चहा, कॉफी यांच्या खालोखाल सेवन केला जाणारा द्रवपदार्थ म्हणजे बीअर होय. यात इथिल अल्कोहोल असल्यामुळे बीअरचा समावेश मद्यात केला जातो.
पिष्टमय पदार्थापासून किण्वन प्रक्रियेनं तयार केलेल्या मद्याला ‘बीअर’ म्हणतात. बीअर हा सरळ मद्याचा प्रकार आहे. बीअर बनविण्यासाठी मुख्यत: बार्ली हे धान्य वापरतात. किण्वन करावयाच्या द्रावणात बुडणारे यीस्ट वापरून बनविलेल्या बीअरला ‘जड यीस्टची बीअर’ तर किण्वन द्रावणात तरंगणारे यीस्ट वापरून बनविलेल्या बीअरला ‘हलक्या यीस्टची बीअर’ म्हणतात. यीस्ट कोणत्याही प्रकारचे असले, तरी त्यातील माल्टेज व झायमेज या विकरांमुळे (एंझाइम) किण्वन होऊन त्यातील शर्करेचे प्रथम ग्लुकोज व नंतर इथिल अल्कोहोल व कार्बन डाय ऑक्साइडमध्ये रूपांतरण होते.
या क्रियेत तयार होणारा कार्बन डाय ऑक्साइड वायू हा एक उपपदार्थ असून तो वेगळा काढून इतरत्र वापरण्यासाठी साठविता येतो. किण्वनानं एकंदर ग्लुकोजच्या सुमारे ९५ टक्के भागाचं अल्कोहोल बनतं व उरलेल्या ५ टक्के भागापासून आणि मिश्रणातील इतर पदार्थापासून पेप्टाइड, अमिनो आम्ले, आल्डिहाइड, एस्टर इत्यादी उपपदार्थ तयार होतात. या उपपदार्थामुळे बीअरला रुची व स्वाद निर्माण होतो. तयार झालेल्या बीअरमध्ये या घटकांबरोबर उरलेली शर्करा, यीस्टपासून तयार झालेली थायामीन, रिबोफ्लाविन, निकोटिइनिक आम्ल, जीवनसत्त्व व काही प्रमाणात काबरेहायड्रेट व प्रथिनं आणि कॅल्शिअम व फॉस्फरस, ३ ते १५ टक्के इथिल अल्कोहोल हे घटक असतात.
बीअर बनविताना जे पाणी वापरलं जातं, त्यातील क्षार व इतर घटक यांच्या प्रमाणानुसार बीअरची गुणवत्ता ठरते. म्हणून उपलब्ध असलेले पाणी, त्यातील क्षार व इतर घटक यांचं योग्य प्रमाण करूनच वापरलं जातं.
जड यीस्टची बीअरमध्ये विविध प्रकार आहेत. उदा. लागर बीअर, पिल्सनर बीअर, डार्टमुंट बीअर आणि म्यूनिक बीअर. हलक्या यीस्ट बीअरच्या प्रकारात आणखी उपप्रकार आहेत. उदा. एल, पोर्टर, स्टाउट, लँबिग, साकी (तांदळापासून).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा