय़पुस्तकं आणि पूरकं विपुल प्रमाणात प्रसिद्ध झाली, होत आहेत आणि होत राहतील.
जीवविज्ञानशास्त्राला कलाटणी देणाऱ्या चार्ल्स डार्विन आणि पुढे सिग्मंड फ्राईड यांनी आपल्या अनुभवावर बेतलेल्या काटेकोर वर्णन करून सांगणाऱ्या सिद्धान्तांची मांडणी केली. पुढे या दोघांना वैज्ञानिक जगतामध्ये अत्यंत मानाचं आणि आधुनिक विचारव्यूह रचणारे शास्त्रज्ञ म्हणून स्थान मिळालं. अर्थात फ्रॉईड यांना तथाकथित प्रायोगिक मानसशास्त्रातर्फे मान्यता दिली नाही. परंतु त्यांनी जीवविज्ञानशास्त्रामध्ये पायाभूत सिद्धान्त मांडले हे कोणीही नाकारत नाही.
खगोलशास्त्रामधील वैज्ञानिकांची निरीक्षणं आणि त्यांमधून प्रतीत होणारं भविष्य यावर आधारलेल्या विज्ञानकथा, अद्भुतिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. त्यामुळे विज्ञान अधिक लोकप्रिय झालं आणि विज्ञानाबद्दलच्या जिज्ञासेचं माहितीमध्ये रूपांतर झालं. परंतु, या सर्व विज्ञान साहित्यांची कक्षा, पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, संगणक यांत मर्यादित राहिली.
व्ही. एस. रामचंद्रन यांनी मेंदूवर लिहिलेल्या पुस्तकाची अशी पाश्र्वभूमी आहे. रामचंद्रन हे मज्जाविज्ञानशास्त्रातले डॉक्टरेट आणि प्रॅक्टिस करताना प्रयोगशील वृत्तीने काम करणारे थेरपिस्ट. म्हणजे मूलभूत संशोधनात बराच रस! त्याला उपयोजनाची आपल्या सूक्ष्म निरीक्षणक्षमतेची आणि विलक्षण सृजनशीलतेची जोड रामचंद्रन यांनी दिली.
विज्ञानामधलं संशोधन म्हणजे निरीक्षण, परीक्षण, प्रयोग, त्याचे निष्कर्ष इ. शिस्तपालन करणारं शास्त्र. या सर्वसाधारण सिद्धान्ताला महत्त्व आहे, परंतु हजारो केसचा अभ्यास करून निष्कर्ष काढणं म्हणजेच संशोधन असं नाही.
वैज्ञानिक वृत्तीने, डोळसपणे निरीक्षण करून एखाददुसऱ्या केसच्या संपूर्ण अभ्यासातूनदेखील अत्यंत महत्त्वाचे शोध लागतात. नंतर त्यांचा पडताळाही घेता येतो. अशा प्रकारचं विश्लेषण करून डॉ. रामचंद्रन यांनी बहुमोल शोध लावले आणि उपयोजनानी ते सिद्धही झाले.
अपघात, गँगरीनसारख्या दुर्धर आजारांमुळे हात-पायांना कधी कधी कापून टाकावं लागतं. यालाच जीव वाचविणारं अॅम्प्युटेशन म्हणतात. अशा रुग्णांमध्ये एक विचित्र प्रकारचा मानसिक अथवा मज्जासंस्थेमुळे उद्भवणारा प्रकार आढळतो. म्हणजे एखाद्या रुग्णाचा उजवा हात कापला असला तरी त्या रुग्णाला त्या अस्तित्वात नसलेल्या हाताला खाज येते. कधी कधी तर कमालीची तीव्र वेदना होते. त्या हाताची बोटं आवळली आहेत आणि पंजात रुतल्यामुळे असह्य़ कळ येते आहे असं वाटतं. हात दिसत नसला तरी वेदना शिल्लक राहते, याला वैद्यकीय परिभाषेत ‘फॅण्टम लिम्ब’ असं म्हणतात.
डॉ. राम यांनी या दुर्धर आणि ‘जीना हराम करने’वाल्या रोगाचा अभ्यास केला. मेंदूचं कार्य कसं चालतं आणि ते कसं यांत्रिकपणे चालतं, यावर संशोधन करून या रोगावस्थेवर अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी उपचार शोधला. हे सर्व लिखाण नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालं तरी लोकांपर्यंत ती माहिती पोहोचलेली नव्हती. अमेरिकेनं नव्वदावं दशक मेंदूसंशोधनासाठी राखून ठेवलं. डॉ. राम यांना सन्मानपूर्वक अभिव्याख्यानासाठी बोलाविलं आणि त्यातूनच ‘फॅण्टम्स इन द ब्रेन’ नावाचं पुस्तक जन्माला आलं.
डॉ. राम अतिशय रंजकपणे लिहितात व बोलतात. सर्वसामान्य वाचकांप्रमाणे डॉक्टर आणि कोणत्याही व्यावसायिकांना कळेल अशा पद्धतीने त्यांनी मेंदूचा अभ्यास मांडला आहे, यातील काही सिद्धान्तांची पिसाऱ्यामध्ये पूूर्वी ओळख झाली आहे आणि अजून सांगण्यासारखं बाकी आहे. विज्ञानात रस घेणाऱ्या वाचकाने हे पुस्तक अजिबात सोडू नये.
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व: महिमा ‘ग्रंथसत्ता’ नावाच्या महाशक्तीचा
‘‘महाराष्ट्रात काहीशा उपेक्षिल्या गेलेल्या साहित्याच्या शाखेविषयीचा मनातला विचार मांडावा या हेतूने आजच्या विषयाची निवड मी केली आहे. निबंध, प्रबंध किंवा ग्रंथ या नावांनी जिचा निर्देश होतो ती ही शाखा होय. काव्य, कादंबरी, नाटक, लघुकथा याहून ही सर्वस्वी निराळी आहे. ते वाङ्मय-प्रकार भावनांना आवाहन करतात तर ग्रंथ हा बुद्धीला आवाहन करतो. त्यामुळे त्याची रचना अगदी भिन्न होते. इतिहास, अनुभव, प्रयोग, अवलोकन यांतून निघालेले सिद्धान्त यात प्रतिपादन केलेले असतात, आणि ते तर्कनिष्ठ पद्धतीने मांडलेले असतात. आधार, प्रमाण, खंडनमंडन, तुलना, अन्वय, व्यतिरेक यांना ग्रंथात महत्त्व असते. आणि या पद्धतीनेच त्याला सामथ्र्य प्राप्त झालेले असते. समाजाच्या प्रगतीला, उत्कर्षांला अत्यंत अवश्य असा हा जो ग्रंथ त्याची भारतात अत्यंत उपेक्षा झालेली आहे. ’’
ग्रंथसत्ता या महाशक्तीचे महत्त्व सांगताना पु. ग. सहस्त्रबुद्धे लिहितात-‘‘अजून आपल्यापुढे कामाचे पर्वतच्या पर्वत पडले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, इहलोकनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा ही तत्त्वे गेली शंभर वर्षे आपल्या कानांवर पडत असली तरी भारतातील बहुसंख्य जनतेच्या चित्तात अजून ती रुजलेली नाहीत. जातीयता, प्रांतीयता ही विषे अजून समाज-मनात किती प्रबळ आहेत याचा प्रत्यय आपल्याला वरचेवर येत असतो. कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली तरी प्रत्यक्षात ती किती प्रभावी आहे हेही वरचेवर दिसून येतच आहे. बालविवाहाची तीच स्थिती आहे.. खेडय़ापाडय़ांत लोकशाही आल्यामुळे तेथे गुंडांचे राज्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण अन्यायाचा प्राणपणाने प्रतिकार करण्याचे व्यक्तित्वाचे सामथ्र्य अजून आपल्या समाजात अवतीर्ण झालेले नाही. आणि ते झाले नाही तोपर्यंत आपली लोकसत्ता यशस्वी होणे अशक्य आहे. म्हणून युरोपात जी धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक क्रान्ती झाली, जी युगपरिवर्तने गेल्या पाचशे वर्षांत झाली, ती पुढील पन्नास वर्षांत येथल्या बहुजनसमाजात घडवून आणणे हे अति दुर्घट कार्य आपल्यापुढे आहे आणि ग्रंथ या महाशक्तीच्या उपासनेवाचून ते साधणे कदापि शक्य नाही.