कापसाच्या पिकासाठी उष्ण व समशीतोष्ण हवामानाची गरज असते. सर्वसाधारणपणे कापसासाठी २१ ते ३० डिग्री सें. तापमान लागते. २० अंश सें.पेक्षा कमी तापमानात कापसाचे उत्पादन खूपच घटते. याशिवाय कापसाच्या योग्य वाढीसाठी कमीत कमी २१० दिवस (धुकेविरहित) मिळावे लागतात. ज्या ठिकाणी ५० ते १०० मि. मी.पर्यंत पाऊस होतो अशा जिराईत जमिनीतसुद्धा कापसाचे पीक चांगले येते. कमी पावसाच्या प्रदेशात सिंचनाने पाण्याचा पुरवठा करता येतो. कापसाला मुळातच कमी पाणी पुरते. या गोष्टी लक्षात घेतल्या, तर भारतात कोणत्या राज्यात कापूस पिकविला जातो हे सहज समजू शकते. कापूस हे खरीप हंगामातील पीक असून त्याचा कालावधी सुमारे ६ ते ८ महिन्यांचा असतो. उत्तर व मध्य भारतातील राज्यांत कापसाची लागवड एप्रिल-मे महिन्यांत केली जाते आणि काढणी डिसेंबर-जानेवारीपूर्वी होते, तर दक्षिणेकडील राज्यांत कापसाची लागवड थोडीशी उशिरा म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करतात आणि वेचणी जानेवारी ते एप्रिल महिन्यांत होते.
कापसाच्या पिकासाठी काळी जमीन फार चांगली. या प्रकारची जमीन दक्षिण पठार, माळवा आणि गुजरातच्या काही भागांत आढळते. सतलज-गंगा खोऱ्यातील तांबूस पिवळसर मातीत तसेच दक्षिण द्वीपकल्पातील तांबूस मातीतही कापसाचे पीक घेता येते.
भारतामध्ये कापसाचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तामिळनाडू. याशिवाय ओरिसा आणि इतर राज्यांत थोडय़ा प्रमाणावर कापसाचे पीक घेतले जाते. गेल्या काही वर्षांतील इतिहास पाहिला तर असे दिसून येईल की, सुमारे २००० सालापर्यंत महाराष्ट्र कापूस उत्पादनाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर होता; पण नंतर गुजरातने कापसाच्या उत्पादनांच्या बाबतीत आघाडी घेतली आणि आजही गुजरात प्रथम क्रमांकावर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा