कीटकनाशकापासून होणाऱ्या कापूस पिकाचे नुकसान लक्षात घेऊन कापसाच्या रोपटय़ाची किंवा मूळ वनस्पतीची प्रतिकार क्षमता कशी वाढवता येईल यासाठी कृषितज्ज्ञांचे प्रयत्न सुरू झाले. त्यातल्याच प्रयोगातून कापसाच्या मूळ पेशीय रचनेत बदल करण्यात आले आणि त्यातून बीटी कापसाची निर्मिती झाली. कापसाच्या प्रती हेक्टर उत्पादनात बीटी कापसाच्या लागवडीने वाढ झाली आहे आणि कीटकनाशकांचा वापरही कमी झाला आहे.
रंगीत कापूस : आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे रंगीत कापूस बनवण्याचा नवीन प्रयोग सुरू करण्यात आला आहे. भविष्यात जर उत्कृष्ट दर्जाच्या रंगीत कापसाची निर्मिती होऊ शकली, तर प्रति हेक्टर उत्पादनातही वाढ होईल आणि नवीन पद्धतीचे वस्त्र निर्माण होऊ शकेल. कापसाच्या जागतिक उत्पादनाच्या प्रांगणात भारताचा वाटा लक्षणीय आहे. त्यामुळे िहदुस्तानच्या अर्थकारणावर असलेला निर्णयात्मक परिणाम व हे उत्पादन वाढण्याची आवश्यकता लक्षात येईल. याहीपेक्षा जास्त महत्त्वाची बाब म्हणजे त्याकरिता लागणारे संशोधनात्मक प्रयास व त्याला लागणारा अर्थसंकल्पातील वाटा याचे भान असणे गरजेचे आहे.
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा (चीन पहिला) कापूस उत्पादक देश आहे. भारताचा जागतिक कापूस उत्पादनातील वाटा १८% आहे. भारतातील कापसाच्या लागवडीखालील जमीन एक कोटी बावीस लाख हेक्टर आहे. जगातील कापसाच्या लागवडीखालील जमिनीच्या २५% एवढं हे प्रमाण आहे. भारतातील उत्पादकतेचा विचार केल्यास प्रतिहेक्टर उत्पादन – जगातील सर्वात कमी आहे. याबाबतीत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना यश येत असून थोडय़ाच वर्षांत उत्पादकतेची जागतिक पातळी आपण गाठू शकू अशी आशा आहे.
निरनिराळ्या कापसांच्या-संकरित, सेंद्रीय, बीटी, रंगीत- यासारख्या कापसाच्या जाती भारताच्या अर्थकारणावर फार मोठा प्रभाव टाकतात. कापूस एक प्रमुख व्यापारी पीक आहे. वस्त्रोद्योगांतून आर्थिक उन्नतीची फार मोठी संधी असताना भारत मागे आहे. प्रामुख्याने जागतिक उलाढालीचा विचार करता भारत कृषिप्रधान देश असूनही वस्त्रोद्योगात पिछाडीवरच आहे. पुढील पन्नास वर्षांत वस्त्रोद्योगाचे महत्त्व अधिकाधिक वाढणे गरजेचे आहे.
कोटय़वधी लोकांचा चरितार्थ कापूससंबंधित व्यवसायावर अवलंबून असतो. जागतिक संदर्भात कापसाचा आणि कापूस उत्पादनातून होणाऱ्या वस्त्रोद्योगांचा विचार करता, काही प्रमुख गोष्टींचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे.
संस्थानांची बखर: ग्वाल्हेर राज्याची स्थापना
आठव्या शतकात मध्य भारतातील सूर्यसेन या एका वन्य जमातीच्या प्रमुखाला झालेला असाध्य आजार ग्वालिपा या साधूच्या उपचारांनी बरा झाला. त्यामुळे सूर्यसेनाने प्रभावित होऊन आपल्या छोटय़ा वस्तीला ग्वालियर हे नाव दिले. ग्वालियर आणि आसपासचा प्रदेश इ.स. १७३१ पर्यंत प्रथम दिल्लीच्या सुलतानांच्या आणि त्यानंतर मोगल बादशहांच्या अमलाखाली होता.
राणोजी िशदे हा साताऱ्याजवळच्या एका खेडय़ातील कुणबी मराठा समाजातील तरुण, मराठय़ांच्या सेनेत सेनाधिकारी होता. बाजीराव पेशव्यांनी उत्तर भारतात काढलेल्या मोहिमांमध्ये माळवा, राजस्थान, दिल्ली, ओरिसा येथील मोहिमांमध्ये राणोजीने पार पाडलेल्या कामगिरीमुळे प्रभावित होऊन बाजीरावाने परतताना राणोजीला माळव्याचे चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले. उज्जन येथे राहून राणोजीने मराठा साम्राज्याचे महसुलाचे काम करतानाच आपले छोटेसे सन्य जमवून राज्य स्थापन केले. पुढील राज्यकर्त्यांनी या राज्याचा विस्तार करून आपले मुख्य ठाणे ग्वाल्हेर येथे हलविले.
मराठा राज्यसंघातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेले ग्वाल्हेरचे राज्य आणि त्याचे िशदे घराण्याचे राज्यकत्रे अखेपर्यंत मराठा साम्राज्याला निष्ठावंत राहिले. ब्रिटिशांच्या सेंट्रल इंडिया एजन्सीतील सर्वाधिक मोठय़ा असलेल्या ग्वाल्हेर संस्थानाचा विस्तार ६८ हजार चौरस किमी. असा विशाल होता. ब्रिटिश राजवटीने या संस्थानाला २१ तोफांच्या सलामीचा बहुमान दिला होता. १९३६ साली ग्वाल्हेर संस्थान सेंट्रल इंडिया एजन्सीतून निराळे काढून ब्रिटिशांनी त्यांच्या गव्हर्नर जनरलच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आणले. भारतीय स्वातंत्र्यानंतर हे राज्य मध्य भारत प्रांतात सामील केले गेले.
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com