पशूंना रोग व आजार होणार नाहीत याची सतत काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता वेगवेगळ्या रोगप्रतिबंधक लसी योग्य वेळी टोचून घेणे महत्त्वाचे आहे. लस विषाणूंपासून होणाऱ्या रोगांना १०० टक्के प्रतिबंध करत नाही. काही कारणाने रोग झाले तर त्याचे मूळ शोधण्यात वेळ घालवणे धोकादायक ठरू शकते. एखाद्या रोगाची कोणती लक्षणे आपल्या पशूत दिसत आहेत, याचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी वेळोवेळी करायला हव्यात. निम्म्यापेक्षा जास्त पशूंना आजाराची सारखीच लक्षणे दिसत असल्यास ताबडतोब जवळच्या शासकीय पशुदवाखान्यात जाऊन त्याबद्दल सविस्तर माहिती द्यायला पाहिजे. ही माहिती तोंडी तसेच लेखी स्वरूपात द्यायला हवी, जेणे करून पशूंच्या आजाराची एखादी साथ आली असल्याचे वरच्या अधिकाऱ्यांना कळू शकते.
पशुवैद्यकाला आजारी पशूंची व्यवस्थित तपासणी करण्यास मदत करायला हवी. पशूला होणाऱ्या संभाव्य आजारांची पडताळणी तो करू शकतो. त्यासाठी वेगवेगळे नमुने तो गोळा करू शकतो. ते नमुने तो विशिष्ट रोगनिदान केंद्राकडे पाठवू शकतो. पशूला एखादा महत्त्वाचा आजार झाल्याची खात्री पटली तर त्याची लस बाजारात उपलब्ध आहे की नाही, हे तो पाहू शकतो. लस खरेदी करून पशूंना देण्यासाठी तो लसीकरणाचा कार्यक्रम तयार करू शकतो. लस दिल्यानंतर पशुंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास २१ ते ३० दिवस लागतात. त्यामुळे आजूबाजूच्या पशुपालकांना त्याची कल्पना देऊन आजार पसरू न देण्याची व्यवस्था तो करू शकतो.
जर आजार झाला तर लक्षणांवरून ताबडतोब उपचार सुरू केले जातात. उपचारांमध्ये जर लस उपलब्ध नसेल तर इतर प्रतिबंधक उपाय अवलंबले जातात.
यामध्ये इंजेक्शन दिले जाते. पोटात औषधे दिली जातात. शरीरावर लेप लावले जातात. पशूंना होणारा आजार पशुपालकाला खíचक ठरू शकतो. यादृष्टीने, पशूंचा विमा उतरवणे उपयोगी ठरते. विमा कंपनीला पशुवैद्यकाचा अहवाल पाठवून पशूला झालेल्या आजाराबद्दल कळवणे आवश्यक असते.
वॉर अँड पीस: वातविकार : भाग ६
आयुर्वेदिय व्यावसायिकांच्या वापरात वातविकारावरील उपचार म्हणून दोन औषधे हटकून असतात. ‘महारास्नादिक्वाथ व योगराजगुग्गुळ’ ही दोन वातावरील औषधे लहानथोरांना सर्वांनाच माहीत आहेत. महारास्नादिक्वाथ हा काढा, रास्नासप्तक म्हणून वातावरील सात प्रमुख औषधांच्या काढय़ाची सुधारून वाढविलेली आवृत्ती आहे. रास्नासप्तकात रास्ना, गोखरू, एरंडमूळ, देवदार, पुनर्नवा, गुळवेल, बाहवामगज अशी सात औषधे आहेत. या व्यतिरिक्त महारास्नादि काढय़ात धमासा, बला, कचोरा, वेखंड, अडुळसा, सुंठ, हिरडा, चवक, नागरमोथा, वरधारा, बडिशेप, आस्कंद, अतिविष, शतावरी, पियावासा, पिंपळी, धने, रिंगणी डोरलीमूळ, रास्ना आणखी एक भाग अशी औषधे आहेत. हा काढा रोज ताजा घेणे अधिक श्रेयस्कर आहे. प्र. औषध २ ग्रॅम याप्रमाणे सर्व औषधे आठ कप पाण्यात उकळवून त्याचा एक कप काढा उरवून, गाळून त्यात सुंठ, पिंपळी, योगराजगुग्गुळ, अजमोदादि चूर्ण किंवा एरंडेल तेल रोगपरत्वे अनुपान म्हणून मिसळून घ्यावे.
काही अपवादात्मक औषधे गोखरू, शतावरीसारखी मूत्रल व बल राखण्याकरिता उपयोगी आहेत. शरीरात ठिकठिकाणी साठलेल्या मेदाचे शोषण करणे, नाडीची दुर्बलता दूर करणे हेही काढय़ामुळे होते. ग्रंथोक्त विचाराप्रमाणे सर्वागकंप, कुब्जता, पक्षाघात, गृध्रसी, आमवात, श्लीपद, अपतानक, अंडवृद्धी आध्मान, जानुशूल, अर्दित, शुक्रदोष, वंध्यत्व व योनीदोष या विकारावर हा काढा उपयोगी आहे.
या विकारावर लिहिताना मला अनेकानेक रुग्णमित्रांच्या नेहमीच्या बोलण्याची आठवण येते. ‘खडीवाले खूप गुग्गुळ कल्प खाल्ले, तेले लावली, पथ्य पाळतोय पण वातविकार नेहमीकरिता पाठ सोडत नाही. काय करू? लठ्ठ व्यक्तींनी नेहमी त्रिफळा, गोक्षुरादिगुग्गुळ, चंद्रप्रभा, एरंडेल तेलावर परतलेली सुंठ याचा वापर करावा. कृश व्यक्तींनी शतावरी, आस्कंद, भुईकोहळा, चोपचिनी, वाकेरी, हरणखुरी यांच्याशी मैत्री ठेवावी.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत २८ जून
१९२२> लोकप्रिय गीतकार प्रा. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा जन्म. ‘चंद्रप्रकाश’, ‘गंधसमीर’ हे त्यांचे कवितासंग्रह. प्रेमातील विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण त्यांच्या कवितांतून दिसतेच, परंतु दांभिकता, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रवृत्तीही दिसते. ‘श्लोक केकावली’ ‘संजीवनी’ या काव्याची तसेच ‘सं. एकच प्याला’, ‘सं. शारदा’ या नाटकांची संहिता-संपादने त्यांनी केली. म्जन्मदिनाच्याच तारखेस, परंतु २८ जून १९९० रोजी त्यांचे निधन झाले.
२००६> संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक, समीक्षक निर्मलकुमार जिनदास फडकुले यांचे निधन. २० पुस्तके आणि सात संपादित पुस्तके अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. लोकहितवादी- काळ आणि कर्तृत्व, संतकवी तुकाराम- एक चिंतन, संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना, संतांचिया भेटी, संतवाणीचे झंकार ही संतसाहित्याचा अभ्यास मांडणारी पुस्तके, तसेच समाज परिवर्तनाची चळवळ- काल आणि आज, चिंतनाच्या वाटा, साहित्यातील प्रकाशधारा हे त्यांचे महत्त्वाचे लेखसंग्रह. याशिवाय प्रबोधनातील पाऊलखुणा, निवडक लोकहितवादी, या संपादित पुस्तकांतून एकोणिसाव्या शतकाच्या सुधारणाविषयक चळवळीचा आढावा त्यांनी घेतला आहे.
संजय वझरेकर
जे देखे रवी.. मृत्यू नावाचे कर्म
एक निवासी वैद्यकी अधिकारी म्हणून मी पहिला मृत्यूचा दाखला लिहिला तेव्हाची आठवण अजून मनावर कोरलेली आहे. एक तीस वर्षांचा तरुण अपघातात दगावला होता. त्याची बायको त्यांच्या शेजारी बसून धाय मोकलून रडत होती. तिचा पाच वर्षांचा मुलगा तिला बिलगला होता, पण जे झाले त्याने रडू येते याची त्याला कल्पनाच नव्हती. त्याची धाकटी तीन वर्षांची बहीण आपल्या हातातल्या खेळण्यात गुंग होती. जोडप्याचे दोन्ही बाजूचे आई-वडील दु:खाने विव्हळत तर होतेच, पण भविष्याचा विचार करीत खचले होते. तिथली परिचारिका वॉर्डात गर्दी करू नका, असे विनवीत होती. वॉर्डातल्या इतर रुग्णांच्या नातेवाईक बायका तोंडाला पदर लावून दुरून बघत होत्या आणि पुरुष बघ्यासारखे उभे होते. परिचारिका कर्मचाऱ्याला सांगत होती प्रेत लवकर गुंडाळ आणि कर्मचारी म्हणत होता ‘हे लोक हटतील तर मगच मला प्रेत गुंडाळण्याची सुरुवात करता येईल’ मृताचे शेजारीपाजारी आणि मित्र काय कधी विधी करायचे, कुठे न्यायचे या विचारात होते. मी जेमतेम २५ वर्षांचा असेन, पण त्या रात्री खोलीवर गेल्यावर मनात विचार आला मृत्यूची घटना एकच होती, पण किती निरनिराळे परिणाम त्या घटनेने घडत होते. इथे काहीतरी गफलत असणार.
आता असे लक्षात येते की, मृत्यू ही घटना कर्माच्या अव्याहत साखळीतले एक कर्म असले आणि त्याचे विश्लेषण वैज्ञानिक तऱ्हेने मांडता येत असले तरी त्या घटनेचे पडसाद मात्र भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर घडतात आणि त्या मृत्यू नावाच्या गोष्टीबद्दल किंवा कर्माबद्दल आध्यात्मिक पातळीवर विचार केल्याशिवाय समजूत पटत नाही. आपण कर्माच्या साखळीतली एक तात्पुरता शृंखला आहोत हा विचार जे करीत नाही ते मोडकळीस येऊ शकतात.
जगद्गुरू शंकराचार्यानी अर्जुनाचे उदाहरण दिले आहे. अर्जुनाची पळून जाण्याची तयारी भावनिक होती. तू राज्यकर्ता आहेस तुला व्यवहार बघायला हवा म्हणून तुला लढले पाहिजे हा श्रीकृष्णाने सांगितलेला सल्ला व्यावहारिक होता आणि तो देताना तू कर्तव्याच्या बेडीत अडकलेला आहेस असे भासत असले तरी ही कर्तव्याची बेडीच तुला तुझे कर्तव्य बजावण्यासाठीचे सामथ्र्य आणि स्वातंत्र्य बहाल करते आणि या प्रवाहात मृत्यू ही एक ओघातच ओढवलेली घटना असते, असे श्रीकृष्ण बजावतो, असा सारांश आहे. मी सांगितलेल्या गोष्टीत नंतर कोणी काय कशी भूमिका घेतली कोण जाणे. पण त्या वेळेला धाय मोकलून रडणारी ती बायको आता माझ्या एवढीच असणार किंवा ती गेलेलीही असेल. तिने धीर धरून आपल्या बच्च्यांसाठी तिचे कर्म केले असेल तर फारच बेहत्तर! तोच तिचा भावनिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक धर्म होता.
रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com