क्युप्राअमोनिअम रेयॉन हा तंतू व्हिस्कोज इतकाच जुना किंबहुना त्यापेक्षाही पूर्वीचा आहे.
आधी सेल्युलोजचा साका तयार करून त्याला तनित्राच्या सूक्ष्म छिद्रांमधून बाहेर खेचून तंतूंची निर्मिती केली जात असल्याने या प्रक्रियेस ताण कताई (स्ट्रेच स्पििनग) असे म्हणतात. अशा रीतीने क्युप्राअमोनियम रेयॉन तंतूंची निर्मिती केली जाते. क्युप्राअमोनियमच्या द्रावणाचा महत्त्वाचा विशेष म्हणजे ते दीर्घकाळ साठवून ठेवून कालांतराने वापरले तरी चालते. कारण त्याचे विघटन होऊन ते वाया जात नाही.
क्युप्राअमोनियम तंतूंचे गुणधर्म सर्वसाधारणपणे व्हिस्कोज तंतूंसारखे असतात. या तंतूंची ताकद कोरडे असताना साधारणपणे व्हिस्कोज तंतूएवढीच असते आणि ओले झाल्यावर व्हिस्कोजप्रमाणे २५ ते ३०% कमी होते. क्युप्राअमोनियम तंतूची स्थितिस्थापकता व्हिस्कोज रेयॉन तंतूइतकीच किंवा थोडी कमी असते. या तंतूंपासून बनविलेले कापड सहसा लवकर चुरगळत नाही आणि चुरगळले तरी थोडीशी इस्त्री फिरवली की ते पूर्ववत होते. क्युप्राअमोनियमचे तंतू अतिशय तलम असतात व त्यांना चमक व झळाळी खूप चांगली असते म्हणून त्यापासून बनविलेली वस्त्रे अतिशय तलम, आरामदायी व आकर्षक असतात. या तंतूंचा एक दुर्गुण म्हणजे ते चटकन पेट घेतात. म्हणूनच या तंतूच्या कापडाला इस्त्री करताना कापडावर पाणी मारून, मध्यम तापलेली इस्त्री वापरली जाते किंवा वाफेच्या इस्त्रीचा वापर केला जातो. या तंतूंची शोषणक्षमता चांगली असते आणि त्यांना अत्यंत आकर्षक व उठावदार रंग देता येतात.
पूर्वी हातमागावरच्या साडय़ांच्या काठावरच्या आणि पदरावरच्या नक्षीकामात या तंतूंचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात असे. हे तंतू उष्णतेचे शीघ्रवाहक, तलम आणि बाष्पशोषक असल्यामुळे त्यांचा उपयोग स्त्रियांचे लांब मोजे तसेच अंतर्वस्त्रे यासाठी केला जातो. या तंतूंपासून बनविलेले कापड उन्हाळ्यात वापरावयास अतिशय आरामदायी असते. असे असले तरी जगभर या तंतूंचे उत्पादन गेल्या काही वर्षांत खूपच घटत गेले आणि आज तर ते नगण्य आहे.
संस्थानांची बखर: इंदौर राज्यस्थापना
पुण्याजवळच्या जेजुरीनजीकचे खेडे होळ येथील राहणारे मल्हारराव होळकर यांनी १७३३ साली इंदौरचे राज्य स्थापन केले. एक कुशल योद्धा म्हणून मल्हाररावांचा मराठा सन्यात लौकिक होता. पहिला बाजीराव उत्तर दिग्विजय करीत लढाया मारीत असताना त्यांच्याबरोबर अनेक मराठी सेनाधिकारी आपले युद्धकौशल्य दाखवीत होते. उत्तर भारतातील मल्हाररावांच्या उत्तम कामगिरीने प्रभावित होऊन बाजीरावाने त्यांना इंदौरची जहागिरी दिली. निजामाशी झालेल्या लढायांमध्ये विजय मिळविल्यावर संपूर्ण माळव्यावर मराठय़ांचे वर्चस्व स्थापन झाले. त्यानंतर मल्हाररावांना माळव्याची चौथ वसुलीची कामगिरी देऊन पेशव्यांनी त्यांना माळव्याचे सुभेदारपद देऊन त्यांना इंदौरजवळचे २८ परगणे दिले. मल्हाररावांनी उत्तर भारतात मराठय़ांचे वर्चस्व निर्माण करून आपला दरारा बसविला. मल्हाररावांनी स्वत: अनेक लढायांमध्ये भाग घेतला. त्यापकी मराठय़ांचा दिग्विजय, निजामाचा भोपाळ येथे पराभव, पोर्तुगीज मराठा युद्धात मल्हाररावांचा सहभाग, जयपूर शासकास मदत हे उल्लेखनीय आहेत. पानिपतच्या तिसऱ्या युद्धापूर्वीच मल्हाररावांनी अहमदशाह अब्दाली याच्याशी तहाची बोलणी करून त्याला युद्ध न करता परत पाठविण्याची योजना आखली होती. परंतु त्या आधीच पेशव्यांचे सन्य दिल्लीपर्यंत पोहोचले होते. पानिपत युद्धात गंभीर जखमी झालेल्या मल्हाररावांवर पार्वतीबाईंना सुखरूप बाहेर काढून पुण्यास पोहोचविण्याची कामगिरी सदाशिवराव भाऊंनी सोपविली होती. त्याप्रमाणे ती त्यांनी बरोबर पार पाडली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com