वरकस जमीन: भातशेतीच्या लागवडीमध्ये राबखताच्या कामासाठी उपयोगात आणली जाणारी व त्यानुसार महसूल अभिलेखात वरकस म्हणून वर्गीकृत केलेली जमीन.
ओलिताची जमीन: लागवडीखालील क्षेत्रात पाण्याचा पुरवठा हंगामी, बारमाही असेल तर अशा जमिनीला ओलिताखालची जमीन म्हणून ओळखतात. शासनाच्या कोणत्याही उपसिंचन पद्धतीने पाणी मिळणाऱ्या जमिनीचा यात समावेश नसतो.
हंगामी ओलिताची जमीन: नदीच्या पात्रात असलेली अथवा नदीच्या पाण्यामुळे हंगामात जलसिंचित होणारी जमीन.
पट्टेदार: काही विशिष्ट मुदतीसाठी एखाद्या व्यक्तीने मूळ मालकापासून (खासगी किंवा सरकारी) शेतजमीन भाडेतत्त्वावर कसण्यासाठी घेतली असेल अशी व्यक्ती. मुदतीनंतर पट्टेदारांचे अधिकार आपोआपच रद्द होतात.
गावठाण: राज्य सरकारने एखाद्या गावच्या वस्तीसाठी गावाजवळील ठरवून दिलेले काही क्षेत्र. हे ठरावीक क्षेत्र त्या गावाच्या लोकसंख्येपुरतेच मर्यादित असते. गावठाण वाढवण्याचा अधिकार सरकारला असतो. गावठाण्यातील जमिनी करमुक्त असतात.
पोटखराबा : शेतजमीन कसण्यास अथवा लावणीस अयोग्य असणारे क्षेत्र. सव्‍‌र्हे नंबरच्या अथवा भूमापन क्रमांकाच्या एकूण क्षेत्रातील नापीक व पड क्षेत्र म्हणजे पोटखराबा क्षेत्र.
कोरडवाहू : निव्वळ पावसावर अवलंबून असणारे क्षेत्र.
रयतावा आणि रयतवारी : रयतावा म्हणजे शेतसारा किंवा शेतजमिनीवर लावलेला महसुली कर. शासनाने शेतसाऱ्यासंबंधी प्रत्येक कुळाशी स्वतंत्र ठराव करण्याची पद्धती म्हणजे रयतवारी.
शेतगणा : शेतजमिनींचा समूह किंवा गट.
शेतवारी : तलाठी किंवा कुलकर्णी यांनी गावहद्दीतील शेतजमिनींची केलेली अनुक्रमानुसार नोंदणी किंवा पत्रक. भूमापन क्रमांकाशी याचा संबंध नसतो.
शेतसनदी : काही एका ठरावीक कामाबद्दल अथवा लष्करातील सेवेबद्दल शासनाकडून शेतीची सनद प्रदान केली जाते. अशी सनद धारण करणारयास शेतसनदी म्हणतात.
सातबारा उतारा : महसूल विभागाने गावस्तरावर शेतजमिनींच्या वेगवेगळ्या नोंदी ठेवण्यासाठी आखून दिलेल्या नमुन्यातील हा एक नमुना आहे. सातबाराचा उतारा म्हणजे हक्कपत्रांच्या विहित नमुन्याचा उतारा.                            

वॉर अँड पीस: वंध्यत्व : पुरुषविचार (भाग-१)
लग्न झाल्याबरोबर काही काळ प्लॅनिंग चालते. वर्ष दोन-वर्षांनी घरची मोठी मंडळी, नातेवाईक,  मित्रमंडळी काय? पाळणा केव्हा हलणार? अशी चौकशी करायला लागल्यावर या जोडप्यांना जाग येते. बहुसंख्य महिलांना यथावकाश दिवस राहतात. काही स्त्रियांना दिवस राहात नाहीत याची वेगवेगळी कारणे असू शकतात.
अनपत्या असे सांगून जेव्हा पतीराज आपल्या पत्नीला घेऊन वैद्य डॉक्टरांकडे येतात तेव्हा चिकित्सक मंडळी प्रथम पुरुषाची शुक्र तपासणीसंबंधी चौकशी करतात. शुक्राणू व संबंधित अहवाल जर व्यवस्थित असले तर मग महिलेची मासिक पाळी, गर्भाशय, बीजनलिका इत्यादींची माहिती घेतली जाते.
पुरुषांच्या शुक्राणू अहवालात दोन प्रकारचे दोष असू शकतात. १) शुक्राणूंचा पूर्णपणे अभाव, २) शुक्राणूंची  कमतरता. शुक्राणूंचा पूर्णपणे अभाव असताना उपचार खूपच कष्टसाध्य, खूप काळ घेणारे व काही वेळेस असाध्य असतात. सामान्यपणे शुक्राणूंचे प्रमाण २० मिलियन  १ मि.ली. वीर्यामध्ये असल्यास ते पुरेसे असते.  त्याची कमतरता असल्यास व शुक्राणू-स्पर्मकाऊंट मृत नसल्यास पुरुषाने औषधोपचार घेण्याची गरज नसते. पुरुषाच्या वीर्यातील शुक्राणूंचे मोटिलिटीचे प्रमाण अत्यल्प असले तरी फारसा फरक पडत नाही. वीर्याचा एक थेंबही स्त्रीला गर्भ राहण्याकरिता पुरेसा असतो.
शुक्राणूंचे प्रमाण कमी असल्यास पुरुषाने तंबाखू, मद्यपान, जागरण, एक्स-रे यासारख्या किरणाचा अतिसंपर्क कटाक्षाने टाळावा. लक्ष्मीविलास, मधुमालिनीवसंत, पुष्टीवटी, हिम्मतवटी, चंद्रप्रभा व सुवर्णाक्षिकादिवटी यांचे जोडीला आस्कंदचूर्ण यांच्या नियमित वापराने शुक्राणूंची कमतरता निश्चयाने सुधारते.
 खूप अशक्त व वजन कमी असणाऱ्यांनी अश्वगंधापाक,  च्यवनप्राश, धात्रीरसायन, वानरीकल्प, शतावरीकल्प यातील एकाची  निवड करावी. उदरवात, अजीर्ण समस्या असल्यास पिप्पलादिकाढा घ्यावा. चिंता सोडावी.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      एका विचित्र जीवाची कथा
समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या एक विचित्र जीवांची ही गोष्ट आहे. हा जीव आपल्या बोटा एवढाही नसतो पण याला छोटेसे हातपाय असतात. कान डोळय़ासारखी इंद्रिये असतात आणि त्याला एक इवलासा मेंदूही असतो. हा जन्मला की भटकतो आणि आपल्या पोटापुरते खात मोठा होतो. काही दिवस जातात मग निसर्गाच्या अद्भुत वाटचालीत हा कोठेतरी स्थिरावतो आणि एक आश्चर्य घडले.. याला मुळे फुटतात आणि ही मुळे या जीवाला अन्न पुरवू लागतात. त्यामुळे हालचाल करायची गरजच उरत नाही. म्हणून याचे हातपाय झडू लागतात. चलनवलनच नाही तर कोठे जातो आहे हे बघण्याची गरजच काय तेव्हा डोळे आंधळे होतात. मुळांपासून स्वयंपूर्ण झालेला हा जीव मग कानासारख्या आसमंतातल्या जाणिवा गोळा करण्याची इंद्रियांचाही त्याग करतो. राहून राहिला मेंदू. जर बाहेरच्या जाणिवाच बंद होणार असतील तर मग मेंदूही ढेपाळतो आणि आकुंचन पावतो. पुढे काही दिवस जातात झाडा सारखी याला फळे येतात ती तळाशी पडतात आणि मग त्यातून हा छोटासा जीव परत आपले कारनामे सुरू करतो.
 विज्ञानाने सांगितलेली ही गोष्ट मोठी गमतीदार आहे पण मला यात तत्त्वज्ञानही दिसले. जाणिवा सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यात एका खोलीत कोंडून एकाच खिडकीतून बाहेर बघत घेता येत असल्या तरी पुरत नाहीत. म्हणूनच सभेला जा, ऐका, बोला, भाग घ्या, वाचा, लिहा, छंद जोपासा, स्वार्थाच्या पलीकडे जाऊन कणभर काहीतरी करा, प्रवास करा, निरीक्षणाची सवय लावा, जबाबदाऱ्या पार पाडा, त्यात निर्माण होणाऱ्या खस्ता खाण्याची ताकद वाढवा, असे सांगितले जाते. मन घट्टही करावे लागते आणि मोकळेही सोडावे लागते. नेहमीचा आहार पौष्टिक आणि मर्यादित हवा, पण अधूनमधून मेजवानी झोडावी लागते आणि उपासही करायला सांगतात कारण नाहीतर शरीर फारच धोपट मार्गी होते.
कान, डोळे, जीभ, नाक ही चार इंद्रिये मेंदूच्या एवढी जवळ का असा विचार कधी आला आहे तुमच्या मनात? डोळे हातावर आणि कान पायावर आणि नाक पाठीवर का नाहीत? तर त्याचे कारण असे आहे की ती मेंदूपासून झालेली मेंदूचीच उपांगे आहेत. अर्थात या उपांगातून निर्माण होणाऱ्या स्पंदनांचा अर्थ केवळ मेंदूच समजू शकतो. आणि त्याचेच पोषण निरनिराळय़ा तऱ्हेने करावे लागते, अर्थात यासाठी गुरू हवाच. आईवडील, भाऊ- बहीण,  मित्र सगळे गुरू असतात आणि काही खास गुरूही असतात. उदा. श्रीकृष्ण. तोही विज्ञानाबद्दलच बोलतो आणि म्हणतो..
‘‘सांगेन विज्ञानासकट। ज्ञान तुला।
कारण विज्ञान विचारच पहिला। जाणावा लागतो.’’
उद्या विज्ञानाबद्दल.
रविन मायदेव थत्ते

आजचे महाराष्ट्रसारस्वत        १९ ऑक्टोबर
१८९३> कथा-कादंबरीकार मोरेश्वर वासुदेव जोशी यांचा जन्म. पोर्तुगीज गोव्यात घडणारी ‘पावनतीर्थ’ तसेच  ‘नवजीवन’, ‘गिरिजा’ आदी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
१९०२ > मराठी कथेला नवे वळण देणारे कथाकार दिवाकर कृष्ण केळकर यांचा जन्म. ‘दिवाकर कृष्ण’ या नावाने त्यांनी कथालेखन केले. ‘अंगणातला पोपट’ ही त्यांची पहिली कथा १९२२ साली मनोरंजन मासिकात प्रकाशित झाली होती. समाधी आणि इतर गोष्टी, रूपगर्विता आणि इतर गोष्टी, महाराणी व इतर कथा आदी संग्रह तसेच ‘विद्या आणि वारुणी’, ‘किशोरीचे हृदय’ या कादंबऱ्या आणि ‘तोड ही माळ’ हे नाटक अशी त्यांची साहित्य संपदा.
१९३६> गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म. २००९ साली त्यांचे निधन झाले.
१९४९ > डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे निधन. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते धाकटे बंधू. दंतवैद्यकातील पदवी घेतल्यानंतर काही काळ सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन ते हिंदुमहासभेचे कार्यकर्ते झाले. ‘श्रद्धानंद’ या सावरकरवादी मासिकाचे ७ वर्षे संपादन, ‘हिंदूंचा विश्वविजयी इतिहास’, ‘जाईचा मंडप’ (जातिहृदय या टोपणनावाने) तसेच ‘मरण की लग्न’ या कादंबऱ्या, अशी त्यांची पुस्तके होत.
संजय वझरेकर

Story img Loader