स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन दशकांपर्यंत भारतामध्ये होणारे कापूस उत्पादन हे मुख्यत: सुधारित अशा पारंपरिक जातींचेच होते. भारताच्या मध्य, पश्चिम, पूर्व आणि दक्षिण भागात कापसाचे पीक घेतले जात होते. आजही याच भागात कापूस मोठय़ा प्रमाणावर पिकविला जातो. यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व बंगाल ही राज्ये आघाडीवर होती व आजही आहेत. बंगालमध्ये- बांगलादेशी, पंजाब, हरियाणामध्ये- पंजाब देशी, गुजरात, महाराष्ट्रामध्ये- लक्ष्मी, कल्याण, वागड, तर कर्नाटकमध्ये जयधर व तामिळनाडूमध्ये- सी.ओ- २ या पारंपरिक कापसाच्या जाती प्रचलित होत्या.
पारंपरिक जातींच्या कापसाचे उत्पादन त्या वेळी प्रति हेक्टरी १३० ते १९० कि. ग्रॅ. इतके कमी होते आणि त्याचबरोबर या कापसाच्या तंतूंची लांबी जास्तीत जास्त २६ मि.मि. इतकीच होती. अशा कापसापासून फक्त कमी सूतांकाचे (जाडे) सूतच कातता येऊ शकत असे. (३० सूतांकाच्या खालील). मध्यम व उच्च सूतांकाच्या सूताच्या उत्पादनासाठी इजिप्त, सुदान यांसारख्या देशांतून अधिक तंतू लांबीच्या कापसाची आयात करावी लागत असे. त्यामुळे त्या वेळेस आपला वस्त्रोद्योग खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण नव्हता.
संकरित कापूस :
भारतातील पारंपरिक कापसाच्या जाती या गॉसिपियम अबरेरियम व गॉसिपियम हबरेसियम या वर्गातील होत्या. या वर्गातील कापसाच्या सुधारणेला मर्यादा होत्या. त्यामुळे अमेरिका, इजिप्त, वेस्ट इंडिज यांसारख्या देशातून गॉसिपियम हिरसुटुम व गॉसिपियम बार्बाडेन्स या वर्गातील कापसाच्या जाती भारतात आणून त्यांचा येथील स्थानिक कापसाशी संकर करण्याचे प्रयोग सुरू झाले. यासाठी संकरासाठी पश्चिमेकडील देशातील कापसाच्या जाती निवडणे हे मोठे आव्हान होते. कारण भारतातील जमिनी, हवामान व पावसाचे प्रमाण यामध्ये टिकाव धरू शकणाऱ्या अशाच जाती संकरासाठी योग्य होत्या. संकरित कापसावरील संशोधन १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू झाले. संकरित कापसाचा विकास ही भारतीय वस्त्रोद्योगाच्या इतिहासातील एक मोठी क्रांती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा