आफ्रिकेतील युगांडा या देशात १९९९मध्ये बुरशीचा नवाच वाण उदयास आला. या कवकाचे शास्त्रीय नाव पुसिनिया स्ट्रीफोरमिस, परंतु ती ‘यूजी९९’ अशा नावाने ओळखली जाते. या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाला ‘पट्टीदार गंज’ (स्ट्राइप रस्ट) असे नाव आहे. ही बुरशी रोपाच्या प्रजनन प्रक्रियेत बाधा आणून त्याचे नुकसान करत असते, असे संशोधकांना आढळले आहे. गव्हासोबतच ही बुरशी अन्य कुठल्या पिकावर घाला घालत नाही ना, याचाही मागोवा शास्त्रज्ञ घेत आहेत. या बुरशीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास गव्हाचा तुटवडा निर्माण होऊन अन्नधान्याचा दुष्काळ पडू शकतो. आतापर्यंत उपलब्ध असलेली कीटकनाशके या बुरशीबाबत निष्प्रभ ठरली आहेत. ऑस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्रज्ञ तेथील ‘ग्रेन रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या मदतीने यूजी९९ विषाणूंना थारा न देणाऱ्या जनुकांच्या शोधात आहेत.
जगभर विविध प्रकल्पांद्वारे याविषयी संशोधन सुरू आहे. अशाच एका प्रकल्पाला बिल आणि मेलिन्दा गेट्स फाऊंडेशनने २.६ कोटी डॉलर्स दान केले आहेत. परंतु अर्थतज्ज्ञांच्या मते, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दरवर्षी पाच कोटी डॉलरची गरज आहे. अमेरिकेतील अॅग्रिकल्चरल रिसर्च सव्र्हिसचे तज्ज्ञ आपल्या देशातील गव्हाचे विविध वाण आफ्रिकेतील निरनिराळ्या देशांत पाठवून त्यांचा यूजी९९ पुढे टिकाव लागतो का, याचा आढावा घेत आहेत.
अमेरिकेच्या शेतकी खात्यामधील शास्त्रज्ञांनी याबाबत आशादायक शोध लावलेला असून, त्यांनी गव्हाच्या फांद्या आणि पानावर मुक्काम ठोकणाऱ्या बुरशीचे वाण हुडकून काढले आहेत. ही कवके यजमानांच्या ऊतींवर ताव मारतात व विशिष्ट प्रथिने उत्सर्जति करून पिकांची रोगप्रतिकारकशक्ती दुबळी करतात. ही हानीकारक प्रथिने नाना तऱ्हेची असतात आणि त्यावर इलाज करणे खूप मुश्कील काम आहे, हे वैज्ञानिकांच्या लक्षात आले आहे.
जगभर गव्हाचा साठा कमी होत असताना रोगराईचा हा आघात वेळीच पेलला नाही तर जगभरच्या अन्नतुटीची समस्या आणखीच गंभीर होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा