पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केळवडे गाव टॉमेटो, भाजीपाला आणि पॉलीहाऊससाठी प्रसिद्ध आहे. या गावातील शामसुंदर बाबूराव जायगुडे आपल्या मोठय़ा भावाच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपासून बारा एकर शेतीत विविध भाज्या, कडधान्य, भात, गहू असे उत्पादन घेत होते. उत्पादन तर चांगले होत होते; पण चांगला बाजारभाव मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून त्यांनी काही एकर जमिनीत चिकू, आवळा आणि उसाची लागवड केली. चार एकरांत उसाचे एकरी ८० टन उत्पादन मिळाले. व्यापाऱ्यांकडून मागणीही चांगली आली, पण पसे मात्र आले नाहीत. पहिल्याच वर्षी ऊस काढून केळ्याची लागवड केली. पुन्हा उत्पादन चांगले आले, पण नफा फार कमी झाला.
उत्पादन आणि नफ्याचे गणित काही जुळत नव्हते. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनीचा पोत खालावला होता. या संकटांना न घाबरता आपली कल्पकता वापरून त्यांनी मिश्र पिके आणि मिश्र खते यांच्या वापराने जमिनीच्या क्षेत्रानुसार त्या-त्या हंगामात येणारी पिके घेतली. या वेळी त्यांनी शेणखत, गांडुळ खत, सेंद्रिय खते आणि गरजेनुसार रासायनिक खते वापरली. एक वर्षांतच या पद्धतीचा त्यांना फायदा झाला. मंडल कृषी अधिकारी, नसरापूर यांच्या मदतीने गांडुळ खतनिर्मिती प्रकल्प त्यांनी सुरू केला.
पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डात जायगुडे यांचे येणेजाणे होते. तिथे त्यांनी काही दुकानात कधी न पाहिलेल्या, ऐकलेल्या परदेशी भाज्या पाहिल्या. प्रयोगशील जायगुडे यांनी या भाज्यांविषयी माहिती मिळवली. ब्रोकोली, बेबीकॉर्न, रोझमेरी, सेलेरी, थाई चिली, चायनीज कोबी, चेरी टॉमेटो इत्यादी भाज्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्या. इंटरनेटवरून माहिती मिळवली. टप्प्याटप्प्याने पाच-पाच गुंठय़ांवर या परदेशी भाज्यांची लागवड केली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. सेंद्रिय उत्पादनं असल्याने त्यांच्या मालाला चांगली मागणी आहे. पुण्यातील मोठमोठय़ा हॉटेलांमध्ये त्यांच्या भाज्या विकल्या जातात. परदेशी भाज्या उत्पादनात बारामती आणि नसरापूर येथील कृषी अधिकाऱ्यांचे त्यांना चांगले मार्गदर्शन लाभले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा