कापसाच्या पिकासाठी उष्ण व समशीतोष्ण हवामानाची गरज असते. सर्वसाधारणपणे कापसासाठी २१ ते ३० डिग्री सें. तापमान लागते. २० अंश सें.पेक्षा कमी तापमानात कापसाचे उत्पादन खूपच घटते. याशिवाय कापसाच्या योग्य वाढीसाठी कमीत कमी २१० दिवस (धुकेविरहित) मिळावे लागतात. ज्या ठिकाणी ५० ते १०० मि. मी.पर्यंत पाऊस होतो अशा जिराईत जमिनीतसुद्धा कापसाचे पीक चांगले येते. कमी पावसाच्या प्रदेशात सिंचनाने पाण्याचा पुरवठा करता येतो. कापसाला मुळातच कमी पाणी पुरते. या गोष्टी लक्षात घेतल्या, तर भारतात कोणत्या राज्यात कापूस पिकविला जातो हे सहज समजू शकते. कापूस हे खरीप हंगामातील पीक असून त्याचा कालावधी सुमारे ६ ते ८ महिन्यांचा असतो. उत्तर व मध्य भारतातील राज्यांत कापसाची लागवड एप्रिल-मे महिन्यांत केली जाते आणि काढणी डिसेंबर-जानेवारीपूर्वी होते, तर दक्षिणेकडील राज्यांत कापसाची लागवड थोडीशी उशिरा म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करतात आणि वेचणी जानेवारी ते एप्रिल महिन्यांत होते.
कापसाच्या पिकासाठी काळी जमीन फार चांगली. या प्रकारची जमीन दक्षिण पठार, माळवा आणि गुजरातच्या काही भागांत आढळते. सतलज-गंगा खोऱ्यातील तांबूस पिवळसर मातीत तसेच दक्षिण द्वीपकल्पातील तांबूस मातीतही कापसाचे पीक घेता येते.
भारतामध्ये कापसाचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडू. याशिवाय ओरिसा आणि इतर राज्यांत थोडय़ा प्रमाणावर कापसाचे पीक घेतले जाते. गेल्या काही वर्षांतील इतिहास पाहिला तर असे दिसून येईल की, सुमारे २००० सालापर्यंत महाराष्ट्र कापूस उत्पादनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर होता; पण नंतर गुजरातने कापसाच्या उत्पादनांच्या बाबतीत आघाडी घेतली आणि आजही गुजरात प्रथम क्रमांकावर आहे.
संस्थानांची बखर: हिरा पन्ना
छत्रसाल आपल्या पन्ना येथील राज्यस्थापनेच्या काळात तेथील महान व्रतस्थ आणि विचारवंत, महामती प्राणनाथ यांच्या संपर्कात आला.
प्राणनाथांच्या विचारांनी आणि शिकवणीने जसा छत्रसाल प्रभावित झाला त्याचप्रमाणे प्राणनाथही छत्रसालचे राष्ट्रप्रेम आणि इतर गुणांनी प्रभावित झाले. पन्नामध्ये प्राणनाथांचे बारा वष्रे वास्तव्य होते आणि त्यांनी तिथे समाधी घेतली. त्यांच्या पन्नातील वास्तव्याने आणि छत्रसालला दिलेल्या आशीर्वादामुळेच या प्रदेशाचे भाग्य उजळून सर्व पंचक्रोशीत सुजलाम सुफलाम झाले, अशी इथल्या लोकांची धारणा आहे.
प्राणनाथांनी छत्रसालना आशीर्वाद देताना एक लहान तलवार देऊन तू सर्व युद्धांत यशस्वी होशील आणि तुझ्या राज्यात हिरे मिळतील व त्यामुळे राज्य संपन्न होईल, असे भाकीत केले. त्यांचे भाकीत खरे ठरले! पन्ना शहराच्या ईशान्येस सध्या िवध्य पर्वतरांगांमध्ये हिऱ्यांच्या अडीचशे खाणी आहेत. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धापासून येथील खाणींमधून हिरे काढले जात असल्यामुळे सध्या त्यापकी बहुसंख्य खाणींत हिरे मिळत नाहीत. अशा रिकाम्या झालेल्या अनेक खाणींचे ९ मीटर खोलीचे आणि ७ मीटर व्यासाचे अनेक खड्डे पन्नाच्या आसपास आढळून येतात. सध्या चालू असलेल्या खाणींमधून भारतीय खाण विकास महामंडळातर्फे हिरे बाहेर काढले जातात आणि दरवर्षी जानेवारीत त्यांचा लिलाव केला जातो.
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com