बर्फ कोरडा कसा असू शकतो? बर्फ पाण्यापासून तयार होतो हे आपल्याला माहीत आहे, पण हा शुष्क बर्फ म्हणजे घनरूपातील कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड वायू कमी तापमानाला म्हणजेच साधारणपणे -५७ अंश सेल्सिअसला घनरूपात रूपांतरित होतो. तोच हा शुष्क बर्फ. या रासायनिक गुणधर्माला निक्षेपण म्हणतात. तापमान कमी केल्यावर नेहमी वायू अवस्थेतील पदार्थाचे, द्रव अवस्थेत रूपांतर होते. निक्षेपण प्रक्रियेत तापमान कमी केल्यावर वायू अवस्थेतील पदार्थाचे द्रव अवस्थेत रूपांतर न होता घन अवस्थेत रूपांतर होते. कक्ष तापमानालाही शुष्क बर्फाचे रूपांतर वायुरूपात होते, इथे पुन्हा मधल्या अवस्थेत म्हणजे द्रव अवस्थेत रूपांतर होत नाही या रासायनिक गुणधर्माला संप्लवन म्हणतात.
कार्बन डायऑक्साइडचा वायुरूप, द्रवरूप व घनरूप या तिन्ही स्थितीत उपयोग केला जातो. वायुरूपातील कार्बन डायऑक्साइड शीतपेयांमध्ये वापरला जातो. नियंत्रित परिस्थितीत वनस्पतींचे संवर्धन करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या काचगृहात अल्प प्रमाणात कार्बन डायऑक्साइड ठेवल्यास झाडांची वाढ होण्यास मदत होते. आग विझविण्यासाठी, काही कार्बनी रसायनांच्या निर्मितीत, साखर शुद्ध करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग करतात.
द्रव अवस्थेतील कार्बन डायऑक्साइड पाण्याचा सामू (स्र्ऌ) नियमित राखण्यासाठी आणि कारखान्यांमध्ये शीतलक (कूलिंग एजंट) म्हणून वापरला जातो. द्रव अवस्थेत कार्बन डायऑक्साइड साठवून ठेवून नंतर घन किंवा वायू अवस्थेत जशी मागणी असेल तसा पुरवठा केला जातो.
शुष्क बर्फ आइस्क्रीम, जीवशास्त्राचे नमुने, मांस, अंडी, मासे, फळे, इ. खाद्यपदार्थ, तयार अन्नपदार्थ टिकवण्यासाठी वापरला जातो. जिथे यांत्रिक पद्धत म्हणजेच फ्रिज उपलब्ध नसतो अशा भागात, तसेच कमी तापमानात ठेवायला लागणारे अन्नपदार्थ ने-आण करताना शुष्क बर्फ वापरला जातो. चित्रपटगृहात, लग्न समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात अचानक पांढरे ढग तयार होताना आपण बघतो. शुष्क बर्फ पाण्यात ठेवला असता संप्लवनाचा वेग वाढतो आणि आपल्याला पांढऱ्या शुभ्र वायूचे ढग दिसू लागतात. शुष्क बर्फाच्या सान्निध्यात जास्त काळ राहिलं तर त्वचेला ंअपाय होऊ शकतो.
प्रबोधन पर्व: धर्माचा उगम मनुष्यच
‘धर्माची बुद्धिवादाच्या दृष्टीने समीक्षा करताना हे सिद्ध होते की, धर्माचा उगम मनुष्यच आहे. धर्माचे उगमस्थान मनुष्याचा आत्मा होय. बाहेर कोठेही धर्माचा उदय झाला नाही. देवता, ईश्वर, अतिमानव आणि अतींद्रिय शक्ती अथवा पारलौकिक तत्त्व यांच्यामध्ये धर्माचा उद्भव झाला नाही. धर्मस्थापना करणारे आणि अवतार वा प्रेषित मानवच होते. मानवजातिविद्येप्रमाणे धर्माची प्राथमिक अवस्था ज्या हीन अवस्थेतील मानवसंघात सापडते, तेथेही धर्माचे मूळ मानवी हृदयातच दडलेले दिसते. धर्म हा मनुष्याने व्यक्तिश: आणि समुदायश: घडविला आहे; धर्म हा मनुष्यानेच निर्माण केला आहे. कोणत्याही प्रकारच्या अलौकिक किंवा पारलौकिक शक्तीचा हात त्याच्या निर्मितीत नाही, असे मानणारे शास्त्रज्ञ मनुष्याच्या ठिकाणी वसत असलेल्या व अनेक रूपाने प्रकट होणाऱ्या शक्तीतील, प्रवृत्तीतील, वा मनोवृत्तीतील एका किंवा अनेक अथवा सर्व शक्तींशी अथवा मनोवृत्तींशी धर्माचा संबंध कार्यकारणभावदृष्टीने जोडतात. धर्माची बौद्धिक उपपत्ती लावावयाची असल्यास त्याचा उगम व विकास मनुष्याच्या आंतरबाह्य़ प्रवृत्तीतच सापडला पाहिजे हे मात्र निश्चित होय.’’
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी धर्माची उत्पत्ती आणि उगम सांगताना आपला मुद्दा नेमकेपणाने स्पष्ट करतात- ‘‘मनुष्याच्या कोणत्याही एका विशिष्ट प्रवृत्तीत धर्म जन्मला नाही. त्याच्या सर्व प्रवृत्तींत धर्माचे धागे आडवे-उभे विणलेले सापडत असल्यामुळे त्याच्या सर्व प्रवृत्ती धर्मास कारक आहेत. मनुष्याच्या सर्व तऱ्हेच्या अपूर्णतेच्या दोषांचा व प्रमादांचा निरास करून त्याचे पूर्णत्व, निदरेषत्व आणि शुद्धत्व धर्मानेच आपल्या दिव्य विश्वात दाखविले आहे. अपूर्णता, दोष वा प्रमाद यांचा संबंध मनुष्याच्या कोणत्याही एका अंगाशी पोहोचत नाही; तर सर्वागांशी पोहोचतो म्हणून सहजप्रवृत्ती, बुद्धी, सौंदर्यानुभूती, नैतिक जाणीव, कल्पनाशक्ती, दिवास्वप्नशीलता, मनोगंड, ईषत्-संज्ञायुक्त मन अथवा गूढ मन यांपैकी कोणत्याही एकाच गोष्टीचा प्रभाव पडून धर्म निर्माण झाला नाही असेच म्हटले पाहिजे; या सर्व गोष्टींचा धर्माच्या जन्माशी आणि विकासाशी संबंध आहे.’’
मनमोराचा पिसारा: झाझेन, झेन; करुणा, मेत्ता
‘पण पीटरसान, मला झेन मेडिटेशनची विस्तृत माहिती देणारं पत्रक, घरी घेऊन जायला मिळेल ना?’ मी टोक्योतल्या झेन मंदिराच्या प्रांगणात पीटरसान या इंग्रजी बोलणाऱ्या अमेरिकन साधकाशी बोलत होतो. पीटरच्या निळ्या डोळ्यात मिश्कील स्मितहास्य चमकलं, त्यानं सहज माझ्या खांद्यावर हात ठेवून ‘हो’ म्हटलं. ‘या गोष्टीची चिंता करण्यात तुझे मन पुढचे दोन तास अडकून राहायला नको!’ असं त्यानं केवळ नजरेनं सुचवलं. आम्ही पुढे झालो. ऐन टोक्यो शहरात विस्तीर्ण जागेत ‘सांतो झाझेन’ मार्ग शिकवणारं नितांतसुंदर ते मंदिर होतं. लाकडी बांधकामातलं जपानी शैलीतलं वाडावजा मंदिर. कुणीतरी मर्मबंधातली सोनेरी शमी रुमालात गुंडाळून ठेवलेली ठेव होती. तिथे पाऊल टाकताच मनात प्रशांती जाणवते. ‘झाझेन’ म्हणजे झेन मेडिटेशनचा मार्ग. झेन ही अवस्था तर झाझेन म्हणजे तिची पूर्वतयारी, प्रक्रिया.
झेन मार्ग जपानातल्या आश्रमात स्थिरावला तो चीनमध्ये शिवून आलेल्या साधक- आचार्याच्या निरलस प्रयत्नांनी. झेन म्हणजे बुद्धविचारांचं पौर्वात्य संस्कारित रूप. बुद्धानं आरिय सत्य, मझ्झिम मार्ग, पटिच्यसम्मुपाद इ. विचारसिद्धान्त मांडले. विपश्यनेचा राजमार्ग आखला. परंतु, स्थलकाल स्वभावपरत्वे यातील मेडिटेशन अथवा ‘ध्यानधारणा’ हेच प्रमुख तत्त्व चीनमार्गे जपानात रुजलं. जपान्यांच्या अंतर्मुखी आणि शिस्तशीर स्वभावात ‘झेन’ विचार रुजले. त्या विचारांनुसार ध्यानधारणा कशी करावी याचं प्रशिक्षण देणारी देवळं जपानात जागोजागी असतात. पैकी हे महत्त्वाचं देऊळ. आजचा दिवस परदेशी साधकांसाठी राखीव. म्हणून अतिशय उत्सुकतेनं पोहोचलो आणि अशा लोकांना लवून अभिवादन करणे, देवळात शिरताना करावयाच्या हस्तमुद्रा, वस्त्र बदलण्याची सोय दाखवणारा पीटरसान हा साधक. सगळ्याच साधक, आचार्याच्या चेहऱ्यावर जन्मोजन्मीच्या संखारातून मुक्त झाल्याचं आत्ममग्न समाधानस्मित झळकत होतं.
झाझेन करण्याच्या विशेष पद्धती आहेत असं नाही, पण जपानी सभ्यतेच्या नियमांचं पालन आवश्यक मानतात. पत्रकात संस्कृतप्रचुर नामाभिधानाचं उपयोजन असल्यानं आश्वस्त वाटलं. झाझेनबद्दल खूप ऐकून होतो, तिथली ऊर्जा अनुभवावी.
झाझेनची पूर्ण आणि मन:पूत अनुभूती मिळाली. मंत्रोच्चार नाही, धूप-अगरबत्त्यांचा दरवळ नाही, हारतुरे नाहीत, अशा देवळातली शिस्त अतिशय भारदस्त पण आवश्यक शांतता निर्माण करते.
ताठ कण्यानं बसून, नजर स्थिर ठेवून फक्त स्थिर बसा. मनात विचार आले तर घालवू नका, विचारांना बोलवू नका. इतकंच. अशा झेन अवस्थेत प्रत्येकाला आपापल्या मनावकाशात बुद्धत्व सापडतं. प्रज्ञा जागृत झाली की ‘पच्चेक बुद्ध’ असतो. अहंकार, आसक्ती आणि दु:ख गळून पडतं. या साऱ्याचा अनुभव तासा दोन तासाच्या ध्यानधारणेतून येणं शक्य नव्हतं (नसतंही).
ध्येयापेक्षा ध्येयाचा मार्ग महत्त्वाचा हाच तर ‘झाझेन’ अनुभव. एकमेवाद्वितीय म्हणावा असा.
मंदिरातल्या तेजस्वी शक्यमुनी मंजुश्री बोधिसातूंची मूर्ती होती. तिच्या दर्शनानं मनात स्थिरभाव जागृत होतो. अनुभव विलक्षण, जणू काही परग्रहावरचा वाटावा असा.
मंदिरातून बाहेर पडायला पाय तयार होत नव्हते. माझी सद्गदित अवस्था पाहून पीटरसान पुढे आला. ‘असंच होतं रे मित्रा, इथून निघायची इच्छा होत नाही. तथागतानी स्थानमाहात्म्य, पूजाअर्चा, अवडंबरापासून मुक्त केलं. जातपात, वर्ण-वंशभेदाला सोडून प्रज्ञेचा, ज्ञानाचा मार्ग दाखवला. होय ना? तुझ्या मनात हे झेनमंदिर सदैव प्रकाशमान राहील, तेवत राहील. निरासक्त, अनिच्चतेची, प्रज्ञेची जाणीव जागृत ठेवील.’
मी साक्षात करुणेचा, मेत्ता (मैत्री)चा अनुभव घेतला.. इथे लिहिण्याकरता तो माझ्यापासून वेगळा केला इतकंच..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com