डॉ. प्रसाद कर्णिक
डॉ. व्ही. एस. सोमवंशी (२१ मे १९४९ – १७ सप्टेंबर २०१५), हे समुद्रविज्ञानामधील तज्ज्ञ! अतिशय मृदू व अबोल असणाऱ्या सोमवंशी यांचा मात्सिकी विषयातील अधिकार अख्ख्या जगाने मान्य केला. मात्र सर्वसामान्य जनतेला आपल्याच मातीतील या सुपुत्राबद्दल फारशी माहिती नाही.
डॉ. सोमवंशी यांच्या जवळपास ३० वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीपैकी निम्मा काळ ते ‘फिशरी सव्र्हे ऑफ इंडिया’ या केंद्र सरकारची प्रमुख आस्थापना असलेल्या संस्थेच्या ‘महासंचालक’ या सर्वोच्च पदावर कार्यरत होते. सागरी माशांचे सर्वेक्षण हा त्यांचा अतिशय आवडीचा आणि कौशल्याचा विषय असला तरीही माशांचे मूल्यांकन आणि त्यांचे जीवशास्त्र यावरदेखील डॉ. सोमवंशी यांची पकड होती. या सर्व शाखांत मूलभूत आणि उपयोजित संशोधन हा त्यांच्या अभ्यासाचा गाभा होता.
संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी आस्थापनेचा (यू.एन.-एफ.ए.ओ.) भाग असलेल्या ‘बंगालच्या उपसागराचा प्रकल्प (बी.ओ.बी.पी.)’ या उपक्रमाचे ‘आंतर-शासकीय संघटनेत’ रूपांतर झाल्यानंतर डॉ. सोमवंशी त्याचा प्रमुख आधारस्तंभ होते. संस्थेच्या तांत्रिक सल्लागार समितीत असणारे डॉ. सोमवंशी हे नवीन आंतर-शासकीय संघटना नावारूपाला आणण्यात अग्रेसर होते. याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय समित्या व परिषदांवर तज्ज्ञ सल्लागार म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले होते. विशेषत: ‘इंडियन ओशन टय़ुना कमिशन’ या विख्यात समितीवर डॉ. सोमवंशी उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांचे योगदान अगदी स्थापनेपासून मोलाचे ठरले आहे.
‘इंडियन एक्स्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन’मधील समुद्री मत्स्यसंपदेविषयी जी माहिती जगाला ज्ञात आहे ती डॉ. सोमवंशी यांच्या सखोल अभ्यासामुळेच! महाराष्ट्र शासनाने मच्छीमारांच्या समस्या व त्यावरील उपाय यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीचे ते अध्यक्ष होते. संशोधन क्षेत्रातही त्यांचे स्थान महत्त्वाचे होते. दोन पुस्तकांचे संपादन, शंभरहून अधिक संशोधनपर निबंध आणि अनेक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक! ६६ वर्षांच्या अल्प आयुष्यात निव्वळ वैज्ञानिक संशोधनात केलेली ही त्यांची कमाई!
या सरस्वती उपासकाचे आणखी एक खास वैशिष्टय़ म्हणजे, ‘खोल समुद्रातील मत्स्यसंपदा’ या विषयावर बोलायला लागले की त्यांचे विषयावरील प्रभुत्वच नव्हे तर याबाबत असणारी कळकळ आणि तळमळ श्रोत्यांना थेट भिडत असे. निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी स्थायिक झालेले विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेला समुद्रमात्स्यिकी- मत्स्यशेती- समुद्रविज्ञान अशा विविध विषयांवर माहिती देण्यासाठी डॉ. सोमवंशी सदैव उत्सुक असत.