शेतजमीन, त्याचे विविध व्यवहार आणि त्यासंदर्भात वापरात असणाऱ्या काही ठरावीक संज्ञांची माहिती शेतकऱ्यांना असणे गरजेचे असते.
सव्‍‌र्हे नंबर किंवा भूमापन क्रमांक : महसूल विभागाने ग्रामीण विभागातील शेतजमीन ओळखण्यासाठी प्रत्येक शेतजमिनीस स्वतंत्र क्रमांक दिलेला असतो. नित्य वापरात त्याला सव्‍‌र्हे नंबर म्हणून ओळखतात. महसुली भाषेत याला भूमापन क्रमांक म्हणतात.
हिस्सा नंबर : सव्‍‌र्हे नंबरची विभागणी झाली तर त्या प्रत्येक पोटतुकडय़ास क्रमांक देतात, त्याला हिस्सा नंबर म्हणतात. यामध्ये मूळ सव्‍‌र्हे नंबर तोच राहातो. उदा. सव्‍‌र्हे नंबर ३, हिस्सा नंबर ६, म्हणजे मूळ सव्‍‌र्हे नंबर ३ या शेतजमिनीचे तुकडे केल्यावर त्यातील सहाव्या क्रमांकाचा पोटतुकडा.
कब्जेदार : शेतजमिनीचा मालक अथवा भूस्वामी जो स्वत: अथवा इतरांच्या मदतीने जमीन कसतो, अशा व्यक्तीचे नाव कब्जेदार म्हणून सातबाराच्या उताऱ्यात मालकीहक्क या रकान्यात लिहिलेले असते.
कूळ : मूळ मालकाऐवजी शेतजमीन जर इतर व्यक्तींच्या वहिवाटीखाली असेल, तर अशा व्यक्तीस कूळ म्हणतात. कूळ कायदा अमलात आल्यावर शेतजमिनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे आपोआप कुळांच्या मालकीच्या नावे झाल्या. अशा जमीनधारकांना संरक्षित कूळ म्हणून संबोधण्यात आले.
शेतकरी : जी व्यक्ती शेतजमिनीत स्वत: कसते, तिला शेतकरी म्हणतात.
भूधारक : जमीनदार, सरंजामदार, इनामदार, मालक, खोत अथवा जी व्यक्ती जमीन धारण करते किंवा ज्या व्यक्तीचा शेतजमिनीत मालकीहक्कामुळे हितसंबंध असतो, त्या व्यक्तीला भूधारक म्हणून घोषित केले आहे.
खंड : कुळाने धारण केलेल्या जमिनीच्या उपभोगाबद्दल, उपयोगाबद्दल किंवा भोगवटय़ाबद्दल पशाच्या स्वरूपात किंवा शेतमाल वस्तूच्या स्वरूपात दिलेला अथवा देय असलेला मोबदला म्हणजे खंड. यामध्ये व्यक्तिश: केलेल्या कामाची किंमत अथवा अंगमेहनतीची किंमत यांचा समावेश होतो.
कूळवहिवाट : जमीनमालक व कूळ यांचे परस्परसंबंध म्हणजे कूळवहिवाट.
गाव : शासनाच्या महसुली दफ्तरात गाव म्हणून मान्यता दिलेले लोकवस्ती असणारे ठिकाण.

वॉर अँड पीस: स्वप्नदोष, शीघ्रपतन : आयुर्वेदिय मार्गदर्शन
शुक्रक्षय झाला असता शुक्रपतन होण्यास उशीर लागतो किंवा त्याच्याऐवजी रक्त पडते. वृषणामध्ये अतिशय वेदना  होतात, शिश्नातून वाफा निघतात, अशा समस्या घेऊन  माझ्याकडे वर्षांनुवर्ष गरीब-श्रीमंत, शहरातील वा खेडय़ापाडय़ातील तरुण-वृद्ध येत असतात. हे जग दिवसेंदिवस भुलभुलैयाचे झाले आहे. अनेक जाहिरातीत शिलाजीत, मुसळी, अश्वगंधा, सुवर्णभस्म, रौप्यभस्म अशा किमतीवान औषधींचे गाजर लैंगिक समस्याग्रस्तांना दाखविले जाते. तुम्ही-आम्ही बऱ्यापैकी ‘गल्ला’ फेकला की जणूकाही लैंगिक  सुख पायाशी लोळण घेईल, असे होत नाही.
आयुर्वेदिय औषधी महासागरात बल्य, शुक्र, ओजोवर्धक औषधांचे शेकडो पाठ सांगितलेले आहेत. त्यात विविध प्रकारच्या वनस्पतींचे चूर्ण, काढे, आसवारिष्ट, गोळ्या, भस्म, प्राश, अवलेह, मसाजतेल इ. इ. आयुर्वेदिय थोर शास्त्रकारांनी प्राचिन काळापासून दूध या सद्य:  शुक्रकर, सर्वत्र सहज उपलब्ध असणाऱ्या औषधाचे मोठेच योगदान सांगितले आहे. दूध हे पृथ्वीतलावरील अमृत आहे. थकलाभागला, लहान-मोठा, बालक किंवा म्हातारे, राजा किंवा रंक सगळ्यांनाच दुधामुळे तत्काळ शुक्र, वीर्य, ओज यांचा लाभ होतो.
शीघ्रपतन किंवा स्वप्नदोष ही समस्या नुसते शुक्र वाढविण्याची नसून  त्याच्या अकाली पतनाच्या मागील कारणांची असते. माझ्याकडे पस्तीस वर्षांपूर्वी दिवसरात्र शीघ्रपतन समस्येने घरदार विकायला लागलेल्या एका रुग्णाला जीरकाद्यारिष्ट, मात्र आणि निरुह बस्तीमुळे दोन दिवसांत कसा ‘छुटकारा’  मिळाला ही थापाथुपीची गोष्ट नव्हे. आपल्या शरीरावर वायूचे नियंत्रण आहे. पाच प्रकारच्या वायूंपैकी अपानवायूचे नियंत्रण, निरुह व मात्रा बस्तीत ही पंचकर्म करतात. जीरेचूर्ण, जीरकाद्यारिष्ट यांनी शुक्र संग्रहणाचे काम  होते. भोजनोत्तर आम्लपित्तवटी, सकाळ- सायंकाळ चंद्रप्रभावटी, सायंकाळी लवकर, कमी जेवण, रात्री  फिरून येणे अशा उपचारांनी स्वप्नदोषावर शीघ्र मात करणे शक्य होते.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      देव आणि नीती
कोणी कसे वागायचे हे कोण ठरवते? माणूस की देव? दहाव्या अध्यायात सद्गुणांचे वर्णन केल्यानंतर या जगातली व्यवस्था/अव्यवस्था सुधारण्यासाठी मनू ऋषी गेले असा श्लोक आणि ओवी आहे. अर्थ असा की शेवटी माणसानेच व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ती बिघडवलीही. माणसाआधी प्रतिकूल परिस्थितीत जे जीव तगले किंवा जे जीव आकार आणि कुशलतेच्या बाबतीत आटोपशीर होते ते काहीतरी करू शकले. या उलट निसर्गात अनेक कुचकामी जिवांची नैसर्गिकपणेच हत्या झाली.
अशा तऱ्हेने स्वत:कडे बघणारा जीव परोपकारी कसा असू शकेल असा प्रश्न विचारता येतो. पण त्याचे उत्तर असे असते की जिवांची जनुके स्वार्थी असावी लागतात. तगडी जनुके टांकसाळीत नाणी पाडतात तसे जीव तयार करतात आणि मग जीव जेव्हा संख्येने निर्माण होतात, तेव्हा असा शहाणा विचार करतात की इतक्या साऱ्या जिवाबरोबर जगायचे असेल तर समजुतीने घेतलेले बरे आणि म्हणून साधम्र्य असलेले कळप तयार होतात.
आमची मुलं लग्नाची होती तेव्हा किंवा आधी मी लग्नमुंजीला जाण्यास टाळाटाळ करत असे तेव्हा ही म्हणायची, ‘आपण गेलो नाही तर आपल्या मुलांच्या लग्नाला कोणी येणार नाही’. एखादा माणूस फटकून वागणारा असेल तर त्याचे प्रेत उचलायला कोणी येत नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रेमाचा पाझर जैविक आहे. तसाच व्यवहारी आणि सवयीचा आणि रूढीचाही आहे. सहजीवनात द्यावे घ्यावे लागते. दुसऱ्याच्या अडीअडचणीत मदत करायची असते. सुतकाच्या वेळात शेजारी जेवतात. मृत्युसभेत गेलेल्याबद्दल चांगले बोलतात. याचे कारण चांगले वागणे ही गरजही असते आणि ती जनावरांमध्येही तर दिसतेच, पण माणूस आणि जनावराच्या संबंधात दिसू शकते.
दुसऱ्याने आपल्याशी कसे वागले तर आपल्याला बरे वाटेल याबद्दल ज्या आपल्या कल्पना असतात, त्या कल्पनांप्रमाणे आपण दुसऱ्याशी वागलो तर मग सार्थक होते, असे इमान्युएल कान्ट नावाचा तत्त्वज्ञ म्हणाला होता आणि त्याच कान्टने देव नावाचे गृहीतक धरून हा परोपकाराचा व्यवहार करण्याची गरज नाही हेही नमूद केले. एकमेकांशी चांगले वागण्यात देवाची मध्यस्थी मास्तरकी किंवा भीती कशासाठी? देवाला मध्ये घालण्यात आपण उत्स्फूर्तपणा तर घालवतोच, परंतु त्या देवाचा झेंडा हातात घेऊन भांडतो आणि अनन्वित जीवघेणे अत्याचार करतो हे तर सिद्धच आहे. उलट गर्वाचे घर खाली ही गोष्ट देव करत नाही ती आपसूकच होते. कारण कोणीच सतत बादशहा राहू शकत नाही. हे प्रपंचातल्या अस्थिरपणाबद्दलचे वैज्ञानिक सत्य असते.
चांगुलपणाबद्दलचे हे विज्ञान. उद्या एक विज्ञान कथा.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १८ ऑक्टोबर
१८६१  > भारताचार्य चिं. वि. वैद्य यांचा जन्म. ‘दुर्दैवी रंग’ ही कादंबरी तसेच ‘अबलोन्नति’ या लेखमालेतून त्यांनी तत्कालीन स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा केली. ग्वाल्हेरमध्ये न्यायाधीश म्हणून काही काळ काम केलेले वैद्य संस्कृतचे जाणकार होते. ‘मध्ययुगीन भारत’ आणि ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ ही पुस्तके त्यांनी सिद्ध केली, तर इंग्रजीत ‘महाभारत- अ क्रिटिसिझम’ हा ग्रंथ लिहिला.
१९०६ > महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली. पुढे त्यांचे बरेच लेखन या संस्थेच्या कार्याशी निगडित राहिले.
१९५१ > ‘जयद्रथ विडंबन’ हे नाटक १९०४ साली लिहिणाऱ्या, मराठीतील आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांचे निधन. ‘दामिनी’ हे नाटकही त्यांनी लिहिले, तसेच आत्मचरित्र व काही कविताही त्यांनी लिहिल्या होत्या. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि हिराबाईंच्या सहजीवनाबद्दल म. ल. वऱ्हाडपांडे यांनी ‘कोल्हटकर आणि हिराबाई’ हे पुस्तक लिहिले आहे.
२००२> संतसाहित्यिक डॉ. गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये यांचे निधन. ‘संतकाव्ये व समालोचने’, ‘वाङ्मयमूल्ये ४ जीवनमूल्ये’, ‘नीलावंती’ हा काव्यसंग्रह  आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
संजय वझरेकर

Story img Loader