सिमेंट, रेती, खडी आणि पाणी यांच्या मिश्रणाला काँक्रीट म्हणतात. काँक्रीट तयार करीत असताना त्यामधील घटक हे ठरावीक प्रमाणात घ्यावे लागतात, अन्यथा काँक्रीटची ताकद कमी होते. सिमेंटचे पाण्याबरोबर मिश्रण केले तर उष्णता निर्माण होऊन हायड्रेशन होते आणि कॅल्शिअम, अॅल्युमिनिअम, सिलिका यांच्या मिश्रणापासून जेलीसारखा चिकट पदार्थ निर्माण होतो. हे मिश्रण केल्यानंतर ४० ते ५० मिनिटांमध्ये त्याचा वापर करावा लागतो. जेव्हा लोखंडी सळ्यांभोवती स्लॅब टाकला जातो तेव्हा काँक्रीट सळ्यांभोवती ओतत असताना त्या दोघांमध्ये मोकळी जागा राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. नाही तर त्या काँक्रीटमध्ये भेगा पडतात आणि त्याची ताकद कमी होते. त्यासाठी यांत्रिक हालचाल करून कंपन निर्माण करणारे यंत्र (व्हायब्रेटर) वापरतात. ज्यामुळे काँक्रीट व लोखंडी सळ्या यांमध्ये या कंपनांमुळे मोकळी जागा राहत नाही आणि पर्यायाने त्यांची ताकद वाढते.
काँक्रीटचे मिश्रण हे सकाळी किंवा संध्याकाळी करणे हे अधिक श्रेयस्कर असते. कारण जर ते दुपारी केले गेले तर मिश्रणातील पाणी उडून गेल्याने त्यामधील घटकाचे प्रमाण बदलते आणि हायड्रेशन व्यवस्थित होत नाही. परिणामी काँक्रीटची ताकद कमी होते. जर दुपारी काँक्रीट मिश्रण बनवणे अपरिहार्य असेल तर ओतलेल्या मिश्रणावर प्लास्टिक पेपर अंथरल्याने त्यातील पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होते आणि हायड्रेशन व्यवस्थित होते. काँक्रीटमध्ये ओलावा टिकवणे महत्त्वाचे. सर्वसाधारणपणे हा ओलावा बाहेरून पाणी मारून टिकवला जातो. या ओलाव्याचा (क्युिरगचा) कालावधी २१ दिवस असतो.
काँक्रीटला बऱ्याचदा चिरा पडलेल्या आढळतात. कारण अशा मिश्रणात वापरलेल्या वाळूमध्ये बारीक चिकणमाती असते. ती पाणी शोषते. त्यामुळे काँक्रीटमध्ये पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा कमी पडते आणि हायड्रेशन व्यवस्थित होत नाही. हे सर्व टाळायचे असेल तर वाळूमधील चिकणमाती व्यवस्थित धुतली पाहिजे.
विटा पूर्णत: भाजलेल्या नसतील किंवा त्यांच्या कडा तुटल्या असतील तर त्या काँक्रीटमधील पाणी शोषतात. त्यामुळे विटा बांधकामापूर्वी २४ तास पाण्यात भिजवून नंतर वापराव्या. जेणेकरून काँक्रीटमधील ओलावा टिकवला जाऊ शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा