कधी कधी अडचणीही जीवनाला वळण देऊ शकतात. गोटिखडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावातील एका गरीब कुटुंबाचेही असेच झाले. १९७२ सालच्या दुष्काळात आक्काताई विठ्ठल पाटील यांचे कुटुंब होरपळून निघाले. नवऱ्याची पहिली पत्नी औषधाविना वारली. कालांतराने नवराही स्वर्गवासी झाला. मोठय़ा मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा वाढत होता. परंतु कुटुंबकर्त्यां आक्काताईंनी मुलांना कल्पना दिली की, आपल्याला या परिस्थितीत उच्च शिक्षण घेता येणार नाही, तेव्हा कष्ट करून पोट भरा. मिळेल ते काम करा, मात्र एकोप्याने राहा. मुलांनी आपल्या आईचा उपदेश मानून एकोप्याने राहून कष्टाची कास धरली. शेतात स्वकष्टाने विहीर बांधली. पुढे विहिरीत आडव्या बोअर करून पाणी वाढवून बागायतीत वाढ केली. ठिबकसिंचनाचा फायदा कळल्यावर एक हेक्टरवर ठिबकसिंचन संच बसवला. त्यामुळे बागायतही वाढले व पिकाला पाहिजे तसे पाणी मिळाल्याने उत्पादनही वाढले.
मुले सुशिक्षित असल्याने शेतीतील नव्या प्रयोगाचा मागोवा घेत गेली. शेतीच्या जोडीला जनावरे पाळून दुधाचा उद्योग सुरू केला. बारमाही हिरवी वैरण मिळावी म्हणून संकरित नेपियर गवताची लागवड केली. घरच्या जनावरांचे मलमूत्र व शेतातील काडीकचरा आणि झाडांचा पालापाचोळा यांपासून उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कंपोस्ट खड्डे खणले. कुटुंबीयांनी बारमाही फळे मिळावीत म्हणून बांधावर फळझाडे लावली. घरच्या सर्वाना मनसोक्त फळे खायला मिळून उरलेल्या फळांपासून त्यांना वर्षांला पाच ते सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले व ते पुढे वाढू लागले. यातून आक्काताईंनी आपले नवीन घर आधुनिक सोयींनी सुसज्ज केले. आक्काताई अशा हताश लोकांना एकच संदेश देऊ इच्छितात, ‘टोकाच्या बिकट परिस्थितीचाही धर्याने सामना करा. अपार कष्ट, सचोटी, काटकसर व निव्र्यसनीपणा यांना पर्याय नाही. ऋण काढून सण नको. आत्महत्या हा तर त्यावरचा मार्ग नव्हेच.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा