एल.पी.जी. म्हणजेच ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ होय. याचाच अर्थ, द्रवात रूपांतर केलेला वायू होय. हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असतो.
द्रवरूप वायू हा मूळ वायूपेक्षा आकाराने २४० पटीने कमी होतो. त्यामुळेच तर, छोटय़ाशा टाकीत ७००० लिटर गॅस ठासून भरता येतो. द्रवरूपातले त्याचे आकारमान २८ लिटर किंवा १४.२ किलोग्रॅम इतके भरते. पुन्हा, स्टोव्हमध्ये जाळण्यासाठी तो वायुरूपात मिळणे आवश्यक असते. त्यासाठी गॅसटाकीच्या तोंडावर एक रेग्युलेटर (नियंत्रक) बसविलेला असतो. त्यात वैशिष्टय़पूर्ण झडप असते. नियंत्रक ‘ऑन’ केला असता, टाकीतला द्रवरूपातला गॅस बाहेर पडतो. त्याच्यावरील दाब कमी झाल्याने तो वायुरूप धारण करतो. तो हवेत मिसळून सुरक्षित रबरी नळीच्या साहाय्याने स्टोव्हपर्यंत पोचतो.
वास्तविक, एल.पी.जी. हा अत्यंत ज्वालाग्राही वायू आहे, पण तो हवेत मिसळला तरच पेट घेऊ शकतो. कारण ज्वलनासाठी त्याला हवेतील ऑक्सिजनची गरज असते. विशेष म्हणजे या वायूला वास नसतो. या वायूची गळती लक्षात येण्यासाठी या वायूत मर्केप्टन नावाचे तीव्र वासाचे वायूरूप रसायन अल्प प्रमाणात मिसळतात. हा वास नाकावरून गेला की समजायचे ‘काहीतरी गडबड आहे’ आणि गोंधळून न जाता सावधगिरीची उपाययोजना करावी.
या वायूतील प्रोपेन आणि ब्युटेन यांचे प्रमाण ३०: ७० या गुणोत्तरात असते. तो वासरहित तसेच रंगहीन असतो. तो विषारी नाही, तसेच पटकन जळूनही जातो. मात्र, भवतालच्या वातावरणात तो जास्त प्रमाणात मुक्त झाला तर माणूस गुदमरण्याची शक्यता आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून लगेच खिडक्या, दारे उघडी करावीत. ठिणगी पडेल असे विजेचे साधन/ मोबाइल फोन वापरायचे नसते. तसेच पेटती मेणबत्ती अशा ठिकाणी घेऊन जाऊ नये. अन्यथा, हा उपयुक्त वायू धोकादायक ठरतो.
प्रबोधन पर्व: राजारामशास्त्री भागवत – विचक्षण समाजसुधारक
एकोणिसाव्या शतकात समाजसुधारणा, धर्मसुधारणा आणि अस्पृश्यतेविषयी अतिशय तर्कशुद्ध आणि बुद्धिवादी लेखन करणाऱ्यांमध्ये राजारामशास्त्री भागवत यांचा प्राध्यान्याने समावेश करावा लागतो. समाजसुधारक म्हणून भागवत यांनी केलेले कार्य नंतरच्या पिढय़ांच्या विस्मरणात गेले असले तरी त्यांची नात दुर्गाबाई भागवत यांनी १९७९ साली राजारामशास्त्री यांचे लेखन सहा खंडांमध्ये प्रकाशित करून मोठी कामगिरी केली आहे. विधवाविवाह, स्त्री-पुरुष समानता, जातिभेद या विषयावर भागवत यांनी केलेल्या लेखनामुळे तत्कालीन समाजात बराच वादंगही माजला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याविषयी लिहितात – ‘‘..अस्पृश्योद्धारासाठी अगदी सुरुवातीच्या काळात चळवळ करणाऱ्या लोकांपैकी ते एक होते. अस्पृश्यांसाठी झटणारे ते एक अत्यंत कळकळीचे कार्यकर्ते होते व त्यात त्यांचे कोणत्याही प्रकारचे राजकीय उद्दिष्ट नव्हते. या व्यतिरिक्त राजारामशास्त्री भागवतांची आठवण म्हणजे हिंदुसमाजाने आपला पाया तपासण्याची वेळ आली आहे असे सांगणारा पुरुष त्या काळात तरी विरळाच होता.’’ तर दुर्गाबाई भागवत लिहितात – ‘‘कै. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अस्पृश्यांच्या कार्याचा पाया राजरामशास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळेच घडला.’’ सानेगुरुजींनी भागवतांना ‘धर्ममूर्ती’ म्हटले आहे. गुरुजी म्हणतात – ‘‘जुन्याकडे नव्या दृष्टीने पाहणे व पुराणातील भाकडकथांचे अवगुंठन काढून त्यातील सत्य संशोधणे हे राजारामशास्त्री भागवतांचे काम होते.’’ सुरुवातीच्या उत्तम निबंधकारांत भागवतांचा समावेश होतो. त्यांच्या अतिशय स्पष्ट, परखड आणि विचारशील लेखनाने सामाजिक आणि ऐतिहासिक घटना-घडामोडींकडे पाहण्याची दृष्टी बदलते. मऱ्हाठा शब्दाच्या उत्पत्तीपासून मराठीच्या व्याकरणापर्यंत अनेक विषयांवर भागवतांनी केलेले लेखन आज महत्त्वाचा दस्तावेज ठरले आहे.
मनमोराचा पिसारा: सजनरे झूठ मत बोलो
बालस्तवत् क्रीडासक्त:, तरुणस्तवत् तरुणीसक्त:, वृद्धस्तवत् चिंतामग्न: ,परे ब्रह्माणि कोऽपि न रक्त:
चर्पटपंजरिका श्लोक ७
आणि अगदी सहजच ‘तीसरी कसम’मधल्या शैलेंद्रचे मुकेशने गायलेले शब्द आठवले-
सजनरे झूठ मत बोलो, खुदाके पास जाना है
लडकपन खेल में खोया, जवानी नींदभर सोया,
बुढापा देखकर रोया, सजनरे झूठ मत बोलो..
मूळ चर्पटपंजरीमधील श्रीशंकराचार्याच्या श्लोकावर भाष्य केलेलं काहींना (सनातन्यांना?) आवडणार नाही कदाचित! नको आवडू दे.
हिंदी गाण्यातल्या शब्दांचे अर्थ अगदी सरळ आणि सोपे आहेत. संस्कृत श्लोकामध्ये अर्थातच खोल उडी मारावी लागली.
गाण्यामध्ये सत्यापासून पळून जाऊ नकोस, तू नाकारलंस तरी ते बदलणार नाही, तुला त्याचा जाब द्यावा लागणार आहे अशी प्रेमळ दटावणी त्यात आहे. मृत्यूची अपरिहार्यता विसरू नकोस याचं भान राहावं म्हणून गाणं म्हटलंय असं वाटतं.
मित्रा, खरं म्हणजे हा ढोबळ अर्थ आहे. ते सत्य आहे पण ते उघड सत्य आहे. शंकराचार्याना त्या सत्यापलीकडे आणखी काहीतरी असल्याचं ठाऊक होतं आणि त्याविषयी ते बोलताहेत.
बालपणात खेळामध्ये मन रमलं. तारुण्यात लैंगिकतेमध्ये गुंतलं आणि म्हातारपणी त्याच अवस्थेमुळे चिंतामग्न झालं.
याचा अर्थ आपलं मन जे समोर दिसतंय, जाणवतंय अशा जाणिवेमध्ये गुंतलं. इतकं गुंतलं की तिथेच अडकलं, अडकून पडलं. त्या शारीरिक अनुभवांमध्ये आसक्त झालं. ते मुक्त झालं नाही. ते बद्ध राहिलं नाही.
वास्तविक पाहता, मन अशात रमलं की जे कधीच स्थिर नव्हतं, कधीच चिरंतन नव्हतं. अनित्य होतं. पण या अनित्याची ओढ इतकी की त्या अनित्यत्वाचं भान राहात नाही. जाणवतं तितकंच आणि तितपतच असतं असं विचार न करताच गृहीत धरतो. आणि हे सारं अवतीभवती उलगडत असताना सत्य काय? नि नित्य काय? याचा शोध घ्यायचा विसरून जातो. त्या सत्याचा शोध घेण्यात कोणाचं मन रमत नाही; असं ते म्हणतात.
पण अशा नित्य सत्याचा, चिरंतनाचा शोध घ्यायलाच हवा का? कशाला उगीच न समजणाऱ्या, न उमजणाऱ्या, पचनी न पडणाऱ्या उलाढाली करायला हव्यात का?
प्रश्न रास्त आहेत आणि स्वाभाविक आहेत.
आणि त्याचं उत्तर श्लोकातच आहे. ते उत्तर शोधणं कष्टाचं, कंटाळवाणं वाटतं कारण आपण त्या ब्रह्मचिंतनामध्ये अनुरक्त होत नाही. आपण जर चिंतनमग्न झालो, ब्रह्मसत्याचा शोध आपापल्या मनात घेतला तर ते नक्की गवसेल!
शंकराचार्यानी अतिशय खुबीदारपणे शारीरिक अवस्थांच्या, अनुभवांना बाजूला सारून मनाचा शोध घ्यावा, मनानं घ्यावा, मनन करून घ्यावा असं सहज सुचवलंय. आपल्या मनाशी अनुरक्त झालो तर गवसणारे सत्य तिथेच सापडेल. कदाचित, अशा रीतीने सत्य शोधणं हेच सत्य असेल. अंतिम सत्य म्हणजे सत्याचा शोध इतकंच ब्रह्मसत्य असेल. असेल. अनुभवाशिवाय कळणार कसं? होय ना?
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
कुतूहल: घरगुती इंधनवायू (एल.पी.जी.)
एल.पी.जी. म्हणजेच ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ होय. याचाच अर्थ, द्रवात रूपांतर केलेला वायू होय. हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असतो.
आणखी वाचा
First published on: 17-02-2014 at 01:22 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity domestic gaslpg