पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केळवडे गाव टॉमेटो, भाजीपाला आणि पॉलीहाऊससाठी प्रसिद्ध आहे. या गावातील शामसुंदर बाबूराव जायगुडे आपल्या मोठय़ा भावाच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपासून बारा एकर शेतीत विविध भाज्या, कडधान्य, भात, गहू असे उत्पादन घेत होते. उत्पादन तर चांगले होत होते; पण चांगला बाजारभाव मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून त्यांनी काही एकर जमिनीत चिकू, आवळा आणि उसाची लागवड केली. चार एकरांत उसाचे एकरी ८० टन उत्पादन मिळाले. व्यापाऱ्यांकडून मागणीही चांगली आली, पण पसे मात्र आले नाहीत. पहिल्याच वर्षी ऊस काढून केळ्याची लागवड केली. पुन्हा उत्पादन चांगले आले, पण नफा फार कमी झाला.
उत्पादन आणि नफ्याचे गणित काही जुळत नव्हते. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनीचा पोत खालावला होता. या संकटांना न घाबरता आपली कल्पकता वापरून त्यांनी मिश्र पिके आणि मिश्र खते यांच्या वापराने जमिनीच्या क्षेत्रानुसार त्या-त्या हंगामात येणारी पिके घेतली. या वेळी त्यांनी शेणखत, गांडुळ खत, सेंद्रिय खते आणि गरजेनुसार रासायनिक खते वापरली. एक वर्षांतच या पद्धतीचा त्यांना फायदा झाला. मंडल कृषी अधिकारी, नसरापूर यांच्या मदतीने गांडुळ खतनिर्मिती प्रकल्प त्यांनी सुरू केला.
पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डात जायगुडे यांचे येणेजाणे होते. तिथे त्यांनी काही दुकानात कधी न पाहिलेल्या, ऐकलेल्या परदेशी भाज्या पाहिल्या. प्रयोगशील जायगुडे यांनी या भाज्यांविषयी माहिती मिळवली. ब्रोकोली, बेबीकॉर्न, रोझमेरी, सेलेरी, थाई चिली, चायनीज कोबी, चेरी टॉमेटो इत्यादी भाज्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्या. इंटरनेटवरून माहिती मिळवली. टप्प्याटप्प्याने पाच-पाच गुंठय़ांवर या परदेशी भाज्यांची लागवड केली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. सेंद्रिय उत्पादनं असल्याने त्यांच्या मालाला चांगली मागणी आहे. पुण्यातील मोठमोठय़ा हॉटेलांमध्ये त्यांच्या भाज्या विकल्या जातात. परदेशी भाज्या उत्पादनात बारामती आणि नसरापूर येथील कृषी अधिकाऱ्यांचे त्यांना चांगले मार्गदर्शन लाभले.

वॉर अँड पीस: उंची वाढविण्याकरिता : आयुर्वेदीय उपचार- भाग-२
आधुनिक शारीर विज्ञानशास्त्राप्रमाणे तात्त्विकदृष्टय़ा वयाच्या पंचवीस वर्षांपर्यंत हाडाची वाढ होऊ शकते. पण गेल्या अनेक वर्षांच्या रुग्णानुभवामुळे, वयाच्या एकोणीस वर्षांनंतर व्यायाम, सूर्यनमस्कार, पथ्यापथ्य व विविध औषधे न कंटाळता नियमितपणे वापरली तरी शरीराची उंची वाढणार नाही हे वास्तव सत्य आहे. बालगोपाळांना वय वर्षे दहा-बारापर्यंत केवळ उंचीकरिता औषधे द्यावी घ्यावी याच्या मी पूर्ण विरोधात आहे. वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत मुले दंगामस्ती, भरपूर खेळ, धावणे, बागडणे करत असतातच. ते त्यांना करा असे वेगळे सांगण्याची गरज नसते. सूर्यनमस्काराचा आग्रह मात्र उंची वाढविण्याकरिता फारच आवश्यक आहे. वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत पुरेशी उंची नसल्यास आई-वडिलांच्याही उंचीचा विचार जरूर व्हावा. तरी पण बुटक्या आई-वडिलांची मुले बुटकीच राहतील असे नाही. ‘प्रयत्नांती परमेश्वर’.. त्याकरिता दोरीच्या उडय़ा, पोहणे व आवडीचे व्यायाम अवश्य करावेतच.
पुरेशी उंचीची वाढ नसणे याच्यामागे प्रामुख्याने ३ प्रकारची कारणे असू शकतात. काही मुलांना जंत, कृमी, आमांश, वारंवार मलप्रवृत्ती, अरुची अशी लक्षणे असतात. काहींचा आहार एकांगी व बाहेर खाणेपिणे जास्त असा असतो. निकस आहार, पाव-बिस्किटे, मेवामिठाई, अवेळी व अपुरे खाणे यामुळे ही शरीरातील अस्थी या धातूचे पुरेसे पोषण होत नाही. आपण जे खातो-पितो त्या अन्नाचे परिणमन रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सात धातूंत क्रमाक्रमाने होत असते. शरीरातील अस्थी धातूची कमतरता सुधारायला किमान ६ ते ९ आठवडे लागतात.
पुरेसा व्यायाम घ्यावा, पथ्यपाणी पाळावे. लाक्षादिगुग्गुळ, कृमिनाशकवटी, शृंगभस्म प्र. ३ गोळय़ा दोन वेळा बारीक करून घ्याव्यात. बालक खूप अशक्त असल्यास गोळय़ांचे प्रमाण कमी म्हणजे दोन-तीन वेळा जोडीला शतावरीकल्प, अश्वगंधापाक, च्यवनप्राश अशांपैकी एकाची निवड करावी. जय बजरंग!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      देवा हे ऐसें कसे?
स्वत:ची इच्छा नसताना बलात्कार केल्याप्रमाणे पुरुष असली पापे करतो. त्याच्या मागची प्रेरणा काय, असा प्रश्न अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो तेव्हा त्याचे उत्तर तिसऱ्या अध्यायातल्या सदतिसाव्या श्लोकात देताना काम आणि क्रोध हे दोन त्या प्रेरणेचा उगम आहेत, असे उत्तर श्रीकृष्ण देतो त्यावर ज्ञानेश्वरांनी वीस ओव्या सांगितल्या आहेत. त्यातच सध्याच्या स्थितीचे वर्णन आले आहे. मला समजतील अशा भाषेत मी काही रूपांतरित केल्या आहेत..
काम आणि क्रोध। हेच त्याला कारण। यांच्यात दया नाही। एकही कण।
हे जाणिवेच्या ढिगाऱ्यावर। बसलेले साप। वासनांच्या अरण्यातले। हिंस्र वाघ।। हे मनामध्ये। मूळचे असुरी। अविद्या त्यांची। दाई।। हपापण्यात जन्मले। आळसात लडबडले। आणि प्रमादांनी भरले। असे हे।जिच्या भुकेला। विश्वाचा घास अपुरा। ती आशा करते। यांची रक्षा।। मोह काम क्रोधांना मान देतो। जगाला खेळणे म्हणून नाचवतो। आणि अहंकाराशी। करतो देवघेव।। ज्याने सत्याचा कोथळा काढला। मग दुष्कृत्यांचा पेंढा भरला। तो दंभ। या काम क्रोधाने पोसला।। सद् विचारांचा आश्रय। उधळला। आणि निग्रहाचा। गळा घोटला।। वैराग्याचे चामडे लोळवले। संतोषाचे वन मोडले। धैर्याचे किल्ले पाडले। आनंदाचे रोपटे उपटले।। समजुतीची घडी विस्कटली। सुखाची बाराखडी पुसली। आणि मनाला। काळजीची आग लावली।।
हे शरीराबरोबर जन्मले। अंत:करणाला चिकटले।
पण ब्रह्मदेवालाही। नाही सापडले।।
 हे आत्म्याच्या शेजारीच। बसतात पंक्तीला।
मग धरणार तरी कसे। जरी विनाश करतात।।
हे पाण्यावाचून बुडवतात। आगीशिवाय जाळतात।
गुपचूप प्राणाला। आवळतात।।
हे शस्त्राशिवाय मारतात। दोरी वाचून करकचवतात।
आणि ज्ञानी माणसांना। पैज लावून हरवतात।।
चिखलावाचून रुतवतात। जाळ्याशिवाय गुरफटवतात।
कसे आणणार आटोक्यात। फार आत असतात।।
वाचकांनो, कुठलेही वर्तमानपत्र दहा दिवस सलग वाचा म्हणजे काम, क्रोध, वासना, इच्छा, आशा, लोभ, दंभ, भ्रम, मोह या सगळ्यांची चित्रे तुम्हाला सहज दिसतील. याला भवसागर म्हणतात.
या भवसागराच्या पलीकडच्या काठावर जायचे असते अशी कल्पना आहे. त्याचेही मोठे कुरूप वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे, पण त्यावर उपायही सांगितला आहे. तसेच काम आणि क्रोधाला बलात्काराची गोष्टही सांगितली आहे.
हा बलात्कार सतत आपल्या आत चालू असतो. त्याबद्दल उद्या.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ७ नोव्हेंबर
१९०३ > शिक्षण व बाल मानसशास्त्र या विषयांवर मराठीत लिहिणारे भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म. बालपणाचे रहस्य, बाल अवलोक, भाषा व्यवसाय, अध्यापन व मानसशास्त्र, शिक्षणविषयक नवे विचार ही त्यांची पुस्तके होत. महर्षी अण्णासाहेब कव्र्याचे ते द्वितीय पुत्र.
१९०५ > मराठी कवितेला आधुनिक रूप देणारे कवी केशवसुत तथा कृष्णाजी केशव दामले यांचे वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी निधन. इंग्रजी रोमँटिक (अद्भुतवादी) काव्य आणि पंतकाव्य यांच्या पुढे जाणारी, देशप्रेम आणि व्यक्तिस्वातंत्र्य ही मूल्ये मानणारी कविता त्यांनी लिहिली. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘हरपले श्रेय’, ‘सतारीचे बोल’, या त्यांच्या महत्त्वपूर्ण कविता आहेत.
१९६३ > कथाकार व ‘प्रसाद’ मासिकाचे संस्थापक-संपादक यशवंत गोपाळ जोशी यांचे निधन. अनेक कथासंग्रहांचे ते लेखक, तसेच ‘वादविवेचन माले’चे (१३ खंड) प्रकाशनही त्यांनी तडीस नेले.
२००९ > सुनीताबाई देशपांडे यांचे निधन. आहे मनोहर तरी, मण्यांची माळ,  सोयरे सकळ आदी पुस्तके आणि ‘प्रिय जीए’ हा पत्रसंग्रह यांच्या त्या लेखिका आणि महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी. सुनीताबाईंचे लेखन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकेच स्पष्ट असे.
संजय वझरेकर

Story img Loader